'बस त्या पडवीत.' असे म्हणून भाऊ माडीवर निघून गेला. तिला एक फाटकी घोंगडी देण्यात आली. खायला शिळीपाकी भाकर देण्यात आली. परंतु भाच्यासाठी मामाने दूध पाठविले.

'त्याला तू दूध पाज. उपाशी नको निजवू.' मामा म्हणाला.

'त्याला कोरडया भाकरीची सवय आहे.'

'सवय न होऊन कसे चालेल?'

मामा गेला. गोपाळ ते दूध प्याला. आईच्या मांडीवर दमलेला बाळ झोपी गेला. किती तरी वेळा त्याच्या तोंडाकडे माता पाहात होती. शेवटी त्याला कुशीत घेऊन तीही झोपली. घरात सर्वत्र सामसूम होती. माणसे झोपली होती. गडीमाणसे झोपली होती. गोठयात गुरे झोपली होती. फक्त आकाशातील तारे झोपले नव्हते. भिरभिर करणारा वारा झोपला नव्हता.

अद्यापि प्रहरभर रात्र होती. माता जागी झाली होती. तिने मुलाला घट्ट जवळ घेतले. थोडया वेळाने ती उठली. ती दारापर्यंत गेली. पुन्हा ती माघारी आली. बाळाच्या अंगावर प्रेमळ हात ठेवून पुन्हा ती पडून राहिली. तिचे डोळे भरून आले होते. छाती खालीवर होत होती. बाळ जागा होऊ नये म्हणू ती उठून बसली. तिने त्याचा हळूच पापा घेतला.

'बाळ, मामाच्या घरी सुखी राहा. त्याने तुला दूध दिले. तो तुझ्यावर प्रेम करी. अभागी आईजवळ राहण्यापेक्षा मामाजवळ राहा हो बाळ. सुखी हो. मोठा झाल्यावर आईला नावे नको हो ठेवू. सा-या जगाची जी माता त्या जगदंबेच्या ओटीत तुला घालून मी जात आहे. जाते हं बाळ. सुखी असं.

मोहपाश दूर करून माता उठली. तिने हळूच दार उघडले. ती बाहेर अंगणात आली. तिने आकाशातील ता-यांकडे पाहिले. तिने हात जोडले. ती निघाली. तो पाहा. कोंबडा आरवला. शेतकरी उठू लागतील. ती माया ममता पोटात ठेवून लगबगीने निघून गेली. कोठे गेली ती? कोणाला माहीत! वा-याला माहीत. कदाचित् गुणगुणीच्या त्या गंभीर डोहाला माहीत असेल.

आता बाहेर उजाडले. कामाची गर्दी झाली. दुधाच्या धारा वाजू लागल्या. गोठे झाडले जाऊ लागले. गायीगुरे रानात जाऊ लागली. गोपाळचा मामा उठला. मामी उठली. घरातील मुले उठली. परंतु लहानगा गोपाळ अद्याप गोड झोपेतच होता. मामा तेथे डोकावला. तेथे बहीण नव्हती. कोठे गेली बहीण? मुलाला टाकून गेली की काय?

थोडया वेळाने गोपाळ उठला. त्याने आजूबाजूस पाहिले. आई दिसेना. तो रडू लागला. आई, आई करीत, तो इकडे तिकडे रडत जाऊ लागला. मामा जवळच होता. त्या लहान मुलाचे अश्रू पाहून, तो विलाप ऐकून मामाचे ह्दय द्रवले. त्याने भाच्याला उचलून घेतले. त्याला त्याने घरात नेले. खाऊ देऊन त्याला उगी केले.

'गेली कुठे त्याची आई? येथे पोराला टाकून गेली वाटते अवदसा !आता याला का तुम्ही पोसणार; तुम्ही वाढवणार? भाच्याला टाकवत नाही वाटते?' मामी म्हणाली.

'अगं, या लहान मुलाचा काय दोष? त्याची आई दुर्देवी आहे. याला आपण पाळू. वाढवू.'

'दुर्देवी आईची पोरे कोठली सुदैवी निघायला!'

'परंतु या लहान मुलाला का आपण फेकून देणार? राहू दे आपल्याकडे. उद्या मोठा होईल. शेतीच्या कामाला उपयोगी पडेल. तुझी मुले आहेत, त्यांत तो वाढेल. त्याचे का ओझे आहे?'

मामा भाच्याला घेऊन माडीवर गेला. गोपाळ 'आई आई करीत होता. 'येईल हं तुझी आई, उगी.' असे म्हणून मामा त्याची समजूत घालीत होता.

गोपाळ त्या घरात वाढू लागला. मामी त्याला हिडीसफिडीस करी. मारीही. परंतु मामा मधून मधून त्याला जवळ घेई. खाऊ देऊ. प्रेमाने एखादा मुकाही घेई. गडीमाणसांना गोपाळ आवडे. तो स्वच्छ होता. डोळयाला पाणी नाही, नाकाला शेंबूड नाही. तो तरतरीत व हुषार दिसे. गोपाळ गोठयात जाई. दूध काढणारा गडी तेथेच त्याला वाटीभर दूध देई. फेसाळ धारोष्ण दूध. गोपाळ गुटगुटीत झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel