'गोप्या, खरेच तू आता या घरातून जा. आता काही लहान नाहीस. तुला लहानाचा मोठा केला. चार अक्षरे यावीत म्हणून तुला मी शाळेतही घेतले होते. परंतु विद्या तुझ्या नशिबी नव्हती. तू आपण होऊन गुराखी झालास. परंतु आता तुला मी इतके दिवस सांभाळले. त्या वेळेस दोन-तीन वर्षांचा होतास. आज सोळा-सतरा वर्षांचा झालास. आता तुला जा म्हटले तर बहीण रागावणार नाही. जा. या घरात आता तू नकोस.'

'ठीक. मामा, तुम्ही इतके दिवस घरात ठेवलेत. मी आधीच निघून गेले पाहिजे होते. मिंधेपणाचे जिणे काय कामाचे? कष्टाची भाजीभाकरी बरी. स्वाभिमामाने मी कोठेही राहीन. तुमच्याकडे अपमानास्पद रीतीने आता मी राहणार नाही. येतो मामा. येतो मामी. येतो अप्पा.' असे म्हणून सर्वांना नमस्कार करून गोप्या त्या घरातून बाहेर पडला. घरातील गडीमाणसे गोप्याभोवती जमली. सर्वांचे त्याच्यावर प्रेम होते. कारण तो कोणाचा अपमान करीत नसे. स्वत:ला गोड गोड मिळे ते सर्वांना देई.

'काय गोप्यादा, चालले तुम्ही?' ते प्रेमाने म्हणाले.

'होय गडयांनो, तुमच्यासारखाच मीही कोठे तरी एक मजूर होईन. येथले मिंधे जिणे नको.' माझी आठवण ठेवा. कधी भेटलो तर एकमेकांस प्रेम देऊ.'

'होय, गोप्यादा. तुमची आम्हास हरघडी याद येईल. आमच्यात तुम्ही बसायचे, हसायचे, खेळायचे, तुमचा स्वभाव गोड, दिलदार नि निर्भय. आमची बाजू घेऊन तुम्ही मामांजवळ भांडायचे. आम्हाला दोन रूपये मजुरी अधिक देववायचे. तुम्हाला कसे विसरू? देव तुम्हाला सुखी ठेवो. तुम्ही याच गावात का नाही राहात?'

'या गावात नको. ज्या गावात माझा जन्म झाला, जेथे माझे वडील राहात असत. त्या माझ्या गावी मी जातो. तेथे खंडाने जमीन घेईन. शेती करीन. स्वाभिमानाने जगेन. तुम्ही मला लहानपणी गोठयात दूध द्यायचे. पोरक्या पोरावर तुम्ही माया केलीत. सख्ख्या मामा परकेपणा दाखवी; परंतु तुम्ही परके जवळचे झालात. तुमच्या प्रेमाचा उतराई मी कसा होणार, राजांनो? देव तुम्हास सुखी ठेवो. रामराम.' असे म्हणून गोप्या गेला. गावातील मित्रांना भेटून तो रानात गेला. दुपारची वेळ होती. गुराखी वडाच्या झाडाखाली शिदो-या सोडून बसले होते. तो गोप्या आला.

'मामाचा भाचा आला.' एक जण म्हणाला.

'काय रे गोप्या, पुन्हा खांद्यावर घोंगडीशी?' दुस-याने विचारले.

'अरे, ही स्वाभिमानी घोंगडीच बरी. गोपाळकृष्ण घोंगडी खांद्यावर घेई. नको ते रेशमी इस्तरीचे कपडे. मी आज हा गाव सोडून जात आहे. मामाने जा म्हणून सांगितले. मी यापुढे स्वत:च्या श्रमाने जगेन. माझी जन्मभूमी अद्याप मी पाहिली नाही. गोपाळपुरात मी जन्मलो. तेथे गुणगुणी नदी आहे. मोठा डोह आहे. नदीच्या तिरी मळे आहेत. एका बाजूला जंगल आहे. असे लोक वर्णन करतात. फार सुंदर असेल माझा गाव. तेथे मी आज जाणार. तुम्हाला शेवटचा भेटायला आलो आहे. शेवटची चटणीभाकरी तुमच्याबरोबर खाऊ दे. क्षणभर बासरी वाजवू दे. तुमच्याबरोबर थोडे बोलू दे. हसू दे आणि जाऊ दे.'

गोप्या त्यांच्याबरोबर जेवला. ते नंतर खेळले. पाण्यात डुंबले. गोप्याने वडाच्या झाडाखाली गोड बासरी वाजवली.

'येतो आता, ओळख ठेवा माझ्या बालमित्रांनो. पुन्हा कधी भेटलो, तर एकमेकांस ह्दयाशी धरू. सारे सुखी असा.'

'गोप्यादा, तू जाशील तेथे सुखी राहा. तुला आम्ही विसरणार नाही.'

'मीही तुम्हाला विसरणार नाही.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel