माणूस म्हणून या जगातल्या आपल्या अस्तित्वाचे नेमके प्रयोजन काय असावे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजवर अनेक महाजनांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. आणि या महाजनांना त्यांच्या या तपस्येमधून मिळालेल्या उत्तराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणखी काही महाजनांनी आयुष्यभर कष्ट घेतले आहेत. असं असूनही आपल्या अवतीभवती असंख्य अज्ञानी जीव आढळून येतात, ज्यांना आपल्या अस्तित्वाचं नेमकं प्रयोजन अजिबात कळलेलं नाही असं म्हणता येईल.

विधात्यानं किंवा जगत्नियंत्यानं निर्माण केलेल्या या सृष्टीला कायम आनंदी ठेवणं हीच सृष्टीतील प्रत्येक लहान मोठया जीवाची जबाबदारी आहे. असं आजवर उपलब्ध झालेल्या समग्र ऐहिक व अध्यात्मिक साहित्य साधनेमधून दृष्टीपथात आलं आहे.

गंमत अशी की, संपूर्ण जीवसृष्टीमध्ये बुद्धी आणि शहाणपणाच्या जोरावर माणूस सर्वात श्रेष्ठ समजला जातो. माणसाला मिळालेल्या या अधिकच्या बुद्धिनुसार सृष्टीला आनंदी बनविण्याची अधिक जबाबदारीही माणसाचीच असणार ही अगदीच निर्विवाद गोष्ट आहे. अर्थात असं असलं तरी त्याच्या अस्तित्वानं सृष्टी आनंदल्याचा सार्वत्रिक अनुभव फारच अल्प म्हणावा असाच आहे. असं का व्हावं ?

असं व्हायचं नसेल तर माणसाला त्याच्या आनंदी जगण्याचं सूत्र समजून घ्यावं लागेल. आजच्या या लेखात आपण हे आनंदी जगण्याचं सूत्र समजून घेवूया.

आनंदी जगण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे.

आनंदी जगणं = F + F + A + F + C + F + F

१) F = Find ( शोधा )

आपण स्वतःचा शोध घ्यायला हवा.मी कोण आहे हे मला माहित असायला हवं. मी एकाच वेळी अनेक भूमिकेत जगत असतो. मी एखादी गोष्ट करताना, एखादा निर्णय घेताना, एखादी कृती करताना माझी त्यावेळची भूमिका मला ठाऊक असली पाहिजे. म्हणजे त्या भूमिकेला साजेसा योग्य असा निर्णय मला घेता येईल किंवा योग्य अशी कृती मला करता येईल.

मला नेमकं काय हवं आहे? माझी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा नेमकी काय आहे? याचाही नेमका शोध आपण घेतला पाहिजे. म्हणजे आपणास जे हवं आहे, त्यावरच आपल्याला आपलं लक्ष केंद्रीत करता येईल. अनावश्यक गोष्टींवर लक्ष दिल्यामूळे वाया जाणारी आपली उर्जा आपणास वाचविता येईल. असं केल्यानं आपणास नकोशा, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहाणं शक्य होईल आणि आपलं सगळं लक्ष सकारात्मक दृष्टीनं आपल्या ध्येयावर केंद्रीत करता येईल.

थोडक्यात मी कोण आहे? माझं ध्येय काय आहे? त्यासाठी मला कोणत्या मार्गानं जावं लागेल? माझा हा मार्ग नेमका कसा आहे? या मार्गावरून जाताना मला कुणाची मदत घेता येईल का? माझ्या मार्गातले अडथळे कोणते आहेत? या अडथळ्यांचं मला काय करता येईल? याचा सतत शोध घेत राहीलं पाहिजे.

२) F = Fix ( निश्चित करा )

पहिल्या F चं उत्तर मिळवताना तुमच्या हातात एका पेक्षा जास्त उत्तरांचे पर्याय आलेले असतील. अशावेळी या सर्व पर्यायांपैकी सर्वात योग्य पर्यायाची निवड करावी लागेल. उदा. आपल्या अनेक इच्छा असतील तर त्यापैकी या क्षणी सर्वात महत्वाची इच्छा कोणती? हे आपणास निश्चित करायला हवं. किंवा मी अनेक भूमिका जगत असलो तरी या क्षणाच्या नेमक्या भूमिकेची निवड करता यायला हवी. असं करताना गरजेची तीव्रता आणि व्यापकतेच्या निकषांवर प्राधान्यक्रम देता यायला हवा.

३) A = Accept  ( स्वीकारा )

नियतीने, निसर्गाने आणि परिस्थितीने आपल्यासमोर उभ्या केलेल्या कमी अधिक प्रमाणातल्या संधी आणि मर्यादा या सर्व गोष्टींचा मनमोकळेपणाने स्वीकार करायला हवा. आपल्याला मिळालेले रंग-रुप, शरीरयष्टि,

आई - वडील व इतर रक्तसंबंधी नातेवाईक, यामध्ये आपण कोणताही बदल करु शकत नाहीत हे वास्तव आपण स्वीकारलेच पाहिजे. आपणास काही शारिरीक व्याधी, व्यंग्य इ. असतील तर त्यांचाही अपरिहार्यपणे स्वीकार करता यायला हवा. आपण एकदा या गोष्टी मनमोकळेपणाने स्वीकारल्या की पुढचे काम अधिक सोपे होते. अनेकदा आपल्याला काही माहिती नसते. आपण अनेक विषयांच्या बाबत अनभिज्ञ म्हणजे अज्ञानी असतो. आपली कौशल्ये फारशी विकसित झालेली नसतात. त्यामूळे आपणास अनेक समस्या उद्भवत असतात. अशा परिस्थितीत आपण या सर्व समस्यांचा देखील स्वीकार करणे आवश्यक असते. आपल्या या स्वीकारामूळे समस्येच्या सोडवणूकीचा मार्ग शोधणे शक्य होते.

४) F = Forgive  ( क्षमा करा )

मानवी मनाची अपरिहार्यता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कशाचा ना कशाची चीड, राग, संताप इ. येत असतो. चीड, राग, संताप या क्रोधाच्या भावनेची बाळे आहेत. क्रोधामूळे निर्माण होणाऱ्या या तिन्ही गोष्टी आपल्या मानसिक स्वास्थ्याचे अपहरण करतात. आपले मानसिक स्वास्थ्य हरवले की आपले मन कमकुवत बनते. हे कमकुवत मन योग्य विचार करण्यास असमर्थ ठरते. त्यातून अविचारांचं वादळ निर्माण होतं. या अविचारानं आपले निर्णय चुकतात. साहजिकच आपण आपल्या ध्येयापासून अधिक दूर जातो. त्यामूळे आपणास चीड, राग, संताप येईल अशा गोष्टी करणाऱ्यास आपण क्षमा करणे अधिक इष्ट ठरते. क्षमा करणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. आपण नेहमीच आपले मोठेपण राखून ठेवून इतरांना क्षमा करायला हवी.

५) C = Confess ( स्वतःची चूक कबूल करा )

आपण माणूस आहोत, आपलेही पाय मातीचेच आहेत. इतरांप्रमाणेच आपणही चूकू शकतो. आपल्या हातून कळत -नकळत झालेली चूक इतरांच्या आणि स्वतःच्याही नुकसानीस सहाय्यभूत ठरते. हे नुकसान होऊ नये म्हणून आपली चूक लपविण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर अशी चूक आपण स्वीकारायला हवी. म्हणजेच आपल्या या चूकीची कबूली नि: संकोचपणे द्यायला हवी. चूक कबूल केल्याने आपल्या मनावरचा ताण हलका होतो. आपण नव्या जोमाने, उत्साहाने कार्य करण्याची उर्मी येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण चूक मान्य केली तरच ती दुरुस्त करता येते. किंबहुना आपली चूक दुरुस्त करुन ती सुधारण्याची अनमोल अशी संधी आपणास मिळते.

६) F = Forget  ( विसरुन जा )

'विसरणं' हा माणसाला मिळालेला शाप आहे ! असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी ते पूर्ण सत्य नाही हेच खरं आहे. माणूस विसरतो, त्याच्या लक्षात राहात नाही, त्याची स्मरणशक्ती कमकुवत आहे. असं आपण अनेकदा ऐकतो आणि अनुभवतोही. मात्र हे सारं आपण म्हणतो तेव्हा संदर्भ वेगळाच असतो. जेव्हा एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायची असते आणि आपण तसं करु शकत नाही, तेव्हा 'विसरणं' हा आपल्यासाठी शाप ठरतो.

वास्तविक, 'विसरणं' ही एक कला असून ती आपल्याला मिळालेलं खूप मोठं 'वरदान' आहे. नाहीतर आपण जन्मापासून काहीच विसरु शकलो नसतो तर कल्पना करा की, आपलं जगणं कसं राहीलं असतं?

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घात, आघात, अपघात, उणीव, अपुरेपणा, कमतरता, पराभव, अपमान, विरह, यासारख्या अनेक दुःखदायक अनुभवांबरोबरच अपयश, निराशा, नाराजी या गोष्टींनी आयुष्य दुःखदायक आणि कष्टदायक होत असते. यातल्या अनेक गोष्टी अनेकदा आपल्या हातातल्या नसतात. त्यांच्यावर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. अशा वेळी हे दुःख धरुन ठेवल्याने अधिक अवजड बनते. म्हणूनच ह्या दुःखदायक गोष्टी विसरुन जाणे आवश्यक असते. काळाच्या ओघात हे दुःख कमी होत असले तरी आपण त्या दुःखाला प्रयत्नपूर्वक विसरायला हवं. म्हणजे उर्वरीत आयुष्याचा आनंद उपभोगता येईल.

७) F = Follow  ( पाठपुरावा करा )

दुसऱ्या क्रमांकाच्या मुद्दयाच्या तपशीलात तुम्ही निश्चित केलेले तुमचे ध्येय, तुमची इच्छा, तुमची गरज यासंबंधाने तुम्हाला व्रतस्थ राहून काम करावे लागेल. जगाच्या स्पर्धेत टिकून राहावं लागेल. त्यासाठी तुम्हीच ठरवलेल्या तुमच्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. योग्य वेळेची वाट पाहात तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल.

वरील चर्चेत नमुद केल्यानुसार आपला जीवन मार्ग अनुसरणाऱ्याला आयुष्य आनंदात जगता येईल याबाबत मला ठाम विश्वास वाटतो.

# लेखक #
© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : 97666 68295

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel