संसारातील आणखी दु:खे

गोप्याला अती दु:ख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी दिसले नाही तरी जरा हातभर वाळ खणताच खाली निर्मळ पाण्याचा झरा मिळतो. तसेच गोप्या नि मंजी यांचे असे. त्यांच्या ह्दयात भरपूर प्रेम होते. एखादेवेळेस ते प्रकट होई. मंजी गेल्यावर गोप्याला चार दिवस काही सुचेना. तो बाहेर गेला नाही. तो मुलांना जवळ घेई. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करी. चार दिवस त्यानेच घरात स्वयंपाक केला. तो मुलांना जेवू घाली नि मग स्वत: तुकडा खाई. रात्री मुलांना थोपटीत बसे. जणू आईबापाचे दोघांचे प्रेम त्या पिलांना तो देत होता.

गोप्याच्या जीवनात मंजी खूप खोल गेलेली होती. त्याला पूर्वी कल्पनाही नव्हती. परंतु मंजी गेली नि त्याला सारे कळून आले. स्वत:च्या ह्रदयातील काही तरी तुटले, असे त्याला वाटले. आपल्या जीवनातील भाग जणू कापला गेला असे त्याला वाटले. दोन झाडे शेजारी शेजारी उभी असावीत. ती स्वतंत्र दिसतात. अलग दिसतात. परंतु खाली जमिनीत पाहू तर त्यांची शेकडो मूळे एकमेकांत गुंतून गेलेली दिसतील. गोप्या नि मंजी यांची जणू हीच त-हा होती. तिच्या जीवनात तो, त्याच्या जीवनात ती, याप्रमाणे मिसळून गेली होती. मंजीचा जीवनवृक्ष उन्मळून पडला. परंतु गोप्याच्या जीवनवृक्षालाही जोराचा धक्का बसला. त्याला चैन पडेना. त्याला अस्वस्थ वाटे, अशांत वाटे. त्याचे डोळेही भरून येत. मुलांना झोपवून तो रात्री बाहेर येऊन बसे. त्याला शेकडो आठवणी येत. एके दिवशी तो असाच बाहेर उदासीनपणाने बसला होता. परंतु त्याची मुलगी तारा - ती आज जागी होती - ती हळूच उठून आली. ती बापाजवळ आली नि म्हणाली,

'बाबा, चला आत. तुम्ही झोपा. आई गेली. तुम्हीही का जाणार? आम्हाला सोडून नका जाऊ. असे बाहेर नका बसत जाऊ. चला आत. आमच्याजवळ झोपा.'

'चल, बाळ!' असे म्हणू तो आत गेला.

काही दिवस गेले. दु:ख ओसरले. ताराही आता मोलमजुरी करी. दिनू हातात टोपली घेऊन शेण गोळा करायला जाई.

शेतक-याच्या घरी कोणी आळशी नसते. आळशी राहून त्याचे भागेल कसे?

एके दिवशी गोप्या शेतात होता. तो त्याच्याकडे त्याचा एक मित्र आला.

'काय हरबा, आज इकडे कुठे?'

'तुझ्याकडेच आलो, गोप्या. तुझी सध्या जरा ओढाताण आहे. कर्जही झाले आहे तुला. एक गोष्ट सुचवायला आलो आहे.'

'कोणती गोष्ट?'

'अरे, शिवापुरात एक पेन्शनर गृहस्थ आहेत. मिलिटरीतील आहेत. त्यांना घरी काम करायला एक मुलगी हवी आहे. तुझी तारा जाईल का? त्यांच्याकडेच राहायचे. त्यांच्याकडेच जेवायचे. जेवूनखाऊन दहा रुपये देणार आहेत. तुला मदत होईल आणि तुझ्या दिनूला जरा शाळेत घाल की. दोन अक्षरे शिकू दे त्याला.'

'तारा अजून लहान आहे.'

'लहान कशाने? बारा वर्षांची आहे. तिचे लगीन हवे करायला. जाऊ दे शहरात. जरा हुशार होईल. त्यांच्या घरी लिहायला वाचायलाही शिकेल. माझे ऐक.'

'मी विचार करून कळवितो. तुझ्या बायकोची प्रकृती कशी आहे?'

'ती लागली पुन्हा दळणकांडण करायला.'

'तुझा गोविंदा शाळेत जातो वाटते?'

'घातला आहे शाळेत. अरे, मीसुध्दा रात्रीच्या शाळेत शिकायला जातो. गोप्या, शिकले पाहिजे बघा.'

'लहानपणी मी दोन पुस्तके वाचली नि पुढे बंद केले.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel