सत्यासाठी विचार, आचार, उच्चार यांत संगति हवी. जो सत्याग्रही असतो तो बोलल्याप्रमाणें वागतो. माझ्या विचारानुरूप मी वागूं लागलों तर माझ्या स्वार्थाला धक्का पोचेंल. मग कसें करूं असें म्हणणारा सत्याग्रही कसा होऊं शकेल? कोणी कोणी आपली भीति, आपला स्वार्थ यांना लपविण्यासाठीं दांभिकपणानें अमुक योग्य नाहीं, तमुक बरें नाहीं असें म्हणतात. समजा, देश स्वतंत्र व्हावा असें त्याला मनांत वाटते; परंतु तसें म्हणेन तर धडपडावें लागेल. नाहींतर कमकुवतपणा कबूल करावा लागेल. त्याची तर लाज वाटते. म्हणून म्हणायचें की, ''अशा वेळेस लढा नको. आपण तरी अजून कोठें लायक आहोंत?'' परंतु हा दंभ असतो. दांभिक माणसापेक्षां कमकुवतपणा प्रामाणिकपणें कबूल करणारा मनुष्य अधिक थोर होय. तो म्हणेल ''देशासाठी लढलें पाहिजे. देश स्वतंत्र व्हायलाच हवा. परंतु मी कुटुंबवत्सल पडलों, तितका त्याग, तितकें धैर्य मजजवळ नाहीं. दांभिकापेक्षां हा बरा.

परिग्रही मनुष्य सत्यनिष्ठ राहूं शकत नाहीं. कोठें तरी लोभमोहांत तो गुंततो. तो दावा करील कीं, हें सारें इतरांच्याहि हिताचें आहे. तो युक्तिवाद शोधील. संग्रह करायला युक्तिवाद शोधील. समाजाचेंहि यांत हितच आहे म्हणेल. परंतु ती सत्याग्रही दृष्टि नव्हे. सत्याग्रही मनुष्याला दारिद्य्रांतच श्रेष्ठ प्रतीचा आनंद वाटतो. परिस्थितीनें येणारें दारिद्य्र निराळें आणि आपण होऊन दारिद्य्राचा स्वीकार करणें हे निराळें. परिस्थितीमुळें दारिद्य्रांत रहायला लागणें ही हिंसा आहे; स्वेच्छेनें तें स्वीकारणें ही अहिंसा आहे. बाह्यतः दोघे दरिद्री दिसले तरी एक असंग्रहाच्या, अपरिग्रहाच्या व्रतामुळें दारिद्री आहे; दुसरा निरुपाय म्हणून आहे. समाजांतील दारिद्य्र दूर करणें कर्तव्यच आहे. दारिद्य्र जें परिस्थितीमुळें आहे तें जर दूर केलें नाही तर समाजांत अहिंसा कशी येणार आणि सत्यनिष्ठा तरी कशी येणार? दरिद्री मनुष्याला अनेकदां परिस्थितीमुळें खोटें बोलावें लागतें. दारिद्य्र दुगुर्णांची जननी आहे असें म्हणतात. समजांत सत्यनिष्ठा वाढते असें आपण म्हटलें तरी त्यालाहि मर्यादा आहेत. आर्थिक परिस्थिति सुधारल्यानें नैतिक परिस्थिति सुधारते; परंतु अधिक पैसा जवळ झाल्यानें अधःपातहि होतो. कोठें तरी मर्यादा हवी. एवढें तरी प्रत्येकास मिळालें पाहिजे अशी समाजानें व्यवस्था करायला हवी. त्यामुळें नैतिक वातावरण उन्नत व्हायला मदत होते.

सामान्य जनतेची गोष्ट निराळी. परंतु जो सत्याग्रही आहे तो स्वेच्छेनं व्रत म्हणून दारिद्य्र स्वीकारतो. परिस्थितिशरण तो नसतो. परिस्थिती प्राप्त झाली तरी तो श्रीमंत होऊ इच्छिणार नाही. परिस्थितींमुळे मी दरिद्री आहें म्हणून तो रडत कधीं बसणार नाही. सर्वांनीं स्वेच्छेनें दारिद्य्र पत्करावें, सर्वांनी स्वेच्छेनें त्याग करावा. त्यांत सेवा आहे, उन्नति आहे. सर्व राष्ट्र जर ही दीक्षा घेईल तर जगाला आपण शान्तीचा रस्ता दाखवूं शकूं.

सत्याग्रही मनुष्यानें तरी आपल्या व्रतांशी निष्ठावंत रहावें. जो सत्याग्रही नाहीं तो अडचणींत सांपडला, गांगरला आणि त्यानें हिंसा केली तरीहि चालेल. भित्रेपणापेक्षां हिंसा बरी. अन्यायाला हिंसेनें तोंड द्या. गांधीजींनी या मर्यादा सदैव सांगितल्या आहेत. परंतु अहिंसेचें व्रत घेतलेल्यानें कशीहि परिस्थिति असो, हिंसा करूं नये. कांही तरी अविचल आदर्श समाजांत हवेतच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel