'ताई, चाललीस?' दिनूने रडत विचारले.

'ताई, मी येऊ?' बिलगून विनूने विचारले.

'पुढे तुम्हाला नेईन. सध्या घरीच राहा. मला पोचवून बाबा रात्री परत येतील. नाही तर उद्या सकाळी येतील. तुम्ही भांडू नका.
घरी काम करा. दिनू, तू शाळेत जा. मी पैसे पाठवीन. पुस्तके घ्या. हुशार व्हा.'

'ताई, तू पुन्हा कधी येशील !'

'आई गेली ती परत आलीच नाही. देवाकडे गेले म्हणजे परत नाही का गं येत?'

'विनू, आई देवबाप्पाकडे आहे. परंतु मी येत जाईन.'

'किती दिवसांनी येशील?'

'येईन लवकरच. तुम्हाला भेटून जाईन. खेळणी आणीन; खाऊ आणीन.'

'मला भोवरा आण.'

'मला टोपी आण. गांधीटोपी. ढवळी.'

'आणीन.'

'चल तारा, उशीर होईल.'

भावांना जवळ घेऊन त्यांचे मुके घेऊन तारा निघाली. ती गाडीत बसली. दोघे भाऊ दारात उभे होते.

'घरात राहा. बाहेर नका जाऊ. तांबूला पाणी पाजा.' असे म्हणून गोप्या गाडी हाकायला बसला. निघाली गाडी. ताराचे डोळे भरून आले.

'ताई, ताई ' करीत मुले रडत धावून आली. शेवटी ती चिमणी मुले झोपडीत परत आली. दिवसभर ते लहान भाऊ खेळले,
पाण्यात डुंबले. त्यांनी तांबूला पाणी पाजले आणि संध्याकाळी दिनू तांबूचे दूध काढायला बसला. त्याने वाटीभर दूध काढले. दोघे भाऊ प्याले. भाकर खाऊन झोपी गेले.

दुस-या दिवशी उजाडताच गोप्या घरी परत आला. त्याने आज दिनूला शाळेत घातले. घरी लहान विनूच असे. मधून मधून तो ताराला भेटून येई. तिच्याकडूनही कधी खुशाली येत असे.

परंतु एके दिवशी दिनूला ताप आला. शाळेतून तो घरी आला. अंथरूणात पडून राहिला. संध्याकाळी गोप्या घरी आला तो अंथरूणात बाळ तापाने फणफणत होता.

'आग बाबा, आग होते अंगाची. पाण्यात बुडवा मला. नदीत नेऊन ठेवा.' दिनू तडफडून म्हणे.

'काय करू, बाळ!' गोप्या खिन्नतेने म्हणाला.

त्याच्या मनात आले की ओले कापड घालावे अंगावर. तो उठला. त्याने एक कपडा भिजवला आणि दिनूच्या अंगावर ठेवला वरून पांघरूण घातले. थोडया वेळाने तो कपडा काढून, पुन्हा भिजवून अंगावर ठेवला. गोप्या असे करीत होता. तासाभराने ताप कमी झाला.

'कसे वाटते, बाळ?'

'बरे वाटते आता. उद्या निघेल का ताप?'

'निघेल बरे. पडून राहा.'

सकाळ झाली. गोप्याला एके ठिकाणी गवत कापायला जायचे होते.

'मी जाऊ का कामाला, बाळ?' त्याने विचारले.

'जा बाबा. मला बरे वाटते.'

आपला विळा घेऊन गोप्या कामाला गेला. परंतु त्याला उशीर झाला होता. इतर कामकरी केव्हाच आले होते. ते गवत कापीत होते. मालक तेथे उभा होता.

'गोप्या, इतक्या उशिरा कामाला यायचे का रे? मजुरी मात्र सबंध दिवसाची मागशील. बाकीचे मजूर केव्हाच आले. तू आलास आत्ता.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel