महात्माजींना जे स्वराज्य आणावयाचे आहे ते इंग्रजी पार्लमेंटरी पध्दतीच्या लोकशाहीचे किंवा नाझीझमचे, फॅसिझमचे किंवा सोशॅलिझमचे केवळ अनुकरण नाही. महात्माजी म्हणतात : ''त्या त्या देशांनी स्वतःच्या वृत्तीला व परंपरेला अनुरूप अशा राज्यव्यवस्था निर्माण केल्या. आपण भारतीय परंपरा व वृत्ति यांना अनुकूल अशी राज्यपध्दती निर्मूं. इतर देशांतील राज्यपध्दतींहून आमची राज्यपध्दती भिन्न असेल. आमच्या प्रकृतीस व प्रवृत्तीस मानवणारी अशी ती असेल.'' ती जी आमची शासनपध्दती आदर्श व परंपरानुरूप अशी राज्यपध्दती-निर्माण होईल, तिलाच महात्माजी 'रामराज्य' असे नांव देतात. अत्यंत प्राचीन अशा या शब्दांत महात्माजींनी अत्यंत आधुनिक असा अर्थ ओतला आहे. ते म्हणतात :''माझ्या रामराज्यांत लोकशाही असेल, लोकसत्ता असेल. परंतु ती लोकसत्ता केवळ नैतिक आधारावर उभारलेली असेल.'' (Sovereignty of the people based on pure moral authority) नुसती लोकसत्ता नव्हे तर नीतीच्या पायावर आधारलेली लोकसत्ता. महात्माजी प्रत्येक शब्दांत स्वतःच्या अर्थ ओतीत असतात. रूढ असलेले शब्दच ते घेतात. परंतु त्यांत नवीन अर्थ ओततात. लोकशाही हा शब्द ते घेतील. परंतु त्या लोकशाहीला ते नैतिक आधारावर उभारतील. केवळ लोकसत्ता श्रेष्ठ नाही. नैतिक पायावरची लोकशाही हवी. लोकशाहीत ज्याप्रमाणे ते नैतिक आधार आणतात, या राजकीय कल्पनेला नीतीवर उभारतात, त्याप्रमाणे आर्थिक क्षेत्रांतहि ते करतात. लोकशाहीत अहिंसा हवी असेल तर तेथे नीति हवी. त्याप्रमाणे अर्थशास्त्रांत अहिंसा आणायची असेल तर काय करायला हवे? आर्थिक उन्नती म्हणजे महात्माजी औद्योगीकरण समजत नाहीत. मोठमोठे कारखाने काढणे, गिरण्या काढणे, देशात किती संपत्ति उत्पन्न होते तिची मोजदाद करणे, म्हणजे आर्थिक उन्नती नाही. महात्माजींची ही दृष्टि नाही. आर्थिक स्वातंत्र्याचा ते असा अर्थ करतात की 'प्रत्येकाची आर्थिक उन्नति होणे.' देशात सरासरी उत्पन्न किती पडते यावर त्यांचा विश्वास नाही. खरोखर प्रत्येकाच्या खिशांत प्रत्यक्ष काय पडते हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला, स्त्रीला, पुरुषाला स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःची आर्थिक उन्नति करून घेण्याची संधि हवी. महात्माजींच्या स्वराज्यांत प्रत्येकाला पुरेसे अन्न मिळेल. अंगभर भरपूर वस्त्र मिळेल. दूध तूप मिळेल. रूझवेल्ट व चर्चिल यांनी जी 'अटलांटिक सनद' जाहीर केली होती तीत त्यांनी अशी घोषणा केली नाही. सर्वच देशांत या प्रकारे अहिंसक क्रांति झाली पाहिजे. असे होईल तरच जगांतून युध्दे नष्ट होतील. कारण युध्दाचा आधारच जाईल.

जे स्वराज्य आपणांस आणावयाचे आहे, जी लोकसत्ता उद्या निर्मायची आहे, ती आत्म्याच्या नैतिक शक्तीवर आरूढ असलेली अशी व्हावी. जो ईश्वर, जो परमात्मा आपल्या हृदयांत आहे, याला स्मरून जनतेने मते द्यावीत. आत्म्याला स्मरून दिलेल्या मतांवर आधारलेली लोकसत्ता, ती खरी लोकसत्ता होईल. केवळ हात वर करणे व मोजणे म्हणजे लोकशाही, असे महात्माजींस वाटत नाही. बहुमताने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे अशा मताचे ते नाहीत. महात्माजींनी लोकमान्यांविषयी लिहितांना एकदा म्हटले आहे, ''लोकमान्य लोकशाहीचे पक्के पुरस्कर्ते होते. बहुमतवाल्यांच्या सत्तेवर त्यांचा विश्वास होता. परंतु बहुमतवाल्यांच्या सत्तेवर त्यांची असलेली अपरंपार श्रध्दा पाहून मला कधी कधी भीति वाटे. ''महात्मा गांधींना बहुमताचा तितकासा भरवसा वाटत नाही. म्हणजे का त्यांना अल्पमतवाल्यांच्या हाती सत्ता असणे पसंत आहे? तसेहि नाही. लोकांचीच सत्ता असू दे. बहुमतांची सत्ता असूं दे. परंतु त्या बहुमताच्या पाठीमागे आत्मिक बुध्दि असू दे. नैतिक बळावर आधारलेले असे ते बहुमत असू दे. लोकशाहीमध्ये नैतिक प्राण असावा यासाठी लोकांत उच्च व उदात्त नीतीची सतत जागृति ठेवणारे लोक हवेत. लोकांच्या नैतिक भावना जागृत ठेवतील, त्यांच्या भावना बुजून जाऊ देणार नाहीत, असे करणारे लोक हवेत. नैतिक निर्भयतेने आपली मते बोलून दाखविणारे लोक हवेत. लोकसत्तेला नीतीचा आधार हवा. मॅझिनी एकदा म्हणाला, ''खरी शेवटची अंतिम सत्ता कोणाची?'' "Where does sovereignty lie? It lies in God." ''अंतिम सत्ता परमेश्वराच्या हाती.'' मॅझिनीच्या म्हणण्याचा हाच भावार्थ आहे की, खरी सत्ता नीतीची आहे. नैतिक कायदा हा सर्वश्रेष्ठ कायदा. माझ्या नैतिक प्रेरणेला मी सर्वश्रेष्ठ मानीन. मग मला बहुमत असो वा नसो. सत्याग्रही तत्त्वज्ञानांत ही भावना आहे. लोकसत्तेलाहि, बहुमताच्या सत्तेलाहि येथे नीतीची सार्वभौम मर्यादा घातलेली आहे. तुम्ही दुस-याच्या आत्म्याला दडपून टाकाल तर त्या स्वराज्यास काय अर्थ? स्वराज्यांत कोणी कोणाचा गुलाम नको. जो गुलाम असतो, आर्थिक दृष्टया दुस-याचा मिंधा असतो, तो स्वतंत्रपणे आत्म्याला स्मरून थोडेच मत देणार? गुलामाला आत्मा नाही. रामराज्यांत, ख-या लोकशाहीत सर्वांना सामाजिक स्वातंत्र्य असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल, राजकारणांत स्वतःचे मत त्यांना बोलून दाखविता येईल. तेथील लोकमतहि नीतीचा सर्वभूतहिताचा कायदा पाळील. असे होईल तरच खरा थोर सत्य धर्म तेथे आला असे म्हणता येईल.

लोकशाहीत लोक तेव्हाच आत्म्याला स्मरून मते देतील जेव्हा आर्थिक दृष्टया ते स्वावलंबी असतील. अन्नाचा प्रश्न आधी सुटला पाहिजे. अन्नच नाही तर धार्मिक उन्नति, नैतिक उन्नति कशी होणार? मनुष्याच्या आवश्यक आर्थिक गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत. त्याखेरीज त्याची नैतिक वाढ होणार नाही. समाजवादी लोक या गोष्टीवर फार भर देतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel