जो छंद, द्वेष, मोह किंवा भय यामुळें धर्माचें अतिक्रमण करीत नाहीं, त्यांचें यश शुक्लपक्षांतील चन्दाप्रमाणे वाढत जातें.

‘‘आतां संपत्तिनाशाचीं सहा द्वारे कोणतीं तें सांगतों. (१) सुरादि मादक पदार्थाचें सेवन; (२) अवेळी बाहेर भटकणें; (३) नाटक तमाशे पाहाण्याचें व्यसन; (४) जुगार खेळणे; (५) पापमित्रांचीं संगति, आणि (६) आळस. या सहा संपत्तिनाशाच्या द्वारांचें त्यानें सेवन करतां कामा नये.

‘‘हे गृहपतिपुत्र! धनाचा नाश करणारी, कलह वाढविणारी, रोगाचें माहेरघर, अकीर्तीची आई, लज्जेचा विध्वंस करणारी आणि प्रज्ञेला दुर्बळ करणारी अशी ही सुरा आहे. या वारुणीच्या नादाला जो लागला तो लवकरच आपला नाश करून घेतो.

‘‘अवेळीं बाहेर हिंडण्याची ज्याला संवय लागली त्याच्या दृष्टीने स्वत:चे संरक्षण होत नाहीं; मुलांबाळांचेंहि संरक्षण होत नाहीं; संपत्तीचें रक्षण त्याजकडून होत नाहीं. तो रात्रंदिवस साशंक असतो; खोटें बोलण्याची त्याला सवय लागते. पुष्कळशी संकटें तो आपल्यावर ओढून घेतो.

‘‘नाटकतमाशांचे ज्याला व्यसन लागलें तो आज कोठें नाच, कोठें गायन, कोठें तमाशा आहे त्याच्या चौकशीला लागतो, आणि गृहकृत्यें करण्याला त्याला मुळीच सवड मिळत नाही.

‘‘जुगा-याला जुगारांत तर पैसा मिळाला तर त्या पैशाबरोबरच तो दुसर्यांचे वैर संपादन करतो. त्यांत पैसा घालविला तर त्याचा तो शोक करीत बसतो. जुगार्याच्या वचनावर कोणी विश्वास ठेवीत नाही. आप्तइष्ट त्याचा तिरस्कार करतात. जुगारी तरुणास ‘हा काय जुगारडा बायकोला पोसणार?’ असें म्हणून कोणी मुलगी देत नाहीं.

‘‘पापमित्राची ज्याला संगत घडली त्याला जुगारी, मद्यपि, चोर, ठक या सर्वाची क्रमाक्रमानें संगत घडते आणि अशा प्रकारचे मित्र त्याच्या नाशास कारण होतात.

‘‘आळशी मनुष्य ‘आज फार थंडी आहे’ म्हणून काम करीत नाही; ‘आज फार ऊन पडलें आहे’ म्हणून काम करीत नाही; ‘आज सांज फार झाली आहे’ म्हणून काम करीत नाहीं;  ‘आज भूक लागली आहे’ म्हणून काम करीत नाहीं; ‘आज फार थकवा आला आहे’ म्हणून काम करीत नाहीं. अशा प्रकारें आळस केल्यामुळें त्याला नवीन तर कांहीं प्राप्ति होत नाहींच, पण मिळालेलें धन मात्र नाश पावतें.

अतिसीतं अतिउण्हं अतिसायमिदं अहु।
इति विस्सठ्ठकम्मंते अत्था अच्चेन्ति माणवे।।


फार थंडी, फार उन्हाळा, फार सांज झाली म्हणून जे तरुण काम करणें सोडून देतात त्यांना संपत्तिहि सोडून जातात. परंतु,

योध सीतं च उण्हं च तिणा भीयो न मञ्ञति।
करं पुरिसकिच्चानि सो सुखा न विहायति।।

जो थंडीची आणि उन्हाळ्याची गवतापेक्षां जास्त किंमत समजत नाहीं आणि उद्योग करीत राहतो तो सुखापासून दूर होत नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel