सत्ययुगांत राजधर्मच नव्हता. तेथे राज्यसंस्थाच नव्हती. कारण सारेच स्वयंभू अशा सत्प्रेरणेने वागत होते. आपोआपच धर्मपालन होत होते. यतिधर्माच्या पाठोपाठ सारे जात, असे महाभारतांत वर्णन आहे. परंतु जेव्हा संग्रह वाढला तेव्हा शस्त्रबलावर आधारलेली ही शासनसंस्था निर्माण करण्यांत आली. परंतु ही शस्त्रे इतकी वाढू लागली आहेत की, समाजाचे धारण होण्याऐवजी संहारच होणार असे दिसू लागले आहे. राजसत्तेने खर्या धर्माची स्थापना होते असे महात्मा गांधींना वाटत नाही. खर्या न्यायाची प्रस्थापना राज्यसत्तेच्या द्वारा होणे अशक्य आहे असे गांधीजींचे निश्चित मत आहे. त्याचा अर्थ दुर्बळ बना, भेकड बना असा नव्हे. ते सर्वांत कशाचा तिटकारा करीत असतील तर भ्याडपणाचा. क्लैब्य नकोच. मला बलवंतांची, समर्थांची हिंसा पाहिजे आहे, असे गांधीजींनी शतदा सांगितले आहे. ज्यांना अहिंसा पेलत नसेल, जे इतके समर्थ नसतील, त्यांनी अहिंसा दुबळेपणाने पाळावी असे गांधीजी कधीहि म्हणत नाहीत. महात्माजींना समाजांत अहिंसक वृत्तीचे खरे वीर पुरुष हवे आहेत. समाजांत असे लोक हवेत की, जे राज्यसत्तेच्या भीतीमुळे कायदे पाळीत नसून न्यायबुध्दीला प्रमाण मानून कायदे पाळतात. असे सत्याग्रही न्यायी वीर कायदे पाळतीलहि आणि तोडतीलहि.

कायदेभंगक गुन्हेगार आणि कायदेभंगक सत्याग्रही

अशा सत्याग्रहींना दंडाचे, शिक्षेचे भय नसते. ते निर्भय असतात. तेथे लपवाछपव नाही. गुन्हेगारहि कायदे मोडतात; परंतु त्यांच्याजवळ नैतिक कायदाहि नसतो. सत्याग्रही कायदेभंगक हा नैतिक कायदा कधी मोडित नाही.(Civil Disobedience) त्याचे कायदेभंगाचे कार्य हे सविनय असते; कर्तव्य म्हणून असते. सविनय कायदेभंग करणारा नैतिक कायदा अभंग मानतो; कर्तव्यनिष्ठा म्हणून, न्यायनिष्ठा म्हणून तो कायदा मोडतो; स्वार्थासाठी, लहरींसाठी नाही.

नैतिक कायदा नि सरकारी कायदा.

नैतिक कायदा आणि राजसत्तेचा कायदा यात भेद आहे. नैतिक कायद्याचे पालन करून राज्यसत्तेचा कायदा मोडावयाचा. असे करण्याचा हक्कच आहे असे नव्हे तर ते कर्तव्यच आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी समत्वबुध्दीने, कर्तव्यबुध्दीने कायदेभंग करावयाचा. समाजांतील शासनसंस्थेच्या कायद्याचा भंग करणारा हा सत्याग्रही समाजांत दंगल होऊ नये म्हणून मात्र जपतो. बजबजपुरी माजूं नये यासाठी तो व्यवस्था करतो.

राजा व्यवस्थेसाठीच प्रथम आला

प्राचीन काळी प्रथम ही शासनसंस्था जन्माला आली ती व्यवस्थेसाठीच होय. परंतु ज्याला राजा केले तोच अन्यायी कायदे करूं लागला. यावर उपाय काय? यावर उपाय एकच की, या राजसत्तेला विरोध करणारा नैतिक वीर हवा. कारण तसे नसेल तर हा गादीवर येणारा आणखी सवाई हिटलर व्हायचा. न्यायासाठी राजा असावा, न्यायासाठीच त्याला दूरहि करावे असे हे क्रांतिशास्त्र आहे. प्रजाधर्मांत न्यायासाठी राजा दूर करावा हे महत्त्वाचे अंग आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel