'नाही तरी ती काय मोठी सुखात होती? नदीत जीव द्यायला निघालेली ती एक भिकारीण. थोडे दिवस तरी मी तिला सुख देत आहे. माझ्या मोठया घरात ती आनंदाने राहत आहे आणि लवकरच तिला मूल होईल. माझे हेतू पूर्ण होतील. मी मेलो तरी तिच्याजवळ तिचे बाळ राहील. त्याच्यासाठी ती जगेल. जगण्यासारखे तिच्याजवळ काही नव्हते. आता असे तिला वाटणार नाही. मी तिला इतर इस्टेट जरी ठेवली नाही, तरी ही अमोल संपत्ती देऊन जाणार आहे.' असे बाळा त्यांना उत्तर देई.
सावित्री घरातील सारे काम करी. ती थकून जाई. एके दिवशी तिला बरे नव्हते. ती आडवी झाली होती. बाळा बाहेरून आला तो संतापून आला होता. कोणी तरी त्याचा अपमान केला होता. अपमानाचा सूड घ्यायला घरातील बायकोशिवाय दुसरी जागा त्याला नव्हती. तो आला तरी सावित्री उठली नाही. बाळाला तो अधिकच अपमान वाटला.
'मी बाहेरून आलो, दिसत नाही का? ऊठ की जरा. बाहेर त्या गाईला चाराही घातला नाहीस. तिचे शेणही ओढून ठेवले नाहीस. मोलमजुरी ना करीत होतीस? तेथे सुखात लोळायला आलीस? ऊठ.'
'मला बरे वाटत नाही. पोटही जरा दुखत होते. पुरुषांना काय कळे?'
'अधिक बोलू नकोस. बायका नि गोठयातील गायी सारख्याच. ऊठ, का मारू कंमरेत लाथ? तीन बायका मेल्या; परंतु माझ्यापुढे त्या ब्र काढीत नसत. थरथरत असत. तू चुरूचुरू बोलतेस. झोडपून काढीन. ऊठ.'
बिचारी सावित्री उठली. जगात कोणी प्रेम करायला नाही म्हणून तिने हे लग्न केले. परंतु येथे निराळेच धिंडवले सुरू झाले. ती गोठयात गेली. गायीला पाणी पाजले; तिला चारा घातला; शेण ओढून ठेवले. ती घरात आली. दाव्याला बांधून ठेवलेली गाय; आपणही तशाच, असे तिच्या मनात आहे. लग्नापूर्वी ती स्वतंत्र होती. आज तेही स्वातंत्र्य राहिले नाही. या नव्या नव-याच्या लहरीप्रमाणे तिला राहणे प्राप्त होते.
काही दिवस गेले. सावित्री आता लौकरच बाळंतीण होणार असे दिसत होते. एके दिवशी रात्री भाकर खाताना बाळा तिला म्हणाला,
'मुलगा झाला तर बरे आहे. मुलगी झाली तर बघ. तुला त्या मुलीसह देईन विहिरीत ढकलून; नाही तर त्या गुणगुणीच्या डोहात. त्या डोहातच जीव द्यायला जात होतीस. होय ना? विचार करून ठेव. पोटी मुलगा आला पाहिजे. त्याचे नाव गोपाळ ठेवीन. या गोपाळपूरचा तो राजा होईल. समजले ना?'
'परंतु माझ्या हातचे का आहे?'
'मग कोणाच्या हातचे? जास्त बोलू नकोस. माझी इच्छा पुरी कर. मला मुलगा हवा आहे. ती किती वर्षांची माझी इच्छा आहे. ती इच्छा पुरी व्हावी म्हणून मी पुन्हापुन्हा लग्ने केली. ती इच्छा का तू पुरी नाही करणार? तेवढयासाठी तर तुझ्याशी लग्न केले. भिकारीण तर होतीस. परंतु वाटले, की तू मुलगा देशील, याद राख!'
सावित्री भीत होती. ती डोळयांत पाणी आणून देवाला म्हणे, 'देवा नारायणा, मुलगा होऊ दे. त्यांची इच्छा पुरी होऊ दे. आणखी हाल आता नकोत.'
एके दिवशी रात्री तिचे पोट दुखू लागले. देवा, मुलगा दे, मुलगा दे, असे ती मनात म्हणत होती. या वेदनांतही पतीची इच्छा तिच्या डोळयांसमोर होती आणि खरेच तिला मुलगा झाला. बाळाचे रडणे बाहेर ऐकू आले.
'मुलगा की मुलगी?' बाळाने बाहेरून विचारले.
'मुलगा.' सुईण म्हणाली.
'शाबास!' तो म्हणाला.
कर्ज काढून बाळाने गावात साखर वाटली. लोक त्याला हसत होते. परंतु बाळाचे तिकडे लक्ष नव्हते.
'अरे मुलगा झाला, परंतु उद्या तो खाईल काय? तुला स्वर्गात पाणी मिळेल. परंतु मुलगा येथे उपाशी मरेल, त्याचे काय? शेतभात राहिले नाही. घरदार सावकाराकडे जाईल. पोराला भीक मागावी लागेल. साखर वाटतो आहे ! काही अक्कल आहे का?' लोक म्हणत.
'माझा मुलगा पराक्रमी होईल. या गावचा राजा होईल. गोपाळपूरचा राजा. त्याचे नाव मी गोपाळ ठेवणार आहे. जणू हा त्याचाच गाव. तो शेतक-यांचे राज्य स्थापील. गोरगरिबांना सुखी करील.' बाळा म्हणे.