'पोरगा तापाने रातभर फणफणत होता. रागावू नका.'

'बरे लाग कामाला. सपासप गवत काढ.'

गोप्या गवत कापू लागला. परंतु त्याच्या विळयाला धार नव्हती. विळयाला धार लावायला त्याला वेळच झाला नाही. भराभर गवत कापून होईना. मालकाचे त्याच्याकडे लक्ष होते.

'गोप्या, कामाची वेठ मारायला आलास वाटते? त्या विळयाने लोणी तरी कापेल का? कामाला यायचे तर धार नको होती का लावून ठेवायला?'

'अहो, पोरगा घरी मरतो आहे, धार केव्हा लावू? डोळयाला' धारा लागल्या होत्या.'

'मग कामाला कशाला आलास? हो चालता. तू घरी जा. उद्या नीट धार लावून मग कामाला ये. खरेच सांगतो. आज कामावर तू नकोस. ऊठ. जा घरी.'

गोप्या खिन्नपणे घरी निघून गेला. त्याला मुलगा दिनू तेथे बाहेरच होता. विनूही खेळत होता.

'बाबा आलेतसे लौकर?' दिनूने विचारले.

'तुझी आठवण येई म्हणून आलो. ताप नाही ना?'

'नाही. आता छान वाटते.'

'दोन दिवस शाळेत जाऊ नकोस. लांब पडते तुला शाळा.'

'परंतु मला गंमत वाटते. ते नवीन मास्तर आले आहेत. ते गोष्टीही सांगतात. गाणी शिकवितात.'

'कसली असतात गाणी.'

'तिरंगी झेंडयाची, गांधीबाप्पांची. ते आम्हाला गांधीबाप्पांचं चित्र देणार आहेत. आपल्या झोपडीत लावू. हं. बाबा! तुम्ही पाहिले आहेत का गांधीबाप्पा?'

'मी कोठून पाहू?'

'आपल्या गावाला येतील का ते?'

'मी काय सांगू, बाळ?'

गोप्या आज घरातच पडून होता. त्याच्या मनात कसले तरी विचार चालले होते. परंतु किती वेळ तो असा पडून राहणार? तो उठला. त्याने आज आपली झोपडी नीट झाडली. नंतर त्याने अंगण सारवले.

'बाबा, सारे स्वच्छ करता आज?'

'अरे तुमची आई होती, ती सारे स्वच्छ ठेवी. मला वेळ होत नाही नि सारे जमत नाही.'

'ताईसुध्दा रोज झाडायची. दिनू म्हणाला.

'बाबा, ताई कधी येणार?' विनूने विचारले.

'आणू दोन महिन्यांनी.' गोप्या म्हणाला.

असे दिवस जात होते. गोप्या अलीकडे फार कष्टी दिसे. का बरे? तारा तिकडे बरी आहे ना? मुले तर बरी दिसतात. परंतु गोप्याचे कशात लक्ष नसे. तो राहून राहून विचारमग्न होई.

एके दिवशी दिनू शाळेतून सायंकाळी घरी आला. तो दारात काही तरी पडलेले होते. दिनूने ते उचलले. काय होते ते? आणि तेथे एक दुसरे पुडकेही पडलेले होते. काय होते त्यात? एक तर ते पत्र होते. पाकीट होते. कोणाचे पत्र? ताई कधी पत्र पाठवीत नसे. तिला लिहिता येत नव्हते. का ती लिहायला शिकली?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel