आठवडयाच्या बाजाराचा दिवस होता. तालुक्याच्या मुख्य गावी आज बाजार होता. गोप्या गेला. बरोबर पंधरा-वीस रूपये घेऊन तो गेला. त्याने एक सुंदर जाकीट विकत घेतले आणि घडयाळांच्या दुकानात तो गेला. एक घडयाळ त्याने खरीदले. घडयाळासाठी एक गोफ त्याने घेतला आणि घरी परत यायला तो निघाला. रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. मुले झोपी गेली होती. मंजीही अंथरूणावर पडून राहिली होती. गोप्या आला. मंजी उठली नाही. तो रागावला. त्याच्या बापाचा मानी स्वभाव त्याच्यामध्येही होता. तो स्वभाव आज जागृत झाला. तो एकदम उसळून म्हणाला, 'ऊठ की सटवे जरा. पडून राहिली आहे नुसती म्हशीसारखी. ऊठ, माझे घडयाळ बघ. माझी ऐट बघ. हे जाकिट बघ.'

'घरात मुलांना खायला नाही नि तुमची ऐट बघू वाटते?'

'जास्त बोलू नकोस फाजिलपणे. ऊठ आधी!'

मंजी काही बोलली नाही. गोप्या फार संतापला, तो तिला मारायला धावला. परंतु ते घडयाळ खाली पडले नि फुटले. गोप्या

पाहातच उभा राहिला. मंजीही आता उठली.

'करायचे काय ते घडयाळ? किती पैसे दिलेत? घरात आज या बाळाला ताप आला आहे. मुलांना औषधपाणी करायलाही पैसे नाहीत. तुम्हाला हवीत घडयाळे.'

गोप्या खाली बसला. लहान मुलाच्या अंगाला हात लावून पाहिला.

'केव्हा आला ताप?'

'मी शेतातून आले तो तो पडून राहिला होता.'

'तारा बरी आहे ना?'

'ती दोघे निजली आहेत. विनूचेच बरे नाही.'

इतक्यात विनू विव्हळू लागला. गोप्याने त्याला उचलून घेतले. 'उगी हो बाळा' असे म्हणू लागला.

'मुलांना थोडा खाऊ बिऊ तरी आणायचा.'

'आज माझी ऐटच मला दिसत होती. मी मूर्ख आहे. तू पोरांसाठी तडफडतेस. मी केवळ स्वत:कडे पाहतो. मंज्ये, तुझा हा गोप्या नालायक आहे. तुला मघा मी बोललो. तुला मारणार होतो. आणि तुझ्या या मुलांची तू आई. मी तुझ्यावर किती प्रेम करीत असे! तुझ्या केसात घालायला मी वेणी गुंफीत असे. तुझ्या झोपडीत ती तुला मी आणून देत असे. तू गोड हसत असस. कोठे गेले ते प्रेम, ते गोड हसणे?'

'प्रेमाचा पाऊस दोन दिवस असतो. संसारात पुढे सारे नाहीसे होते. सारे सुकून जाते. आता आपण या पोरांवर प्रेम करायचे. त्यांच्यासाठी जगायचे. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ; तुमच्या झोपडीत मी आपण होऊन आले. हक्काने येथली दोन फुले मीच आधी तोडली. संसारात रागलोभ, कधी गोडी, कधी भांडणे असे सारे चालायचेच. बसा. भाकर खायची आहे ना? उठून कुठे जाता?

'नको भाकर, आज पोट भरून आले आहे; आणि मंज्ये अलीकडे का तुलाही बरे वाटत नाही? तूही जरा वाळल्यासारखी दिसतेस.

'जरा बरे नाही वाटत. परंतु असे चालायचेच. कामावर जायला हवे. चार धंदे करायला हवेत. संसार चालायला हवा ना? तुम्ही हातपाय धुऊन या नि भाकर खा.'

मंजूने विनूला तेथेच थोपटून निजविले. तिने गोप्याला भाकर वाढली. चटणी होती, कांदा होता.

'तू खाल्लीस का भाकर?'

'मला नको.'

'माझ्याबरोबर खा. ये. आज जुने दिवस आठवतात. आपण बाहेर अंगणात बसून चांदण्यात खात असू, आठवते?'

'आणि आपल्या सोन्याचा पाळणा मांडवात होता. आज सोन्या असता तर दहा वर्षाचा असता. नाही का? ताराला आता आठवे वरीस लागेल. दिनू पाच वर्षाचा आणि हा विनू. आता नको बाळंतपणे आणखी.'

'ते का आपल्या हाती असते? तू थकून गेलीस हो मंज्ये.'

भाकरी खाऊन झाली. मंजी विनूजवळ बसली होती.

'तू झोप. मी बसतो बाळाजवळ.'

मंजीने आढेवेढे घेतले नाहीत. ती तेथे कांबळयावर पडली. तिला झोप लागली. गोप्याने तिच्या अंगावर गोधडी घातली. बाळ विनू झोपला होता. ताप जरा कमी झाला होता. गोप्याने दिवा मालवला. तो मंजीचे पाय चेपीत बसला. मंजीला जाग आली. परंतु तिने आढेवेढे घेतले नाहीत. पुन्हा ब-याच दिवसांनी ती प्रेमाचा ओलावा चाखीत होती. थोडया वेळाने गोप्या उठला. तो बाहेर अंगणात आला. बाजूला गाय होती. तिला थोडा चारा त्याने टाकला. समोर नदी दिसत होती. वरती चंद्र होता. सारे वातावरण पवित्र, निर्मळ, शांत होते. बरीच रात्र झाली होती. झाडावरून टपटप दवबिंदू पडत होते आणि गोप्याच्या डोळयांतून अश्रू आले. तो घरात गेला. बाळाला जवळ घेऊन तोही झोपला. सकाळी मंजी उठली तरी तो झोपलेला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel