मंजी देवाघरी गेली

'झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात लहानसा मांडव घातला होता. मांडवात त्याने पाळणा टांगला होता. त्या पाळण्यात त्याचा तो पहिला मुलगा वाढत होता. मंजी पुन्हा कामावर जाऊ लागली. दौल्या घरी बाळाला सांभाळी. वर्षे दोन वर्षे गेली आणि आता एक सुंदर मुलगी झाली. असा गोप्याचा संसार वाढत होता. भराभर वर्षे जात होती. एखादे वेळेस शेत नीट पिके. एखादे वर्षी पिकत नसे. घरात आता अडचण भासे. कर्जही होऊ लागले. मंजी सर्चित होऊ लागली.

एके दिवशी मंजी व गोप्या दुसरीकडे कामाला गेली होती. घरी लहान लहान दोन मुले. मोठा मुलगा पाच वर्षाचा होता. दौल्या त्यांची काळजी कराणारा. परंतु मोठया मुलाने नि दौल्याचे भांडण झाले. तो मोठा मुलगा कोठे तरी जाऊ पाहात होता. दौल्या जाऊ देईना. तरी तो सोन्या पळालाच. दौल्याने तेथे एक लोखंडी तुकडा होता तो जोराने फेकून मारला. सोन्याच्या डोक्यात तो लोखंडी तुकडा बसला. सोन्या धाडकन् जमिनीवर पडला. रक्ताची धार लागली. दौल्याने त्याला उटलून घरात आणले. त्याला काही सुचेना.

सायंकाळी मंजी घरी आली. गोप्या बापूसाहेबांकडे काही कामासाठी गेला होता. मंजी घरी आली तो हा प्रकार. ती बाळाला मांडीवर घेऊन बसली. परंतु बाळाचे प्राण केव्हाच निघून गेले होते. संसारातील तो पहिला मोठा धक्का होता. मंजीच्या डोळयांतून प्रथम पाणीच येईना, परंतु शेवटी हुंदका आला.

'सोन्या, सोन्या .....' ती करीत होती.

आणि आता गोप्याही आला. तो आला, तो घरात सारे शांत होते. तो भीतभीतच आला.

'काय ग मंज्ये?'

'सोन्या गेला.'

तिला बोलवेना. गोप्या कपाळाला हात लावून बसला. त्याने सोन्याकडे पाहिले. त्याचे डोळे भरून आले. त्यांचा पहिला मुलगा असा अकस्मात जावा!

'दौल्या, तू राक्षस आहेस. तू येथे राहू नकोस. उद्या आणखी कोणाच्या काही कपाळात घालशील. तू चालता हो. आता मोठा झाला आहेस. जा; कोठेही पोट भर. येथे नको आमच्याकडे. मंज्ये, हा दौल्या जाऊ दे. मी त्याला येथे ठेवणार नाही. माझ्या सोन्याचा हा मारेकरी. एखादे वेळेस माझ्या हातून काही व्हायचे. नको हा खुनी पोरटा डोळयांसमोर.'

'मी काय सांगू'

'दौल्या, हो चालता.'

'हा मी चाललो, तुम्ही सुखी राहा.'

असे म्हणून खरेच दौल्या गेला. कोठे गेला? कळेल, पुढेमागे कळेल. आज त्याचा पाठीमागून जाण्यात अर्थ नाही.

गोप्या बाळाला घेऊन गेला. त्यानेच खळगा खणला. त्याच्या डोळयांतून अश्रू गळत होते. हातांनी बाळाचा देह त्याने भूमातेच्या स्वाधीन केला. तो परत झोपडीत आला. मंजी अश्रुसिंचन करीत बसली होती.

'मंज्ये, रडू नकोस. किती रडशील?'

ती रात्र गेली. एक दोन दिवस मंजी घरातच होती; परंतु किती दिवस अशी घरी राहणार? गरिबाला शोक करीत बसायला वेळ नसतो. दु:खप्रदर्शनाला अवसर नसतो. ती पुन्हा मोलमजुरीला जाऊ लागली.

शेतीचे धान्य घरी आले म्हणजे मंजी त्यांतले गोप्याला न सांगून चोरून विकी. मुलीला काही दागिना करावा असे तिच्या मनात होते परंतु गोप्याला ही गोष्ट कळली. तो रागावला.

'तू चोरून धान्य विकतेस आणि चैन करतेस. समजले मला.'

अशी चोरटी आहेस एकूण!'

'कोणाची चोरी? घरचे धान्य विकले तर ती का चोरी?'

'हे माझे धान्य आहे.'

'आणि मी नाही शेतात मरत? बाळंतपणात मरावे. तिकडे शेतात मरावे. तरी या दाण्यांवर माझी सत्ता नाही. मूठभर घेईन म्हटले तर ती लगेच चोरी झाली ना? आणि चैन कसली केली? तुमच्याच या मुलीला एखादा लहान दागिना करावा म्हणून विकले थोडे धान्य. तुमच्या बापाने तुम्हांला लहानपणी कर्ज काढून सजवले होते. मी काही कर्ज काढायला तर नाही ना सांगितले?'

'तू तुझ्या मुलीला सजवणार. मला का नाही सांगतले?'

'तुम्ही लहान वाटते असा सजायला? काही तरीच बोलता. आणि माझी मुलगी ही तुमची नाही वाटते? ती काय परक्याची आहे?'

'मी पण आता थोडी ऐट करणार आहे. तुम्ही ऐट करणार नि मी भिका-यासारखा कसा राहू?'

आणि गोप्याने ऐट करायची असे ठरविले. परंतु ऐट करायची म्हणजे काय करायचे ते त्याला सुचेना. शेवटी खिशातले एक घडयाळ विकत आणायचे, जाकिट करून त्याच्या खिशात ते ठेवायचे असे त्याने ठरविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel