आलस्य, औदासीन्य जातें. सारें जीवन जणुं चैतन्यमय होतें. प्रत्येक जण काहींना काही करीत असतो. या वातावरणाचा फायदा प्रत्यक्ष लढणार्‍यांस मिळतो. सर्व जनतेला एक प्रकारें आपण सारे भाग घेत आहोंत  असें वाटतें. सर्व जनता जागृत असल्यामुळें हुकूमशाहीहि येणार नाहीं. हुकूमशाही  यायला लष्करी तंत्रच अवलंबिलेलें नसतें. अशी अहिंसक क्रान्ति घडवून आणायची महात्माजींची इच्छा. अशी जी लोकशाही आणायची तेथें कोणतीच हिंसा नको. राजकीय हिंसा नको, आर्थिक नको, सामाजिक नको, धार्मिक नको. परस्पर सहकार्‍यानें समाज चालेल. अहिंसक समाजरचनेंत ही चतुर्विध हिंसा नको. समाजरचनचेचीं हीं जीं चार अंगें तीं निर्दोष असावींत. महात्माजींच्या शिकवणीचें हें सार आहे. जगाच्या अनुभवांतूनच मीं प्रेरणा घेतली आहे असें ते म्हणतात. मी कांही नवीन सांगतों आहे असें नाहीं. जगाचा अनुभव व्यवस्थित रूपानें मी पुढें ठेवीत आहें. आणि ते पुन्हां असें सांगतात कीं, सशस्त्र क्रान्ति दिवसेंदिवस अशक्य होत चालली आहे. लष्करी शक्ति जगांत वाढत आहे. ती दिवसेंदिवस अधिक यांत्रिक  स्वरूपाची होत आहे. ती दिवसेंदिवस अधिक यांत्रिक स्वरूपाची होत आहे. अशा परिस्थितींत सर्वसामान्य जनताहि सशस्त्र झाली तरीहि प्रभावी यांत्रिक लष्करी शक्तीपुढें कोठला प्रभाव पडायला? जनतेचीं शस्त्रें आणि अद्यावत् सरकारी सत्तेचीं शस्त्रें यांत जमीन अस्मानाचें अंतर असणार. म्हणून महात्माजी म्हणतात कीं, युध्दाच्या मार्गानें आपण जातांच कामा नये. आपण पूर्ण अहिंसक वृत्तीनें प्रतिकार करूं या. हिंदुस्थानांत ही वृत्ति निर्माण झाली तर परराज्यहि येथें राहणार नाहीं आणि देशी लष्करशाहीचाहि संभव नाहीं. जगांत युध्द आहे. आपणांस त्या युध्दांतून सुटायचें असेल तर हाच मार्ग. देशांत अहिंसक क्रान्ति करावयाची. गांधीजींनीं तर कोणत्याहि युध्दांत मी कधीं सामील होणार नाहीं म्हणून सांगितलें आहे. राष्ट्रीयसभेची आजची वृत्ति इतकीच कीं ''हे युध्द किमर्थ तें सांगा. युध्दहेतु सांगा. मग आम्ही बघूं.'' महात्मा गांधींनी, जवाहरलालजींनीं राष्ट्रसभेस पुढें नेलें आहे. पूर्वी ब्रिटिश सत्तेशीं सौद्याची भाषा आपण करीत असूं. आतां ती भाषा नाहीं. आता सौद्याची भाषा असली तरी नैतिक मूल्यें गृहीत धरून ती आहे. युध्द कशासाठीं आहे? बोला. आपल्या राष्ट्राची अहिंसेच्या दृष्टीनें ही प्रगतीच आहे. केवळ सौद्याची भाषा असती तर इतर गोष्टींचा आपण विचारच केला नसता. एकच अट घातली असती. हिंदुस्थानला स्वराज्य देतां का बोला. तसें करीत असाल तर तुमच्या बाजूनें लढूं. राष्ट्रीय सभेंत एवढयाहि गोष्टीवर तृप्त होऊन ब्रिटिशांच्या बाजूनें लढूं म्हणणारे कांही आहेत. परंतु १४ सप्टेंबरचा जो ठराव त्यांत तशी सौद्याची भाषा नाहीं. त्या ठरावांत 'युध्दहेतु जाहीर करा; ते हिंदुस्थानला कसे लावतां तें सांगा.' अशी भाषा आहे. तरीहि हिंदुस्थान युध्दांत सामील होईलच असेंहि त्या ठरावांत निश्चित नाहीं. आम्हांला हें युध्द धर्म्य वाटलें तर विचार करूं. उद्यां चीन तुमची वसाहत व्हावी म्हणून का लढायचें? चीन ब्रिटिश राष्ट्रसंघांत वा साम्राज्यांत आणायचा असेल तर आम्ही कशी मदत करूं? राष्ट्रीय सभा धर्ममय युध्दाच्या भूमिकेवर आहे. नैतिक दृष्टि डोळयांसमोर ठेवून हें युध्द आहे असें अभिवचन द्या. हें लोकशाहीसाठीं असेल तर साम्राज्य सोडा. वसाहतींना स्वातंत्र्य द्या. आम्हांला स्वराज्य दिलेंत; परंतु इतर वसाहती परतंत्रच तरी आम्ही कां म्हणून युध्दांत यावें? केवळ आमचाच प्रश्न नाहीं. महात्माजी ब्रिटिशांबरोबर सौदा करायला तयार नव्हते. महात्माजींची भूमिका राष्ट्रसभेनें सोडली तेव्हांच सौद्याची भाषा आली असें म्हणतात. तसें म्हणणेंहि चूक आहे. आजहि राष्ट्रसभेची सौद्याची भाषा नाहीं. युध्दहेतु पटवा. खात्रीचा पुरावा प्रत्यक्ष रूपांत द्या. हे युध्द न्यायासाठीं आहे असें आम्हांला पटवा. मग आम्ही लढूं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel