हिंसास्तेयान्यथाकामं पैशुन्यं परुषानृते।
सभिन्नालापव्यापादमभिध्यादृरिवपर्ययम् ।
पापं कर्मेति दशधा कायवाङ्मानससैस्त्यजेत् ।।


हिंसा, स्तेय (चोरी), व्याभिचार, चहाडी, कठोर भाषण, असत्य भाषण, वृथा बडबड, व्यापाद (क्रोध); परधनचिंता आणि मिथ्यादृष्टि (नास्तिकता) या दहा पापांचा कायेनें, वाचेनें आणि मनानें त्याग करावा.

वाग्भट हा जरी बौद्ध होता तरी बौद्धधर्म लोकांनीं पाळावा या हेतूनें या दहा पापांचा त्याग करण्यास त्यानें सांगितलें नाही. आरोग्यप्राप्तीला या दहा पापांचा त्याग अत्यावश्यक आहे असें त्यांचे म्हणणें आहे.

या दहा पापांच्या त्यागाला पालिभाषेंत मनुष्यधर्म असें म्हटलें आहे. यावरून व वरील दोन उताऱ्यांवरून आपणांस असें दिसून येईल कीं, प्राचीन कालीं या देशांत या दहा पापांचा त्याग सर्वसंमत झाला होता. नागरिकत्वाला पोहोंचण्यास या पापांचा त्याग आवश्यक आहे असें सर्वांस वाटे. तेव्हां, सभ्यगृहस्थ हो, सर्व पंथांच्या लोकांनां पसंत पडण्यासारखा हा दशपापकर्मांचा त्याग आपण आपल्या तरुण पिढीस कृतीनें आणि शब्दांनीं शिकविण्यास कोणती हरकत आहे?

याप्रमाणें निषिद्धशीलाचें स्वरूप थोडक्यांत आपणासमोर ठेविलें आहे. या सर्व शीलाचे- विहित आणि निषिद्ध शीलाचे- पुन: हीन, मध्यम आणि उत्तम असे तीन भेद केले आहेत. कीर्तीच्या आशेनें पाळलेले शील हीन, पुण्यफळाच्या आशेनें पाळलेलें मध्यम व हे माझें कर्तव्यच आहे अशा भावनेनें पाळलेलें उत्तम समजावें. ‘मी मोठा शीलवान्’ हे दुसरे लोक दु:शील आहेत, हे पापी आहेत,’ अशा प्रकारें ज्या शीलाचा आत्मस्तुति आणि परनिंदा करण्यांत उपयोग होतो, तें हीन शील, ज्याचा असा उपयोग होत नाहीं परंतु जें ज्ञानयुक्त नाहीं, तें मध्यम, व प्रज्ञापूर्ण शील उत्तम जाणावें. आपणांस दुसर्या जन्मीं सुख मिळावें म्हणून पाळलेलें शील तें हीन, आपणाला मोक्ष मिळावा या हेतूने पाळलेलें मध्यम व सर्व प्राणिमात्राच्या हितासाठी पाळलेलें शील उत्तम होय.

आणखी या शीलाचे हानिभागि, स्थितिभागि, विशेषभागि आणि निर्वेद्रभागि असे चार भेद करितात.

योध सेवति दुस्सीले सीलवन्ते न सेवति।
वत्थुवीतिक्कमे दोसं न पस्सति अविद्दसु ।।
मिच्छासंकप्पबहुलो इंद्रियानि न रक्खति।
एवरूपस्स वे सीलं जायते हानभागियं।।


जो अविद्वान मनुष्य पाण्यांचा सहवास करितो आणि शीलवंतांच्या समागमांत राहात नाही. जो नियमभंगाची परवा करीत नाहीं. ज्याच्या मनांत विशेषत: पापविचार घोळत असतात, व जो आपल्या इंद्रियांचे रक्षण करीत नाहीं, त्याचें शील हानिभागी होतें.

यो पनत्तमनो होति सीलसंपत्तिया इध।
कम्मठ्ठानानुयोगम्हि न उप्पादेति मानस।।
तुठ्ठम्स सीलमत्तेन अघटन्तस्स उत्तरि।
तस्स तं ठितिभागियं सीलं भवति भिक्खुनो।।


जो कोणी शीलसंपत्तीनें आनंदित होतो, ध्यानसमाधि साध्य करण्याचा विचार करीत नाहीं, जो शालीनेंच संतुष्ट होऊन पुढील प्रयत्न सोडून देतो, त्या भिक्षूचें ते शील स्थितिभागी होतें.

संपन्नसीलो घटति समाधत्थाय यो पन।
विसेसभागियं सीलं होति एतस्स भिक्खुनो।।

जो शीलसंपन्न भिक्षु समाधि साधण्यासाठी प्रयत्न करितो त्याचें तें शील विशेषभागी होतें.

अतुट्ठो सीलमत्तेन निब्विदं योनुयुंजति।
होति निब्बेधभागीयं सीलमेतस्स भिक्खुनो ।।


ज्या भिक्षूची केवळ शीलानें तृप्ति होत नाहीं, व जो सतत वैराग्यमय प्रज्ञेच्या प्रयत्नास लागतो, त्या वें तें शील निर्वेधभागी१ (१ निर्बेधभागी म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार करून देणारें) होते.

हे चार भेद भिक्षूंस उद्देशून सांगितलें आहेत. तथापि ते गृहस्थ आणि गृहिणी यांनांहि लागू पडतात. हे व पूर्वीचे तीन भेद सांगण्याचें कारण हेंच कीं, आम्हीं आपलें शील हीन किंवा हानिभागी होऊं न देतां उत्तरोत्तर वरच्या पायरीचें होत जाईल अशाविषयीं प्रयत्न करावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel