कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या लॉकडाऊनच्या काळात समाजमाध्यमांनी आपल्याला एकांतवासाची शिक्षा जाणवू दिली नाही. वेगवेगळे विनोदी चुटकुले, बोधकथा, मनाला उभारी देणारे विविध प्रेरणादायी संदेश, टीकटॉक व्हिडीओ, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरावेत असे वैचारिक लेख, चारोळ्या, कविता, गझला अशी भरपूर रेलचेल होती. लुडो, कॅरम, रमी या ऑनलाईन खेळांना सुगीचे दिवस आले. वेळ मजेत घालवण्यासाठी हे पुरेसं होतं. तरीही काही सुग्रणी आपल्या पाककलेची झलक अधुनमधून दाखवित राहील्या. त्यामूळे लॉक डाऊनचा एकांत सहन करणे सहज शक्य झाले. यासाठी सर्व समाजमाध्यमांना म्हणजे फेसबुक, व्हाटसॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजेत. अफवा पसरवणाऱ्या बातम्या किंवा व्हिडीओज बाबत सरकारने सक्त ताकीद दिली असल्याने त्याचा फारसा त्रास झाला नाही. ही आणखी एक चांगली गोष्ट घडली.

याच दरम्यान माझ्या मनात अत्यंत श्रध्दा व आदराचे स्थान असलेल्या मुंबई येथील कस्तुरबा ट्रस्टच्या मानद संचालिका डॉ. एस. ए. उडीपी मॅडम यांनी मला आधुनिक व्यवस्थापनशास्त्रावर भाष्य करणारा एक व्हीडीओ शेअर केला होता. मी हा व्हीडीओ बारकाईने पाहिला, ऐकला आणि समजून घेतला. उत्तरादाखल मी मॅडमला या व्हीडीओसाठी धन्यवाद दिले आणि या विषयावर एखादा लेख लिहीण्याची माझी इच्छाही मी व्यक्त केली. मॅडमकडून मला तात्काळ मेसेज आला की, त्यांनी हा व्हीडीओ त्याच हेतूने मला पाठवला आहे. त्याचवेळी मी या विषयाला न्याय देवू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या विश्वासाला पात्र होण्याचा एक नम्र प्रयत्न मी त्यांच्याच आशीर्वादाने करतो आहे.

लेखाचे शीर्षक 'स्वर्ग, कैलास, वैकुंठ आणि बरंच काही... ' असे आहे. आपणास या लेखात काय वाचायला मिळू शकेल याचा अंदाज लावण्याचा तुमचा प्रयत्न एव्हाना सुरु झाला असेलच. असा अंदाज लावण्यातही एक विशेष आनंद असतो, गंमत असते.

हिंदू धर्मातील समजुतीनुसार स्वर्ग, कैलास आणि वैकुंठ अशी तीन पवित्र ठिकाणं आहेत. प्रत्येक हिंदू व्यक्तीला आपला इहलोकीचा प्रवास संपल्यावर या तिन्ही पवित्र ठिकाणांपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा असते. हिंदू धर्मग्रंथांनी या पवित्र ठिकाणांबद्दल खूप काही लिहून ठेवले आहे. या तिन्ही ठिकाणांशी जोडलेल्या अनेक सुरस आणि रम्य कथा आहेत. आपण त्या कथा ऐकत ऐकतच लहानाचे मोठे होत असतो. या सर्व कथांचा आपल्या वर्तन, वाणी, कर्म अशा सर्वच गोष्टींवर मोठा प्रभाव राहातो. कळत नकळत या कथांच्या प्रभावाखाली आपण आपलं दैनंदिन आयुष्य जगत असतो. आपल्या आवडी -निवडी, इच्छा, वृत्ती आणि या तिन्ही पवित्र ठिकाणांचा आपल्यावर पडलेला प्रभाव यानुसार आपण आपल्याला स्वर्गात, कैलासात की वैकुंठात जायचं आहे हे मनाशी ठरवीत असतो. आपल्याला आपल्या इच्छित ठिकाणी जायला मिळावं यासाठी आपण विविध प्रकारची पुण्यकर्म करीत राहतो.

आपल्या समाजात एक बराच मोठा वर्ग असा आहे की तो पाप पुण्याची कल्पना मान्य करीत नाही. अशा लोकांना स्वर्ग, कैलास किंवा वैकुंठ या पवित्र ठिकाणांशी काही देणे घेणे नसते. हे लोक वस्तुनिष्ठ विचार करुन वर्तमान जीवनाचा यथेच्छ उपभोग घेऊन आनंदात जगण्याचा प्रयत्न करतात.

दुसरा एक वर्ग समाजात आढळून येतो. या वर्गातील लोक पापभिरु असतात. त्यांचा सतत पुण्यकर्म करण्याचा अट्टाहास असतो. ते पाप कर्म करण्यास घाबरतात. स्वतःची अडचण होत असली, स्वतःच्या कुवत नसली तरी पोटाला चिमटा घेवून, प्रसंगी मन मारुन पण पुण्य कर्म करुन पुण्यसंचय करीत हे लोक आपलं जीवन व्यतित करीत असतात. या वर्गातील बहुतेक सर्वच लोकांना काहीही करुन स्वतःसाठी स्वर्गात जागा मिळवायची असते.

तिसरा एक वर्ग समाजात आढळून येतो. या वर्गातील लोक वरीलपैकी कोणत्याही एका बाजूला न झुकता त्या त्या प्रसंगी त्यांना सोईची असेल अशी भूमिका घेवून जगत असतात. त्यांच्या मनात पाप - पुण्याचा काहीही हिशोब नसतो. ते स्वतःच्या सोईला अधिक प्राधान्य देतात.

या पलिकडे जाऊन पाहिले असता आपणास खालील तीन गोष्टी प्रामुख्याने दिसतात:

१) बहुतेक सर्वांना स्वर्गाचेच आकर्षण असते. आपण किंवा आपल्या जवळची निधन झालेली व्यक्ती स्वर्गातच जाणार असा ठाम विश्वास लोक बाळगताना दिसतात. त्यामूळे अशा व्यक्तीचा उल्लेख 'स्वर्गीय' किंवा 'स्वर्गवासी' असा केला जातो.

२) कैलासाचे आकर्षण फारसे कुणालाच नसते. अगदी परक्या व्यक्तीचे निधन झालेली व्यक्ती दूरची, कमी ओळखीची किंवा दूरच्या परिचयातील असेल तर तिचा उल्लेख 'कैलासवासी' असा केला जातो.

३) हरिभजनात रमणाऱ्या, पारमार्थिक किंवा वारकरी सांप्रदायातील व्यक्तीचे निधन झाल्यास तिचा उल्लेख .स्वर्गीय', 'स्वर्गवासी' किंवा 'कैलासवासी' असा न करता 'वैकुंठवासी' असा त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. हे असं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना स्वर्ग, कैलास आणि वैकुंठाचे वेगवेगळे आकर्षण आहे. हिंदू धर्मातील समजुतीनुसार ही तिन्ही ठिकाणं अत्यंत पवित्र असून केवळ पुण्यात्मा असलेल्या व्यक्तिंनाच इहलोकाची यात्रा संपल्यावर या पवित्र ठिकाणी प्रवेश मिळतो अशी धारणा आहे.

सर्वसाधारणपणे कैलास किंवा वैकुंठापेक्षाही स्वर्गाची इच्छा धरणाऱ्या लोकांची संख्या खूप अधिक आहे. असे का? या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर आपणास प्रथम स्वर्गाची संकल्पना नीट समजून घ्यावी लागेल.

स्वर्ग म्हणजे नेमके काय आहे?

स्वर्ग हे ब्रम्हांडातील सर्वात सुंदर, मनोहर, विलोभनीय, नयनरम्य असं एक पवित्र ठिकाण आहे. त्याला 'देवलोक' असंही म्हटलं जातं. स्वर्गामध्ये सर्व सुखं सहज उपलब्ध आहेत.      स्वर्गामध्ये 'कामधेनू' नावाची गाय, 'कल्पतरु' नावाचा एक वृक्ष आणि 'चिंतामणी' नावाचा हिरा अशा अलौकिक गोष्टी आहेत. त्यांच्या सहाय्याने मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करता येते. सर्व चिंतांचे हरण करता येते. तुम्हाला हवी ती गोष्ट क्षणार्धात मिळवता येते. स्वर्गामध्ये खाण्यापिण्याची चंगळ आहे. सोबत मन रिझवणारे नाच, गाणे, संगीत हे सर्व उपलब्ध करण्यासाठी रंभा, उर्वशी सारख्या सर्वांगसुंदर अप्सरा आहेत. थोडक्यात काय तर स्वर्गातली एकूण स्थिती अतिशय संपन्न आणि सुखमय अशीच आहे. स्वर्गात कशाचीही कमतरता नाही, उणीव नाही. दुःखाला स्वर्गात अजिबात स्थान नाही. या देवभूमीचा अर्थात स्वर्गाचा प्रमुख आहे देवांचा राजा देवेंद्र अर्थात साक्षात इंद्रदेव !

स्वर्गामध्ये सर्व काही असलं तरी स्वर्गाचा राजा असलेल्या इंद्रदेवाला आपले इंद्रपद कधीही धोक्यात येईल आणि आपले हे सुख नष्ट होईल, अशी भीती सतत भेडसावत असते. सप्तलोकांतील कुणीही एकनिष्ठ आणि व्रतस्थ राहून भक्ती केली किंवा कुणी घोर तपश्चर्या केली तर लगेच इंद्रदेवाला आपल्या राजपदाला धोका निर्माण होईल अशी भीती वाटू लागते; तात्काळ इंद्रदेव संबंधित देवांची भेट घेवून चर्चा करतात. आपले राजपद सुरक्षित राहावे यासाठी उपाययोजना करतात. कधी एखाद्या देवाला अवतार घेवून किंवा एखाद्या यक्ष किंवा अप्सरेला ही भक्ती किंवा तपश्चर्या भंग करण्याच्या कामगिरीवर पाठविले जाते. अशा अनेक कथा, कहाण्या आपण यापुर्वीच वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असतील. याचा अर्थ स्वर्गामध्ये सुख असलं तरी ते सुख हरवलं जाण्याचं भय मात्र निश्चित आहे ! असं असून सुद्धा समाजातल्या बहुसंख्य लोकांना स्वर्गच हवाहवासा वाटतो. असं का? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का बघा.

स्वर्गामध्ये सुख भरभरुन मिळत असलं तरी ते कधीही हरवलं जाऊ शकतं, या स्वर्गातील वास्तवाचा विचार करतानाच अशाही परिस्थितीत बहुसंख्य लोकांना स्वर्गच हवाहवासा वाटतो. असं का? हा प्रश्न आपण मागील लेखात उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे आणखी काही प्रश्न उपस्थित होऊ शकतील. लेखमालेच्या एखाद्या टप्प्यात आपल्याला त्यांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. तूर्त आजच्या लेखात आपण 'कैलास' आणि वैकुंठ या अन्य पवित्र ठिकाणांची संकल्पना समजून घेणार आहोत. हिमालय पर्वतरांगेत असलेला बर्फाच्छादित कैलास पर्वत म्हणजेच हिंदु समजुतीनुसार सांगितलेले 'कैलास' हे पवित्र ठिकाण होय. भगवान श्री शंकर हे कैलासाचा स्वामी मानले जातात. कैलासात त्यांच्यासोबत माता पार्वती, श्रीगणेश, श्री कार्तिकेय, रिद्धी, सिद्धी असे संपूर्ण कुटुंब वास्तव्य करते अशी एक धारणा आहे. विशेष म्हणजे या कैलासात भगवान शंकराचा नंदी आहे, देवी पार्वतीचा सिंह आहे श्रीगणेशाचा उंदीर आहे आणि कार्तिकेयाचा मोर देखील आहे. इतकेच नाही तर भगवान शंकराच्या गळ्यात भला मोठा सर्पदेखील आहे.

यातून कैलासाचे एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ठ्य स्पष्ट होते ते असे की, कैलास भूमी ही अत्यंत सुरक्षित व भयमुक्त ठिकाण आहे. त्यामूळेच इहलोकी जे एकमेकांचा जीव घेवून स्वतःचे पोट भरतात, ज्यांचे शत्रुत्व अगदीच जगजाहीर आहे असे सर्व जीव आपसातील  वैर विसरुन कैलासात अगदी गुण्यागोविंदाने, सुखाने राहात असल्याचे दिसते. कैलासामध्ये स्वर्गासारखी संपन्नता आढळत नाही. तिथे राहाणाऱ्याला कोणत्याही जीवाला कशाचाही मोह नाही, आशा नाही, अपेक्षा नाही. कोणतीही इच्छा नाही.आसक्ती नाही. कैलासात राहणारे सारेच जीव अत्यंत निर्मोही, निरिच्छ, वासनारहित आणि विरक्त आहेत.

तिसरे पवित्र ठिकाण ज्याला 'वैकुंठ' असे म्हटले जाते त्याबद्दल आता आपण समजून घेवूया. वैकुंठाचा अधिपति आहे भगवान विष्णू.

वैकुंठात प्रचंड समृध्दी आहे कारण तेथे लक्ष्मीचा निवास आहे. भगवान विष्णू प्रत्येकाच्या आनंदासाठी, सुखासाठी स्वतः पुढाकार घेतात. त्यासाठी ते यथोचित अवतार धारण करतात. लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या अडचणी दूर करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. वैकुंठात समृद्धिसोबत शांती आहे आणि त्यामुळेच वैकुंठात निखळ आनंद आहे, समाधान आहे. वैकुंठ भयमुक्त आणि चिंतामुक्त आहे.

असं असताना बहुतेक लोकांना स्वर्गाचेच अधिक आकर्षण वाटते याची कारणमिमांसा करायला हवी. त्यासाठी स्वर्ग, कैलास आणि वैकुंठ याबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीचे नीट पृथ:करण करता यायला हवे. तुम्ही ते तुमच्या पद्धतीने करुन बघा.

आतापर्यंत आपण स्वर्ग, कैलास आणि वैकुंठ या तीन पवित्र ठिकाणांची माहिती घेतली. या माहितीचे पृथःकरण करुन आपण काही निष्कर्ष संक्षिप्त स्वरुपात मांडायचे म्हटले तर ते निष्कर्ष पुढीलप्रमाणे मांडावे लागतील.

१) स्वर्गात सुख आहे. संपन्नता आहे परंतू हे सुख आणि संपन्नता संपण्याचे भय देखील आहे. त्यामुळे स्वर्गात आनंद नाही. समाधान नाही.

२) कैलासात विरक्ती आहे. मोह मायेचे पाश नाहीत. सुख संपन्नता नाही त्यामुळे उपभोग घ्यायला काही नाही. परंतू मुबलक शांती आहे. भयमुक्ततेचे समाधान आहे.

३) वैकुंठात समृद्धिसोबत शांती आहे आणि त्यामुळेच वैकुंठात निखळ आनंद आहे, समाधान आहे. वैकुंठ भयमुक्त आणि चिंतामुक्त आहे.

बहुतेक लोकांना स्वर्गाचा हव्यास का असतो?हा या लेखमालेतून उपस्थित झालेला मुख्य प्रश्न आहे. आजच्या लेखाच्या सुरुवातीला केलेल्या पृथ:करणाचा व निष्कर्षांचा उपयोग करुन आपणास आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येणार आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला माणसाचाही चांगला अभ्यास करावा लागेल. माणसाचा हा अभ्यास केल्यावर आपल्या असं लक्षात येत की, प्रत्येक सजीवाला निसर्गाने 'भूक' दिली आहे. किंबहुना भूक हे सजीवाचे एकमेवाद्वितिय असे व्यवच्छेदक लक्षण आहे. या भुकेलाच आपण इंग्रजीमध्येे Hunger असं म्हणतो. सजीवांमध्येही प्राणी, जनावरे, किडा, मुंगी, वृक्षवल्ली या सजीवांची भूक फक्त अन्नापुरतीच मर्यादित असते. त्यांची भूक पोट भरले की संपते. त्यांना उद्याच्या भुकेची चिंता कधीच नसते. त्यामुळे ते संग्रह करण्याच्या फंदात पडत नाहीत. याउलट माणसाची भूक अमर्याद आहे. माणसाची भूक क्वांटिटी आणि क्वालिटी अशा दोन्ही प्रकारची असते. माणसाला जशी अन्नाची भूक आहे तशीच सत्ता, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, अधिकार, ताकद, शक्ती, पैसा जमीन, संपत्ती, प्रेम, सौंदर्य, यश अशा इतर अनेक गोष्टींची भूक असते. या भुकेला आपण गरज (Need), इच्छा (want), कल्पना (desire ), स्वप्न (dream ), अपेक्षा (Expectations) अशा अनेक नावांनी ओळखतो. माणसाची ही भूक कधीच थांबत नाही. माणसाची इच्छा, आकांक्षा, आवड, गरज यानुसार त्याची भूक सतत बदलत राहाते. त्याची भूक कधीच संपत नाही. एवढेच नाही, तर माणसाची भूक त्याच्या स्वतःपुरती मर्यादित नसते. त्याला मिळालं की त्याचं कुंटूंब, पती / पत्नी, मुले-बाळे, आई-वडील, नातवंडं आजी, आजोबा, भावंड नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सगेसोयरे, शेजारी सहकारी यांनाही मिळावं असं त्याला वाटतं. अशी क्रमाक्रमानं माणसाची भूक सतत वाढत जाते. सारी सुखं त्याला भरपूर प्रमाणात हवी असतात. त्यामुळे त्याला कितीही मिळालं तरी तो समाधानी होत नाही. किंबहूना त्याला समाधानी राहाता येत नाही. माणसाच्या या अमर्याद भुकेमूळे त्याला निर्मोही, वासनारहित, विरक्त अशा कैलासात जाण्याची इच्छा होवूच शकत नाही.

सर्वात महत्वाचं असं की इतरांना मिळण्यापूर्वी म्हणजे सर्वात आधी मलाच मिळालं पाहिजे अशी माणसाची वृत्ती आहे ! तसा त्याचा स्वभाव आहे ! स्वतःची भूक भागविल्याशिवाय माणूस इतरांच्या भूकेचा विचार आणि स्वीकारही करु शकत नाही. माणसाचा हा स्वभाव लक्षात घेता माणसाला वैकुंठात राहणे कदापि आवडू शकत नाही.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे  माणसाला  सतत काहीतरी गमावलं जाण्याची भीती वाटते. या भीतीपोटीच माणूस देवधर्म, दानधर्म या बाबतीत सश्रध्द होतो. माणसाची ही कृती व त्याचा एकूण स्वभाव हा स्वर्गातल्या इंद्रदेवाशी तंतोतंत जुळणारा आहे. कदाचित याचसाठी माणसाला स्वर्ग अधिक जवळचा आणि म्हणूनच हवाहवासा वाटत असतो!

© श्री अनिल उदावंत    
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक    
सावेडी, अहमदनगर    
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel