एक दोन वर्षे गेली. शेतही बरे पिकले. भावही जरा बरा होता. गोप्याजवळ चार पैसे राहिले. आपण लग्न करावे असे त्याला वाटू लागले. परंतु त्याला कोण देणार मुलगी? त्याच्यासाठी खटपट तरी कोण करणार.

त्या गावात एक गरीब मुलगी राहात होती. तिचे आईबाप नव्हते. तिच्याजवळ आणखी एक पाचसात वर्षाचा मुलगा होता. तो तिचा दूरचा नातलग होता. परंतु त्याला कोणी नसल्यामुळे तो तेथेच राहात असे. लहानशा झोपडीत ती मुलगी राहात होती. ती मोलमजुरी करून स्वत:चे व त्या मुलाचे उदरभरण करी. त्या मुलीचे नाव होते मंजी.

एकदा गोप्याच्या शेतात काम करायला मंजीही आली होती. परंतु उन्हात काम करताना तिला घेरी आली. गोप्याने तिला झोपडीत नेले. तिथे तिने विसावा घेतला. सायंकाळी ती जायला निघाली. तिने तेथील फुले तोडून आपल्या केसात घातली.

'मंजे, आणखी हवीत का फुले?'

'आज दोनच पुरेत.'

'अधिक केव्हा लागतील?'

'या झोपडीत पुन्हा येईन तेव्हा.'

'तू आणशील तेव्हा.'

त्या दिवशी मंजी हसत गेली. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम बसले. परंतु मंजीच्या घरी तो एक मुलगा होता. मंजीबरोबरच लग्न लावायचे म्हणजे त्या मुलासही घरी आणणे भाग होते. काय करायचे?

मंजी नि गोप्या यांच्याविषयी गावात कुजबूज सुरू झाली. बापूसाहेबांच्या कानांवर गोष्टी गेल्या. बापूसाहेब एके दिवशी मंजीकडे गेले व म्हणाले,

'मंजे, तू गोप्याबरोबर लग्न लावायला तयार आहेस?'

'परंतु मला कर्ज आहे. आणि हा मुलगा आहे. तो कोठे जाणार?'

'किती आहे तुला कर्ज?'
'आहे पन्नास रूपये'
'ते कर्ज मी फेडतो आणि हा मुलगा काही तुम्हाला जड होणार नाही. शेतात काम करील. शेण गोळा करील. गाय चारील. उद्या तुम्हाला माणसाची गरज लागेल. तू बाळंत झालीस तर तेथे जंगलात कोण आहे दुसरे? मी गोप्याला विचारतो.'

बापूसाहेब गोप्याकडे गेले. गोप्या फुलांची वेणी गुंफीत होता.

'काय रे गोप्या, वेणी कोणाला?'

'मंजीला नेऊन देणार होतो.'

'कोठे शिकलास वेणी गुंफायला? तुला आपले सारे येते.'

'मामाकडे शिकलो. तेथे माळी गुंफीत. मी बघत असे.?'

'हो'

'मग लवकर लग्न लाव. खेडेगावात नुसतं प्रेम फार दिवस ठेवू नये. लोक उगीच टीका करतात. तू बाळाचा मुलगा. तुझा संसार नीट सुरळीत व्हावा असे मला वाटते. मंजीला पन्नास रूपये कर्ज आहे. ते मी देऊन टाकतो. तुलाही शंभर रूपये लग्नासाठी देतो. देणगी समज. मंजीच्या घरी तो एक मुलगा आहे. तो तुला जड नाही होणार. दोन धंदे तोही करील. काय आहे तुझे म्हणणे?'

'तुमच्या विचाराबाहेर नाही.'

आणि  गोप्या नि मंजी यांचे लग्न लागले. बापूसाहेबांनी पुढाकार घेतला. आज मंजी आपल्या झोपडीतून गोप्याच्या झोपडीत जाणार होती. गोप्याने बैलगाडी आणली. त्या झोपडीतील सामान गाडीत घालण्यात आले. काही मडकी होती. एक खाट होती. काही टिनपाटे होती. दोन मोळया होत्या. सारे सामान गोळा करून नेण्यात आले. गरिबाला सारेच महत्वाचे. लाकडाची एक दळणीही त्याला किमतीची.

'तो झाडू राहिला. तो घ्या.'

'कशाला तो?'

'घ्या, उद्या तो उपयोगी पडेल. आणि तो फळीचा तुकडा झाकण ठेवायला होईल. काही ठेवू नका. पुरूषांना समजत नसते.'

'सारी अक्कल जणू तुम्हाला.'

'घरातील अक्कल आम्हालाच.'

शेवटी एकदाची बैलगाडी निघाली. दोघे गाडीत बसली.

'तौ दौल्या कुठे आहे?' त्याने विचारले.

'तो आधीच पुढे गेला.' ती म्हणाली.

गाडी झोपडीजवळ आली. मंजी आत शिरली. तिने सारे सामान नीट लावले. बाहेर संध्याकाळ झाली. गोप्या आज पुन्हा फुलांची वेणी गुंफीत होता.

'मी तिकडे काम करीत आहे, आणि तुम्ही माळा गुंफीत बसा.'

'तुला कामाचे बक्षीस नको? तू म्हणाली होतीस की या झोपडीत पुन्हा येईन तेव्हा भरपूर फुले केसांत घालीन. मला त्याची आठवण आहे. घाल ही वेणी केसांत.'

मंजीने केसात वेणी घातली. ती तेथे खाटेवर बसली. वरती चंद्र होता. तिकडे नदीचे पात्र रूपेरी चमकच होते. आणि गोप्याने बासरी वाजवायला घेतली. सारे वातावरण जणू प्रेममय नि प्रसन्न होते. गोप्या नि मंजी यांचा तो गिरबीचा परंतु प्रेमाचा नि सुखाचा संसार सुरू झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel