आणि त्या सर्वांनी ते प्रकार करून ठेवले. सारे पसार झाले. गोप्या आपल्या खोलीत गुपचूप येऊन निजला. तिकडे गाणे संपले. सारी प्रतिष्ठीत मंडळी जायला निघाली. गोप्याचे मामा सर्वांना निरोप देत होते.
'मला मते पडतील असे करा. मी तुम्हा सर्वांवर विसंबून राहतो. मी तुमचाच आहे. तुमच्यापैकी एक.' मामा सर्वांना सांगत.
'तुम्ही निश्चींत राहा हो. तुम्ही निवडून आलेतच म्हणून समजा. आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे.' लोक म्हणाले.
मामा पोचवीत आला. मोटारवाले मोटारीत बसले. टांगेवाले टांग्यात बसले. छकडेवाले बसले. निघाले सारे. परंतु काय? मोटार थांबली. टायर सारे फुसफुशीत! आत हवा नाही आणि टांगे निघाले नाहीत तो चाके घरंगळली! छकडयांची तीच रडकथा. प्रशस्त पोटांचे ते लोक खाली आपटले. हा काय प्रकार? सारे संतापले.
'तुम्ही का आमची फजिती करायला आम्हाला बोलावलेत?' हा चांगला आहे पाहुणचार! ही थट्टा आम्ही सहन करणार नाही. या अपमानाचा आम्ही सूड घेऊ. म्हणे मते द्या. कोण देणार तुम्हाला मते? असे ते बडे लोक बडबडू लागले.
'रागावू नका. मी असे कसे करीन? गावातील खटयाळ पोरांनी हा चावटपणा केला असेल. गोप्याला विचारले पाहिजे. बोलवा रे त्या गोप्याला. कोठे आहे तो?' मामा म्हणाले.
गोपाळला अंथरूणातून ओढून आणण्यात आले. डोळे चोळीत तो उभा होता.
'काय रे गोप्या, हा चावटपणा कोणाचा?'
'कसला चावटपणा? मी तर निजलो होतो.'
'टांग्याच्या, छकडयांच्या खिळी कोणी काढल्या? हे टायर कोणी फाडले? बोल!'
'मला माहीत नाही, मामा. मी कशाला करू? माझा काय संबंध? मी रानातून आलो तसाच निजलो. तुमची मेजवानी चालली होती. मी उपाशी पोटीच झोपलो.'
इतक्यात सारे गुराखी तेथे जमले. गावातील चार मंडळीही जमली. कोणी कारणमीमांसा करीत होते. उलगडा होईना. परंतु एक गुराखी एकदम म्हणाला,
'अहो, तुमची बहीण भूत झाली आहे. तुम्ही तिला घरातून घालवलेत. तिने जीव दिला असे सारे म्हणतात. तिचा मुलगा दिवस रात उपाशी झोपतो आणि तुमच्या मेजवान्या चालतात. त्या मातेला कसे सहन होईल? तिनेच हा भुताटकीचा प्रकार केला असावा नक्की.'
'खरेच, खरेच, ही भुताटकी असावी. पळा रे पळा!' शेतकरी म्हणाले.
'चांगली मेजवानी. येथे भुताटकी आहे असे माहीत असते तर आम्ही आलोच नसतो. राम राम!' असे म्हणून ते सारे बडे लोक भीतीने पायीपायीच निघून गेले. त्या मोटारी, ती गाडयाघोडी दुस-या दिवशी गेली.
दुस-या दिवशी रानात गुराख्यांची हसता हसता मुरकुंडी वळली. झाडाखाली सारे बसले होते. कांदाभाकर खात होते. इतक्यात एक गुराखी गोप्याला म्हणाला,
'गोप्या, तुला मी एक गंमत करायला सांगणार आहे. करशील का?
'काय करू?'
'तू तुझ्या मामाचा भाचा आहेस की नाहीस?'
'आहे'
'मग तू असा भुक्कडासारखा काय करतोस? मामाला शोभेसा राहात जा. एखादे दिवशी तरी जरा ऐट कर. तुझ्या मामा मुलगा आहे तुझ्याच वयाचा. त्याची कशी ऐट असते. त्याचे ते कपडे बघ. डोक्याला तेल. भांग पाडतो. तू एके दिवशी सकाळी उठ. त्या दिवशी रानात गायीगुरे घेऊन येऊ नकोस. मामाच्या मुलाच्या खोलीत जा. त्याचे इस्तरीचे कपडे तू आपल्या अंगात घाल. केसांना तेल लाव. सुंदर भांग पाड. तू राजपुत्र शोभशील. बस तेथे दिवाणखान्यात खुर्चीवर. कर अशी गंमत.'
'अरे, असे करीन तर मामा घरातून घालवून देईल.'
'त्याची छाती नाही, तुझ्या आईच्या भुताला तो भितो. त्या दिवसापासून त्याने पक्कीच धास्ती घेतली आहे.'
'परंतु ते भूत म्हणजे आपणच होतो!'
'मामाला ते गुपीत थोडेच माहीत आहे?'