"सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का"
या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या हे विरहगीत
वाटलं तरी ते वेगळ्या उद्देशाने म्हटलेले गीत पण त्यामागची
भावना "एकांत"ला खुणावत असावी खरचं एकांत मग तो विरहातून निर्माण झालेला असो वा अन्य कारणांमुळे असा एकांत केवळ दुःख देवून जातो कि त्याचे इतर ही पैलू आहेत याचा सहजच विचार आला....
अंतापेक्षा एकांतालाच माणूस जास्त घाबरतो म्हणतात पण त्याची दुसरी बाजू ही सकारात्माकता देवून जात असावी
बघा ना!! सततच्या धावपळीनंतर थोडासा एकांत हवा असतोच कि हा एकांत आपला दृष्टीकोन बदलण्यास पूरक ठरुच शकतो. काही कटू-गोड आठवणीमधे मन रमू लागते अन्  सगळ्याची गोळाबेरीज करता करता कुठल्याश्या निष्कर्षापर्यत पोहोचते . मनाची घालमेल करत स्वतः च्याच मनाला समजावाणारा हा "एकांत" आपल्याच व्यक्तीमत्वात भर घालतो.
प्रियकराला प्रेमाची ओढ लागते आणि आपल्या प्रेमाच्या भावविश्वात रंगून जाताना प्रेयसीच्या सुखद आठवणी देणारा हा एकांत क्षणभर का होईना त्याचे आयुष्य सुखावून टाकतोच कि.....!!
घरात कोणी नसताना मला एकट्याला राहून हवे तसे बागडता यावे म्हणून " एकांत" मागणारी  ही  किशोरवयीन मुले ही अपवाद नाहीत..
नातेसंबधातील  शेजारी पाजारी सखेसोबती मधील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता करता जी बाकी उरते ती सुद्धा एक प्रकारचा " एकांतच" ज्यात नात्यांची माळ गुंफता गुंफता एखादं शिल्लक राहिलेलं फूल बघून मन त्या फुलातील संवेदना टिपू लागते मन शून्यात जाते ते या एकांतातच...

आयुष्यात काय मिळवले हा विचारही या एकांतातच होतो अन् मग अजून थोडं जगायला हवं असं वाटून मन पुन्हा नव्या उमेदीनै आयुष्याकडे बघायला लागते तो ही एकांतच..प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नकळत समृद्ध करत जातो.

बालपणी हसताना बागडताना हवा असलेला एकांत वेगळ्या  गोष्टीकडे धाव घेणारा तर तरुणपणी वेगवेगळ्या गोष्टीकडे झेपावणारा काहीतरी करण्याची स्वपने बघणारा
तर मध्यवयातआत्तापर्यत काय मिळाले? काय गमावले? ह्याचा विचार करणारा पण तरीही प्रत्येक वेळी काहीतरी देवून जाणारा त्या त्यावेळी मिळलेल्या अनुभवातून आत्मप्रगती साधणारा असा हा एकांत....

मग एकांत म्हणजे एकटेपणा कसा  होईल व्यक्तीनुसार त्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात इतकेच....!!

आपले भावनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी या एकांताची खूप गरज असते त्यामुळे सततच्या ताणामुळे होणारी कोंडी फुटून मनाची प्रसन्नता वृत्तीची प्रसन्नता समतोलता राखता येते. योग्य प्रमाणात पडणारे मीठ जसे अन्नाला चव आणते तसेच हा एकांत..आत्मचिंतनासाठी उपयोगी पडातोच....एकांत ज्याचा कधीच अंत नाही.

अध्यात्मवादी  पातळीवर विचार केला तर त्याचे अनेक कंगोरे सांगता येतील...माणूस एकटा येतो एकटाच जातो मधल्या प्रवासातील गोष्टी इथेच सोडून देतो असा विचारही या एकांतामुळेच आयुष्याचा जमाखर्च मांडणारा एकांत एकदा तरी यायलाच हवा का ?..

सुख-दुःखाचा भास निर्माण करणारा हा एकांत...कवीच्या तरल भावना जागृत करणारा, चित्रकाराच्या कुंचल्याने रेघा मांडत आयुष्याची सहजता पटवणारा तर लेखकाच्या लेखणीतून एखाद्याच्या आयुष्याला आकार देणारा ठरतो मात्र त्याची जाणीव मनाला हवी. जसे मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते पण ती दिसत नाही तसे मनातच सुख नसेल तर जनास जगात कोठून दिसणार? मग हाच एकांत एक भयाण बीभत्सरुप धारण करुन माणसाला नको त्या अमीषांकडे झुकवतो एकांताची नकारात्मकता ज्यात अधपतन होवू शकते यासाठी मनाची बैठक असावी लागते ती केवळ विचांरावर  मनाचा सुसंस्कारीत पणाच असावा लागतो मग आयुष्यात आपली वर्तणूक आणि वागणूक हे त्याचे उपयोजन म्हणता येईल...कारण महागडी गोष्ट म्हणजे आयुष्य जे आपण उधळत असतो याचा सकारात्मक विचार करता येतो तो या एकांतामुळेच....
कुणाचे दोष चुका दाखवताना मन दोन्ही बाजूने विचार करते मनाच्या चौथ्या कप्प्यात साचवून ठेवलेल्या  आठवणींना बोलकं करणारा हा एकांत..मनाची मरगळ दूर करण्यासाठी कर्म साधना यातून विचारांची बैठक मिळवता येते ती या एकांतातच मग मन उभारी घेतं .

रोजच्या धावपळीतही झोपताना पाच मिनीटे ईश्वरासाठी  निर्भय आनंदी आयुष्य चे साकडे पुन्हा नवीन होण्यासाठी घालतो तो ही एकांतच....घडवतो माणसांची जगाची रोज थोडी थोडी करत ओळख देतो ख-या अर्थाने मुखवट्यांच्या या जगात खरा चेहरा होवून जगवतो तो हा एकांत...
आयुष्याचे अंकगणित चुकले असे न म्हणता सकारात्मक व्हायला शिकवतो तो एकांतच तोंडीलावण्यापुरता हवाच नाहीतर आयुष्य बेचव होवून जाईल मर्यादा आखून देणारा नाहीतर मन दाहीदिशांना पळत राहिल आत्मचिंतन करायला लावणारा एकांत ...एकांताचा असाही विचार करता येईल ...

तुमच्या माझ्या मनातील सहजच येणारी भावना एकांत या एकांतातच व्यक्त झालेली ही भावना ....एकांताला एकटेपणा म्हणून त्या भावनेचा अनादर न करता अनुभवून बघा स्वतः साठी...सगळे स्वतः तच...!!

कुणाला गर्दीत हरवून आपलं अस्तित्व इतरांच्या आवडीनुसार समाजात टिकवून राहण्यासाठी च हवं असतं तर कुणाला कधी कधी स्वतःत हरवणारा हा एकांत च आपली ओळख अस्तित्व आपलं हे दाखवणारा मैलाचा दगड ठरतो तो व्यक्ती सापेक्ष प्रसंगानुरुपही आलेला असेल शेवटी  तो कसा घ्याल यावर त्याचे यश असा हा एकांत...बघा पटलं तर....!!

व्यक्तीनुसार संकल्पना बदलतीलच त्याचा ही आदर....

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel