"शब्दावाचून कळले सारे,
शब्दांच्या पलीकडले"

खरच शब्द शब्द म्हणजे तरी काय असते, एकमेकांच्या मनातील तरी काय असते एकमेकांच्या मनातील गुज ओळखण्याचे एक साधन पण कधी कधी ह्या शब्दांविनाही संवाद करणे सहज सोपे जाते. अगदी एकमेकांशी न बोलताही आपण एखाद्या व्यक्तीने मनातील भाव सहज ओळखतो. हाच शब्दाविण संवाद देहबोली प्रेमाची भाषा असते, बघा ना, आई वडिलांना पाहून त्यांच्याकडे धावत जावून त्यांचेवर झेप घेणारी लहान मुले कडेवर बसून टाटा करणारी बोलता न येणारी मुले हाच शब्दावाचून संवाद साधत असतात. त्यांचे हावभाव त्यांची नजर आपल्याला सर्व काही सांगत असते. त्यांचे ते डोळे आपल्याशी सतत काहीतरी बोलत असतात असे जाणवते हाच शब्देविण संवाद.

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात ते खरच आहे, शब्द संवादाशिवाय ही आपण त्याच्या देहबोलीवरून माणसाला ओळखू शकतो. संथ किंवा पाय आपटत चालणारी माणसे, तर दिलखुलासपणे पायावर पाय टाकून खुशीत बसणारी माणसे ही शब्दावाचूनच बोलत असतात. हात जोडून नमस्कार करणे, एखाद्याला वा छान म्हणताना अंगठा व पहिले बोट जोडून दाखवणे, हासत्या चेहऱ्याने एखाद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे, थोडक्यात काय "त" वरून ताकभात ओळखणे येणे म्हणजेदेखील शब्देविण संवादच...

अगदी वधू परीक्षेत वधूचे वराकडे सलज्ज बघणे, एकमेकांच्या नजरेतून एकमेकांशी ओळख करून घेणे हा देखील शब्देविण संवादच... शब्दांशिवाय देखील आपण एखाद्याच्या मनातील आपले स्थान आपण ओळखू शकतो, मात्र ह्या शब्दांचे महत्व देखील दुर्लक्षित करून नाही चालणार. स्वप्नात केलेल्या दानाबद्दल राजा हरिश्चंद्राने शब्द पाळून आपले राज्य दान देऊन टाकले, भीष्माने आपली प्रतिज्ञा खरी केली. ही उदाहरणे ह्या शब्द देण्याची आता मागे पडली, आपण आज दिलेला "शब्द" पाळतो का? हा वादाचा मुद्दा होवू शकतो. "शब्दाची बूज राखणे" , "प्राण जाए पर वचन न जाए" असले शब्द फक्त पुस्तकाच राहिले आहेत असे वाटते.

व्यवहारात दुसऱ्याकडून आणलेली वस्तू, उसने घेतलेले पैसे, याचे आश्वासन आपण देतो पण तो शब्द कितपत पाळतो? एखाद्याला आता  शब्द देवून, नंतर बघू असे म्हणत आपण हसण्यावारी नेतो, एखाद्याला झुलवत ठेवणे, खोटे बोलणे कितपत योग्य आहे ही विचारातील गोस्ट आहे. मग इथे शब्देविण संवाद नाही तर शब्दांची किंमत करणे असेच म्हणावे लागेल. शब्द म्हणजे वाणीतून बाहेर पडलेले एक अमोघ शस्त्र, बोलताना आपल्यामुळे दुखवतो आहे का? ह्याचा विचार महत्वाचा, एखाद्याची स्तुती करताना आपण आपल्या शब्दांने दुसऱ्याला नकळत दुखावत तर नाही ना हे महत्वाचे इथे "शब्द म्हणजे शस्त्र" असे म्हणता येईल, शब्द कधीच नाश पावत नाहीत, आज आपण या शब्दांचा गैरवापर दुसऱ्याशी बोलताना करतो, त्याचा विचार व्हायला हवा, कारण शब्द माणसाला घडवू शकतात तर प्रसंगी कोलमडूही शकतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर वाणीतून बाहेर पडणारे हे शब्द नाश पावत नाहीत तर हवेत विरुन जातात, म्हणूनच आपल्या स्वरातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा बहुमूल्य आहे त्याची किंमत करता यायला हवी, दुसऱ्याला कुरूप म्हणून आपण सुंदर होणार नसतो ना, मग प्रत्येक शब्दमागील शक्ती आपल्याला जाणवेल. आपले आध्यात्मदेखील शब्दांचे महत्व सांगतेच की उपासना, नामजप ही सर्व वेदवाणी शब्दांचीच तर किमया आहे हे उच्चारल्याने त्यामागील शक्ती कळते. शब्दांमुळेच आत्मसाक्षात्कारही होतील असे ही म्हणता येईल.

अनेक दाखले शाप, वरदान, आशीर्वाद रुपात आपल्या पुराणातील कथांत आहेत ही काय आहे सर्व शब्दांचीच किमया... शब्द आयुष्यात सुरेलपणा आणतात तर कधी जीवघेणा खेळही करतात, कधी शब्देविण संवाद आपली कळी खुलवतो, तर कधी हेच शब्द शस्त्र होवून आपल्यावर हावी होतात, तर कधी या शब्दांची जादू आपल्याला उच्च ईश्वरी शक्तीची अनुभूतीही देवू शकते. तेव्हा ह्या शब्दांना सांभाळले पाहिजे, आपल्या स्वरयंत्रातून निघणारा प्रत्येक स्वर शब्द होवून बाहेर पडताना एखाद्या फुलाप्रमाणे सुगंध देवून हवेत विहरत गेला पाहिजे ही काळजी प्रत्येकाने घेतली, स्वतःसाठी तर ही शब्दांची जादू आयुष्य सुरेल करेल. एखाद्या खडीसाखरे प्रमाणे जिभेवर रेंगाळणारे हे शब्द दुसऱ्याशी बोलताना आपले नाते अधिकच वृद्धिंगत करत जातील, मात्र त्यासाठी संवाद हवा तरच या शब्दांची जादू दुसऱ्यापर्यंत पोहोचेल व दुसऱ्याला समजतील. आपले तंत्र या शब्दांमुळे, कधी शब्दांविना सुखकर होईल,

मग आपण म्हणू

"शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले,      
शब्दांसाठी शब्द होवून संवादातलेच खरे..."

बघा, शब्दांची दुनिया पडताळून पटली तर...

कारण शब्द म्हणजे ताल, सूर, भावना हेच जगण्याचे सामर्थ्य पण त्याचा वापर जपुनही करायला हवा.

"शब्द शब्द जपुनी टाक बकुळीच्या फुलापरी", हे खरेच आहे.

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel