'अरे, त्यांना एक दिवस काँग्रेस सोडावी तरी लागेल नाही तर जपून वागावे लागेल. मी सांगतो, त्यांच्या जमिनी काही राहणार नाहीत. थोडी त्यांना ठेवून बाकीची तुम्हा-आम्हाला वाटून देण्यात येईल. महात्मा गांधींचे हेच मत आहे.'
'माझे एक सांगणे आहे की, या काँग्रेसमध्ये घुसून तिला आपली केली पाहिजे. गाईचे वासरू गाईला ढुशा देते. गाईला त्याचा राग न येता तिला अधिकच पान्हा फुटतो. त्याप्रमाणे आपण या काँग्रेसमध्ये शिरून आमच्यासाठी हे कर. आमच्यासाठी ते कर, असे प्रेमाने सांगितले पाहिजे. काँग्रेस सारे करील. आपण तिची शक्ती वाढविली पाहिजे.'
'गोप्या, तू आमचा पुढारी हो.'
'आपले सर्वांचे पुढारी महात्मा गांधी.'
अशी बोलणी चालली होती. आणि भाकरी खायला सारे निघाले. विहिरीवर हातपाय धुऊन सारे झाडाखाली बसले.
'घ्या देवाचे नाव, बसा.'
'बसा, घ्या.'
सारे कांदा-भाकर खाऊ लागले. आनंदाने गप्पा मारीत जेवत होते. जवळची चटणी एकमेकांस देत होते.
'गोप्या, लोणच्याची चिरी हवी रे?'
'दे , माझी मंजी थोडीच आहे थोडे लोणचे घालून ठेवायला?'
'अरे, माझ्या घरी कोण घालणार? आणि घालायचे कशात? का बरणी आहे घरी ठेवायला? त्या धोंडशेटीकडे गेलो होतो कामाला. त्याच्या बायकोजवळ मागितले लोणचे. द्रोणभर तिने दिले.'
'धोंडशेटची बायको उदार आहे.'
'कोणाला ताक देईल. कोणाला काही. ती कधी नाही म्हणत नाही.'
'परंतु धोंडशेट कवडीचुंबक आहे. त्याची बायको त्याला तारील. नाहीतर मेल्यावर नरकातच जायचा.'
'आपण जिवंतपणीच नरकात आहोत. रोज घरी दु:खे, चिंता, यातना.'
'गोप्या, तू वाचन दाखवणार होतास ना काही तरी?'
'शनिमहात्म्य वाचणार की काय?'
'का पांडवप्रताप आहे का शिवलीलामृत आहे?'
'मी तुम्हाला शेतकरीप्रताप वाचून दाखवणार आहे.'
'शेतकरीप्रताप? ही पोथी नव्हती ऐकली !'
'ही नवीन पोथी आहे. तिचे पाठ अद्याप सुरू झाले नाहीत.' असे म्हणून गोप्याने पिशवीतू ती पत्रके काढली. ते मित्र पाहू लागले. महात्माजींचे वर चित्र होते. तिरंगी झेंडयाचे चित्र होते.
'गोप्या, गांधीबाप्पाचे काही आहे वाटते यात? हा झेंडा काँग्रेसचा. वर चरखा आहे बघा.'
'कसली तरी जाहिरात आहे बघा.'
'गोप्या, वाचून दाखव. आम्ही ऐकतो.'
'गोप्या वाचून दाखवू लागला. ते सारे ऐकत होते.'
'शेतकरी बंधूंनो,