बोधिसत्त्व पुढें म्हणतो :-

पगाळ्हा येत्थ न दिस्सन्ति एते समणब्राह्मणा।
तं च मग्गं न जानन्ति येन गच्छन्ति सुब्बता।।१।।


(१) (हे मार) हे सगळे श्रमण आणि ब्राह्मण तुझ्या सेनेंत बुडून गेले आहेत; त्यामुळें ते (शीलादि गुणांनी) प्रकाशत नाहीत, व त्यांनां ज्या मार्गानें महर्षि जातात तो मार्ग ठाऊक नाहीं.

यं तेतं नप्पसहति सेनं लोको सदेवको।
तं ते पञ्ञाय गच्छामि१ (१ `गच्छामि’ हा सिंहली पाठ कांही ब्रह्मी पुस्तकांत `वेच्छामि’ असा सांपडतो. परंतु सेस्सामि (संस्कृत- सेत्स्यामि) हा इतर ब्रह्मी पुस्तकांत आढळणारा पाठ अधिक संयुक्तिक दिसतो. सिध् धातूचा जिंकणे असाहि अर्थ आहे. या श्लोकाचें संस्कृत रूपांतर ललितविस्तरांत दिलें आहे तें असें :-

या ते सेना धर्षयति लोकमेनं सदेवकं ।
मेत्स्यामि प्रज्ञया तां ते आमपात्रमिबाम्बुना ।।
) आमं पत्तं व अम्हना ।।२।।

(२) या तुझ्या सेनेपुढें देव आणि मनुष्य उभे राहूं शकत नाहीत. तिचा, दगडानें कच्च्या मातीचें भांडे फोडून टाकावें त्याप्रमाणें, मी प्रज्ञेनं पराभव करून टाकतों.

येथें हा मार कोण, हें आपणांस सांगण्याची आवश्यकता नाही. मार म्हणजे मारणारा. तो वर सांगितलेल्या सेनेच्या साहाय्याने मनुष्याच्या सद्वासनांचा नाश करितो. त्याचा जय करणें म्हणजे आत्मजय करणें होय. हा जय बाह्य शत्रूंवर मिळविलेल्या जयापेक्षां किती तरी पटीनें श्रेष्ठ आहे.

याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या माराशी सारखा झगडा चालला होता. पुढें वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशीं सुजाता नांवाच्या कुलीन स्त्रीनें दिलेला दुधाचा पायस सेवन करून तो एका बोधिवृक्षाखाली (पिंपळाच्या झाडाखालीं) गेला. त्या रात्री त्यानें माराचा पूर्णपणें पराभव करून जगदुद्धाराचा धर्ममार्ग शोधून काढला. तेव्हां मार म्हणाला:-

सत्त वस्सानि भगवंतं अनुबंधिं पदापदं।
ओतारं नाधिगच्छिस्सं संबुद्धस्स सतिमतो।।१।।

सात वर्षेपर्यंत सतत भगवंताच्या मागें सारखा लागलों होतों, परंतु या विवेकी (स्मृतिमान्) बुद्धाचें कांहीच वर्म सांपडलें नाहीं.

तस्स सोकपरेतस्स वीणा कक्खा अभस्सथ ।
ततो सो दुम्मनो यक्खो तत्थेवंतरधायथा ति ।।१।।


याप्रमाणें मार शोकानें व्याकूळ झाला असतां त्याच्या काखेंतून वीणा गळून पडला. तेव्हां तो मार अत्यंत दु:खी होत्साता तेथेंच अंतधार्न पावला!

माराचा पराभव करून धर्ममार्ग शोधून काढल्यावर बोधिसत्त्व बुद्ध झाला. येथून पुढें त्याला संबुद्ध, तथागत, सुगत, धर्मराज, मारजित्, जिन इत्यादि संज्ञा लावतात. हा मार्ग त्यानें आपल्या वयाच्या ३६व्या वर्षी शोधून काढला. यापुढील हकीगत महावग्ग ग्रंथांत दिली आहे. महावग्ग ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर१ (१ Saored Books of the East. Vol, XIII & XVII.) उपलब्ध आहें, तें ज्यांनां इंग्रजी येत असेल त्यांनी अवश्य पहावें. महावग्गांतील विस्तृत वर्णन येथें देण्यास सवड नाहीं, तथापि त्यापैकी कांही गोष्टींचा येथें उल्लेख केल्यावांचून राहवत नाहीं.

धर्मज्ञान झाल्या दिवसापासून भगवान बुद्ध सात दिवसपर्यंत मोक्षरसाचा अनुभव घेत त्याच आसनावर बसला होता. सातव्या रात्रीच्या शेवटल्या प्रहरी त्यानें असा आनंदोद्गार काढिला :-

यदा हवे पातुभवन्ति धम्मा आतापिनो झायतो ब्राह्मणस्स।
विधूपयं तिट्ठति मारसेनं सुरियो व ओभासयमंतळिक्खं ति।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel