या सुत्तांत विहितशीलाचा बराच मोठा भाग आला आहे. येथे सांगितलेल्या कित्येक मंगलांचा अशोक राजानें आपल्या शिलालेखांत धम्म या सदराखाली उल्लेख केला आहे. ९ व्या शिलालेखांत तो म्हणतो:-

आवाहविवाहेसू वा पुत्रलोभसु वा प्रवासम्हि वा एतम्हि च अञ्ञाह्मि च जनो उचावचं मंगलं करोते। निरथं च मंगलं करोते। अपफलं तु खो एतारिसं मंगलं। अयं तु महाफले मंगले, या धंममंगले। तत दासभतकम्हि सम्यप्रतिपती, गुरूनं अपचिति साधु, पाणेसु संयमो साधु, ब्राह्मणसमणेसु साधु दानं।

लग्नकार्‍यांमध्यें, पुत्रलाभ झाला असतां, प्रवासास निघण्याच्या वेळीं, व अशाच तऱ्हेच्या अन्य प्रसंगीं, लोक मोठ्या समारंभानें मंगल करीत असतात, पण तें निरर्थक होय. तशा प्रकारचे मंगल अल्पफलदायक आहे; परंतु महात्फळ देणारें मंगल म्हटलें म्हणजे धर्ममंगल होय. (तें कोणतें?) दास आणि भृत्य यांनां चांगल्या रीतीनें वागविणें; गुरुजनांची सेवा करणें हें चांगलें;  प्राणिहिसेंविषयी मनाचा संयम करणें हें चांगलें; ब्राह्मणाला आणि श्रमणांला दानधर्म करणें हें चांगलें.

पति आणि पत्नी, मातापिता आणि पुत्र, गुरू आणि शिष्य, धनी आणि नोकर इत्यादिकांचीं परस्परांसंबंधी काय कर्तव्यें आहेत, याचें वर्णन सिगालसुत्तांत केलें आहे. या सिगालसुत्ताचें मराठी रूपांतर आपण अवश्य पाहावें. १ (१ परिशिष्ट १ पहा.)

निषिद्धशीलांत प्रथमारंभी गृहस्थांनीं आणि गृहिणींनी नित्य पाळावयाचे ५ नियम येतात. (१) प्राणघात न करणें; (२) अदत्तादान [चोरी] न करणें; (३) व्याभिचार न करणें ; (४) खोटें न बोलणें; व (५) दारू वगैरे मादक पदार्थाचें सेवन न करणें. या पांच गोष्टी बौद्ध म्हणविणारानें वर्ज्य केल्या पाहिजेत.

दोन्ही अष्टमी, पौर्णिमा व कृष्ण चतुर्दशी या चार दिवसांस उपोसथ दिवस असें म्हणतात. या दिवशी जे गृहस्थ आणि गृहिणी धर्मचिंतनांत काल घालवितात, त्यांना अनुक्रमे उपासक आणि उपासिका असें म्हणतात. उपासकांना आणि उपासिकांना या दिवशीं पाळण्यासाठी बुद्धांनी आठ नियम घालून दिले आहेत, त्यांचाहि निषिद्धशीलांत अंतर्भाव होतो. ते नियम येणेंप्रमाणें:- (१) प्राणघात न करणें; (२) चोरी न करणें; (३) अब्रह्मचर्य न करणें [म्हणजे ब्रह्मचारी राहणें]; (४) खोटें न बोलणें; (५) दारू वगैरे मादक पदार्थाचें सेवन न करणे; (६) मध्यान्हानंतर न जेवणें; (७) नृत्य, गीत वगैरे कामविकार उद्दीपित करणार्‍या गोष्टी न पहाणें व मालागंधादि [चैनीच्या] पदार्थांचें धारण न करणें; (८) उंच आणि मोठ्या बिछान्यावर न निजणें.
या नियमांपैकीं १ ला, २ रा, ४ था व ५ वा, हे चार नियम पूर्वी सांगितलेल्या नियमांत आलेच आहेत. पांच नियमांतील ३ र्‍या नियमांत व्याभिचार करूं नये अशी आज्ञा आहे; पण येथील ३ र्‍या नियमाप्रमाणे उपोसथाच्या दिवशी ब्रह्मचारीच राहिलें पाहिजे. वर सांगितलेल्या चार दिवशीं उपोसथ पाळण्यास सवड नसेल तर तो गृहस्थांनी आण गृहिणींनीं वाटेल त्या दिवशीं पाळण्यास हरकत नाहीं. ब्रह्मदेशांत आजकाल ज्या गृहस्थांना ऑफिसच्या वगैरे कामामुळें वर सांगितलेल्या चार दिवशी उपोसथ पाळण्याची सवड होत नाही ते रविवारी उपोसथ पाळीत असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel