मित्रहो मी आज एका वेगळ्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीविषयी माझं मत या लेखामधून मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्री आहे की, आपणास माझं म्हणणं नक्कीच पटणार आहे़.
पसारा कधीच कुणाला आवडत नाही. पण आपल्या आजूबाजूला, घरी, दारी, कार्यालयात, रस्त्यांवर सगळीकडे, इतकेच काय आपल्या मनातही आपणास नेहमी दिसतो तो केवळ पसारा, पसारा आणि पसाराच! असं का व्हावं?
माणूस हा एकच प्राणी असा आहे की जो संग्रह करतो आहे, सृष्टीतील इतर कुणीही प्राणी त्याच्यासारखा, त्याच्याइतका संग्रहशील नाही. बरे, त्याचं हे संग्रह करणं, संग्रहशील असणं त्याच्या किती उपयोगाचं आहे? हे समजून घेण्यासाठी तो कशाकशाचा संग्रह करतोय, किती प्रमाणात संग्रह करतोय, कशा रितीनं संग्रह करतोय आणि नेमकं कशासाठी संग्रह करतोय हे तपासुन पहायला हवं.
माणसाला आयुष्य आहे, त्याच्या या आयुष्याला भविष्य असते आणि आपलं हेच भविष्य सुरक्षित, सुखी, निर्भय, निर्धोक आणि आरामदायी असावं या उद्देशानं माणूस अनेक गोष्टींचा संग्रह करीत असतो. या अनेक गोष्टींमध्ये पैसा, कपडे, चपला, बॅगा, पेन, पुस्तके, भांडी, घरे, गाड्या, फर्निचर खाद्यपदार्थ, अनेक छोट्या -मोठ्या वस्तू, मित्र, नातेवाईक, अन्य माणसे व त्यांचे विचार, कल्पना, मतं, इच्छा, इ.चा समावेश असतो. या संग्रहीत गोष्टींच्या मदतीने आपलं भविष्य सुरक्षित व आरामदायी होईल अशी माणसाची धारणा असते; मात्र तरीही अनेकदा हा संग्रह आपल्या काहीच उपयोगाचा नाही असं माणसाला वाटत राहातं आणि मग हा संग्रह त्याच्यासाठी एक नकोसा असलेला पसाराच ठरतो.
भविष्य सुरक्षित व आरामदायी व्हावं ही माणसाची अपेक्षा असली तर त्यात गैर काहीही नाही आणि म्हणूनच त्या हेतूनं माणसानं केलेला संग्रह वावगा ठरविता येत नाही. मात्र माणूस हावरेपणाने माझ्याच जवळ सगळं असावं, तेही अगदी भरपूर असावं अशा विचारानं संग्रह करीत राहतो. असा अतिरिक्त संग्रह करताना माणूस नीती आणि अनीतीमधला फरक विसरून जातो, त्याचा विवेक हरवतो, त्याच्यातील प्रज्ञा, शील, करुणा उणे होवून जातात, माणसात अस्तित्वात असणारी स्वयंभू माणुसकी अदृष्य होते, त्याच्यातील प्रामाणिकपणा व सचोटीला ओहोटी लागते. परिणामी आपला स्वतःचा संग्रह वाढविण्याच्या नादात माणूस स्वार्थी, बेईमान, क्रूर आणि दुष्ट विचारांच्या प्रभावाखाली येतो. त्याचे आचरण भ्रष्ट होते आणि अवघे जनजीवन गढूळते !
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपण पसारा वाढवतो आहोत. हा पसारा आपल्या जगण्यासाठी खरंच आवश्यक असतो का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर उत्तर मिळते - "नाही"
ज्याला आनंदी जीवन जगायचे आहे त्याला हा पसारा करावा लागत नाही. आसक्तीमुळेच माणूस पसारा वाढवतो आणि याच पसाऱ्यात त्याच्या जीवनातला आनंद हरवून जातो. जीवनाच्या अखेरपर्यंत अनेकांना ही समज येत नाही. अशा लोकांचे जगणे आनंदी असुच शकत नाही.
या सृष्टीला आणि समष्ठिला आनंदी बनविण्यासाठी आपण सारे जन्माला आलो आहोत. इतरांना आनंदी ठेवणे हाच आपल्या संबंध आयुष्याचा खरा उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी लागणारी एकमेव पात्रता म्हणजे आधी आपण स्वतः आनंदी असायला हवे. आपणास आनंदी व्हायचे तर आपली आसक्ती कमी व्हायला हवी. हे कळत नाही तोपर्यंत आपण रूढार्थाने कितीही शिकलेलो असलो तरी मूलतः अज्ञानीच असतो. या अज्ञानातूनच आसक्ती जन्म घेते. ही आसक्ती दिसामासाने वाढत जाते आणि म्हणूनच माणसाच्या हातून त्याच्या सभोवती चहूबाजूला मोठा पसारा वाढत जातो. आपल्यापैकी प्रत्येकाला हा वाढणारा पसारा कमी कमी करता यायला हवा !
आपल्या माहितीतील काही ठळक उदाहरणांचा संदर्भ आपल्याला या संबंधाने अभ्यासता येईल.
अगदी अलिकडच्या काळातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री, भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईलमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम, आफ्रिकन नेते डॉ. नेल्सन मंडेला, साक्षात करुणामूर्ति समजल्या गेलेल्या मदर तेरेसा, श्यामची आई लिहीणारे आणि अतिशय संवेदनशील असलेले साने गुरुजी, महामानव डॉ. बाबा आमटे, ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे अशा अनेक व्यक्तिंनी आपले आयुष्य जगताना पसारा मांडला नाही, कोणताही अनावश्यक संग्रह केला नाही असेच दिसून येतेय. अत्यंत साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हेच या सर्वांचे ठळक वैशिष्ठ्य होते. त्यांनी आपल्या गरजा कायम मर्यादित राहतील याची काळजी घेतली.आपल्या भोवतालची सृष्टी आणि समष्ठि आनंदी व्हावी यासाठी या सर्वांनीच आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि ही सारी माणसं 'देवमाणसं' बनली.
आपण अत्यंत सामान्य माणसं आहोत. आपल्याला त्यांच्याइतकं असामान्य होता येईलच असं नाही; पण एक मात्र नक्की, आपल्याला देखील आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनावश्यक पसारा कमी करता येईल, आपलंही जीवन आनंदी बनेल आणि आपणही आपल्या भोवतालच्या सृष्टी आणि समष्ठिला आनंदी ठेवू शकू. हे सारं कसं करता येईल? आपल्या आयुष्यातील हा सगळा अनावश्यक पसारा कमी केला पाहिजे अशा अर्थाची चर्चा आपण लेखाच्या पूर्वार्धात केली आहेच. हा अनावश्यक पसारा आपल्याला कसा कमी करता येईल याबाबतची चर्चा आता आपण करणार आहोत.
सर्वप्रथम आपण हे स्वीकारलं पाहिजे की, माणूस हा सृष्टीचा म्हणजेच निसर्गाचाच एक महत्वाचा भाग आहे. त्यामूळे त्यानं निसर्गनियमांचे पालन काटेकोरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाचे काही नियम आहेत ते माणसानं समजून घ्यायला हवेत आणि रोजच्या जगण्यात ते सारेच नियम अंगिकारायला हवेत.
निसर्गाचे नियम :
१) निसर्ग नेहमी वर्तमानात जगत असतो, निसर्ग भूतकाळाचा अभिमान बाळगत नाही. भूतकालीन परिस्थितीविषयी आनंद किंवा दुःख तसेच भविष्यकाळाची भीतीही निसर्ग बाळगीत नाही. वर्तमानातील प्राप्त परिस्थितीला निसर्गाकडून नेहमी योग्य तो प्रतिसाद दिला जातो.
२)निसर्ग परस्परावलंबनाचा पुरस्कार करतो. निसर्ग स्वावलंबन किंवा स्वातंत्र्याऐवजी परस्परावलंबनाचा पुरस्कार करतो. जीव जीवस्य जीवनम् हे निसर्गाने स्वीकारलेले तत्व आहे.
३) निसर्ग भेदभाव करीत नाही. निसर्गात विविधता विपूल आहे मात्र या विविधतेच्या आधारे निसर्ग कोणताही भेदभाव करीत नाही. तो सर्वांना सारखाच वागवतो. उदाहरणार्थ, एकाने झाड हलवून किंवा झाडावर चढून खाण्यासाठी फळे काढली म्हणून त्याला फळे गोड लागतील आणि दुसऱ्याने झाडाला दगड मारुन फळे मिळविली म्हणून त्याला फळे आंबट -कडू लागतील असं होत नाही.
४) निसर्ग अनावश्यक गोष्टींचा संग्रह करीत नाही.
प्रवाहातील पाणी वाहून जाते. झाडांची पाने -फळे पिकली की गळून जातात. दगड झिजतात, मातीची धूप होते, पाण्याची वाफ होते. कुणीही आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आसक्त होवून संग्रह करीत नाही.
या निसर्गनियमांचे पालन करणे सृष्टीच्या अव्याहत अस्तित्वासाठी आणि समष्ठिच्या चिरंतन आनंदासाठी आवश्यक असते.
'थोडंच भरपूर आहे!" असं मराठीत किंवा `Less is More!' असं इंग्रजीत म्हटलं जातं. या म्हणण्याचा नेमका अर्थ काय हे आपण प्रथम समजून घेवूया. आपलं आयुष्य आणि भविष्य आनंदी, सुखी करायचं असेल तर माणसानं थोडंच भरपूर आहे असं समजून अनावश्यक पसारा कमी करायला हवा. हा पसारा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक खालीलप्रमाणे कृती करायला हवी.
१) प्रत्येक माणसानं आपला प्राधान्यक्रम ठरवावा. आपला स्वभाव, वृत्ती, प्रवृत्ती, इच्छा, आकांक्षा, विचार, मतं, भावना इ. चा विचार करुन आरोग्य, कुंटूब, नोकरी, व्यवसाय, छंद यासाठी आपला स्वतःचा प्राधान्यक्रम ठरवावा.
२) आपल्या जवळच्या कोणत्या वस्तू आपल्या गरजेच्या आहेत हे ठरवावे. नेहमी गरज लागणाऱ्या, अधूनमधून गरज लागणाऱ्या आणि क्वचित, विशेष प्रसंगी गरज लागणाऱ्या वस्तू असे घरातील व कार्यालयातील पसाऱ्याचे वर्गीकरण करावे आणि गरजेच्या वस्तू तेवढयाच ठेवाव्यात.
३) अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी करावा.
आपल्या घरात व कार्यालयात आपण असंख्य वस्तूंचा संग्रह करून मोठा पसारा केलेला असतो. त्यातील अनेक वस्तू वर्षानुवर्ष आपण वापरात आणलेल्या नसतात. काही वस्तु तर केवळ सणावाराला साफसफाई करताना नजरेत येतात. घरात, कार्यालयात या वस्तूंचा पसारा वाढून निव्वळ अडगळीत वाढ होते. अशा सर्व अनावश्यक वस्तू उदाहरणार्थ जुनी उपकरणे, बंद पडलेले पेन, घडयाळे, नादुरुस्त व वापरात नसलेल्या चपला, जूने वापरीत नसलेले कपडे, अनेकदा वाचून झालेली पुस्तके, रद्दी, अनावश्यक कागदपत्रे इ. गोष्टी आपल्या गरजेच्या नसतील तर त्यांची योग्य विल्हेवाट लावून पसारा कमी केला पाहिजे.
४) आपल्या आवश्यकतेनुसार गरजेच्या आणि गरजेपुरत्याच नवीन वस्तू विकत घ्याव्यात. केवळ आवडली म्हणून वस्तू खरेदी करुन भोवतालचा पसारा वाढवू नये.
५) आपल्या वेळेचे नियोजन करुन त्याचा पर्याप्त उपयोग करावा. जगातल्या सर्वच माणसांना निसर्गाने सारखाच वेळ दिलेला आहे. आठ तास काम, सात तास झोप ( विश्रांती ) आणि कुंटूब, मित्र, नातेवाईक, आरोग्य, छंद, मनोरंजन, शिक्षण, जनसंपर्क, समाजसेवा या प्रत्येकासाठी किमान एक तास असे उर्वरीत नऊ तासांच्या वेळेचे नियोजन करुन वेळेचा सदुपयोग करायला हवा.
६) माध्यमांचा आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक वापर करावा. वर्तमानपत्रे, टीव्ही, मोबाईल, नेट सर्फींग, विविध समाज माध्यमे इ. चा आवश्यक तेवढाच वाजवी उपयोग करावा.
७) साधेपणाने जीवन जगावे. मित्र, नातेवाईक, कुुटूंबीय, जनसंपर्क, समाजसेवा इ. कडून विविध अनुभव मिळवावेत आणि कमीत कमी गरजा ठेवून साधेपणाने जगावे. साधे जगणे खूप चांगले व आनंददायक असते. साधेपणा अंगी बाणवायचा म्हटलं तर मानवी संबंधांसोबतच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हितसंबंधांचा अनावश्यक पसारा आवरायला हवा.
८)आपल्या मनातला कचरा काढून टाकावा. मानवी मनात नकारात्मक आणि अनावश्यक विचार, इच्छा, अपेक्षा इ. चा रोज नवा कचरा साचत असतो. राग, द्वेष, सूडभावना, अहंकार (मद), मत्सर, मोह, लोभ, चिंता काळजी, भय या सारख्या अनावश्यक बाबींचा मनात साचलेला कचरा हा देखील एक मोठाच पसारा आहे. हा पसारा आवरायला हवा. आवश्यक त्या आणि तेवढयाच गोष्टी मनात राखल्या, जतन केल्या तर मनाचे मळभ दूर होवून आपल्याला मनाच्या निरभ्रतेचा आल्हाददायक अनुभव घेता येईल.
९) निवडक आणि आवश्यक तेवढयाच लोकांशी आपला संपर्क असावा. आपल्याला निवडक पण चांगले मित्र असावेत. समाज माध्यमातून हजारो आभासी मित्र मिळत असले तरी त्यांची आपल्या रोजच्या जीवनात खरेच किती गरज असते? असे आभासी आणि अनावश्यक मित्र, नेहमी इटालिक फॉन्टमध्ये ( तिरकस ) बोलणारे टोमणेप्रिय नातेवाईक व अन्य अनावश्यक माणसांशी आपला संबंध वाढवून आपल्या आयुष्यातल्या दुःखाचा पसारा वाढवू नये.
आपल्या गरजेपुरता पैसा, गरजेपुरत्या वस्तू, गरजेपूरते मानवी संबंध असा समन्वय साधता आला की मगच आपल्याला 'थोडंच भरपूर आहे!' किंवा 'Less is More!' अशी अनुभूती मिळते !
लेखक : श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
अहमदनगर
संपर्क : 97666 68295