कुटुंबातील सर्वांनी काम किती तास करायला हवें तें आपण पाहिलें. त्याचबरोबर अशा कुटुंबाच्या कमींत कमी गरजा काय तेंहि अपाण पाहिलें पाहिजे. पैशाच्या स्वरूपाचाहि, आर्थिक अरिष्टें येतात त्या वेळेस, विचार करावा लागतो. कारण आजची रुपयाची किंमत उद्यां नसते. या सर्व गोष्टी लक्षांत घ्याव्या लागतात. आपण सर्वसाधारण शांततेचा काळ घेऊन एका कुटुंबाचा विचार करूं

या. संसारांतील आवश्यक गरजा पुढीलप्रमाणें असतात.

१. पोटभर अन्न हवें. यांत दूध, तूप, तेल, मीठ, मसाला, थोडीं फळें, इत्यादींचा अन्तर्भाव हवा.
२. शरीररक्षणार्थ कपडे, कांबळीं, खाट, मच्छरदाणी, साबण, तसेंच दिवाबत्ती, भांडींकुंडीं, वगैरे.
३. मनाच्या आनंदासाठीं, विकासासाठीं, शिक्षक, वर्तमानपत्रें, पुस्तकें इत्यादि.
४. रहायला घर, गुरांढोरांसाठी गोठा वगैरे.

अशा आवश्यक गरजा भागायला हव्यात. एवढयानें प्रत्येकाला मी सुखसंपन्न असें  म्हणतां जरी आलें नाही तरी कमींत कमी इतकें तरी मिळायला हवें. प्रत्येक महिन्याला नवरा, बायको, तीन मुलं एवढया कुटुंबाला कमींत कमी पूर्वींच्या हिशेबानें ३७॥ रुपये तरी धरायला हवेत. पुरुषाची मजुरी महिना २१॥ रुपये, स्त्रीची १३॥ आणि मुलांची २॥ रुपये, मिळून महिना ३७॥ होतील. ही किमान मर्यादा झाली. इतके तरी रुपये मिळायलाच हवेत. (युध्दपूर्वकालीन ३७॥ रुपये) किमान मर्यादा ठरली; कमाल मर्यादा कोणती? ३७॥ रुपये दरमहा म्हणजे वर्षाला ४५० रुपये झाले. याच्या पंधरापट,. कमला मर्यादा ठरवावी. मनुष्यानें जास्तींत जास्त वार्षिक उत्पन्न किती घेतलें तर चालेल? तर किमानाच्या पंधरापट एवढे कमाल उत्पन्न क्षम्य धरावें. मनुष्यांतील उद्योगवृत्तीस, साहसास, महत्त्वाकांक्षेस वाव हवा. त्याला प्रोत्साहन हवें. सारेच संत, केवळ समाजासाठीं आपली सारी शक्ति देणारे कोठून आणायचे? म्हणून थोडी सूट ठेवूं या. स्वार्थाला थोडी मोकळीक ठेवूं या. मला अधिक मिळेल तरच मी अधिक उत्पादन करीन, माझी सर्व शक्ति कामीं लावीन असें म्हणणे बरें नाही. परंतु समाजांत, व्यवहारांत ही वृत्ति आहे, म्हणून थोडी सवलत देऊं या. प्रत्येकास मोटार नको, परंतु प्रत्येकास पोटभर अन्न मिळून आवश्यक गरजा भागून मग कोणाजवळ मोटार असली तरी ती डोळयांत सलत नाहीं. परंतु इकडे खायलाहि नाही आणि तिकडे मोटारी, इतकी विषमता असह्य होते. म्हणून आपण असा मधला मार्ग धरूं या. किमान वार्षिक ४५० तर कमाल टोंक ४५०X १५. हीं दोन टोकें आपण ठरवून यांच्यामध्यें सारी समाजरचना बसवूं. पंधरापटींहू, वार्षिक ६७५० रुपयांहून अधिक जवळ असणें ऐषआरामांत जाईल. ऐषआराम नको. अशा प्रकारें वार्षिक किमान ४५० आणि कमाल ६७५० यांच्यामध्यें राहणारा एक वर्ग आपण निर्माण करूं. कोटयाधीश येथें नाहीत, अगदी निर्धनहि नाहींत. एकवर्ग समाज जणुं होईल. थोडी विषमता असली तरी ती सुसह्य होईल. भौतिक संग्रहाला मर्यादा घालण्याचें तत्त्व मान्य केल्याशिवाय लोकशाही चालूं शकणार नाहीं. सत्य, अहिंसा, येऊं शकणार नाहींत. गांधीजी म्हणतात, ''मीहि समाजवादी आहें; परंतु लोकशाही समाजवाद मला हवा आहे. मी अहिंसक समाजवादी आहें. त्या अहिंसेच्या दृष्टीनें जें जें जरूर तें तें मी करीन.'' अधिकारानंतरहि अहिंसेनेंच सारें करायचे. एका पक्षाच्या हातून दुसर्‍याच्या हातीं सत्ता जायची असेल तरी ती अहिंसेनें जावो. इंग्रजांनी कायद्याची सत्ता निर्माण केली. कायद्याच्या बंधनांनी बध्द करून इंग्रज बोलत असतो. गांधीजी सविनय प्रतिकार, सविनय कायदेभंग हा जन्मसिध्द हक्क आहे असें मानतात. इंग्रज सारें कायद्यानें करूं इच्छितो; परंतु गांधीजी सविनय कायदेभंगाच्या हक्काचेंहि समर्थन करतात. त्यांच्या अहकारांत सविनय कायेदभंगहि आहे. परंतु हें सारें नम्रतेनें, अहिंसेनें ते करूं इच्छितात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel