गोप्या प्रचारक होतो
चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून पाहिला. त्याला ते आवडले. या गोष्टीचा आपण प्रचार केलाच पाहिजे असे त्याने ठरविले. त्याच्या संसाराचा पसारा आता फारसा नव्हता. दोन मुले नि तो. शेतक-यांची संघटना करण्याचे त्याने नक्की केले.
एके दिवशी तो पुन्हा एका जमीनदाराकडे कामाला गेला होता. दुसरेही पुष्कळ मजूर आले होते. सारे गोप्याच्या ओळखीचे होते. सारे कामाला लागले. काम करता करता त्याच्या गोष्टी चालल्या होत्या. सुखदु:खाच्या गोष्टी.
'काय रे गोप्या, तुझ्याकडून मालकाने जमीन काढून घेतली म्हणतात, हे खरे का?' एकाने विचारले.
'अजून काढून घेतली नाही. परंतु कदाचिच काढून घेईल. बघावे काय होते ते.'
'तू चार दिवसांत कुठे दिसला नाहीस, गोप्या !'
'अरे, माझी मुलगी तारा, ती मेली.'
'तारा मेली?'
'तळयात पडून मेली.'
'तू तिला शिवापूरला ठेवली होतीस पेन्शनराकडे. होय ना? मिलिटरीवाला. त्यानेच केली असेल शिकार.'
'तळयात बुडून मेली असे म्हणतात.'
'गोप्या, तुझी तारा गवत कापायला यायची. लहान पोर; परंतु झपझप कापीत जायची. अरे, माझ्या रामाचे लग्न तुझ्या ताराशी लावावे असे माझ्या मनात येई. तुझ्याजवळ आज हे मनातले बोललो. चुणचुणीत हुशार मुलगी ! अशी कशी मेली? आणि तू तिला अशी ठेवलीस तरी कशी दुस-याकडे?'
'गरिबाला उपास नसतो. घरी कर्ज झाले होते. मी एकटा. आणखी दोन लहान मुले घरात. म्हणून ठेवली तिला त्या पेन्शनराकडे. पुढे असे होईल हे का कोणाला माहित होते? आपली शेतक-याची स्थिती फार वाईट.'
'आणि आपण सारे धनधान्य निर्माण करतो. आपण गवत कापायचे; आपण मळे करायचे, आपण शेती पिकवायची. परंतु आपणाला काही नाही. आपल्या मुलांना शाळा नाही. आपल्या बायकांच्या अंगावर नीट लुगडी नाही आणि घरात मूठभर धान्य नाही.'
'परंतु असे रडून काय होणार? आज दुपारी आपण भाकर खायला बसू तेव्हा मी काहीतरी वाचून दाखविणार आहे.'
'गोप्या, तू वाचून दाखविणार?'
'अरे, मी लहानपणी थोडे शिकलो होतो आणि आपला हरबा आहे ना? त्याने मला वाचायची सवय ठेव म्हणून सांगितले. तो मला आणून देतो जुनी वर्तमानपत्र, बसतो वाचीत.'
'अरे, तो हरबा रात्रीच्या शाळेत जातो. तो नवीन मास्तर आला आहे ना मराठी शाळेत, त्याने रात्रीची शाळा काढली आहे.'
'पांडू मास्तर. फार चांगला आहे म्हणतात. पोरांगा काँग्रेसची गाणी शिकवितो.'
'काय रे गोप्या, ही काँग्रेस का इंग्रजाला दवडील येथून? इंग्रजाजवळ लष्कर, तोफा, विमाने. या काँग्रेसजवळ काय आहे?'
'अरे, एवढा चौदा चौकडयाचा रावण, तोही का राहिला शेवटी धुळीतच गेला. हे इंग्रज का कायमचा ताम्रपट घेऊन आले आहेत?
आपण या काँग्रेसमध्ये घुसले पाहिजे.'
'काँग्रेस का गरिबांची आहे? तिच्यात ते काही सावकार, जमीनदार सुध्दा आहेत. ढवळी टोपी घालतात. परंतु आपल्याला पिळतातच.