इतिहासांत दोन्ही मार्ग

गांधीजी इतिहासांत क्रान्ति व उत्क्रान्ति दोन्ही पाहातात. कोणी म्हणतात, विचारतात, ''गांधींनी इतिहास वाचला तरी आहे का?'' महात्मा गांधींनी इतिहासाचा तपशील वाचला नसेल, पान न् पान नसेल वाचले; परंतु भाराभर वाचणे म्हणजे तत्त्वग्रहण नव्हे. इतिहासाकडे पाहाण्याची दृष्टि महात्माजींना मिळाली आहे. इतिहासांतून काय घ्यावे, काय शिकावे, काय टाकावे, कोणत्या दृष्टीने इतिहासाकडे बघावे, या गोष्टीला महत्त्व आहे. इतिहास अनुकरणार्थ नसून नवइतिहास तुम्ही आम्ही निर्मावा म्हणून आहे. नवनिर्मिति करण्यासाठी जुना इतिहास अभ्यासायचा असतो. भूतकालीन इतिहासाकडे पाहाण्याची महात्माजींची दृष्टि केवळ सुधारणावादी नाही, केवळ क्रान्तिवादी नाही. या दोन्ही दृष्टींहून त्यांची दृष्टि भिन्न आहे. सुधारणावादी एक प्रकारचे जड सनातनी असतात. मागील पराक्रमांचे पोवाडे गात बसण्यांत त्यांना आनंद होत असतो. पूर्वज कसे मोठे होते, आपण त्यांच्याप्रमाणे झाले पाहिजे, त्यांचे अनुकरण केले पाहिजे असे केवळ सुधारणावादी दृष्टि घेणा-याचे म्हणणे असते. याच्या उलट जे क्रान्तिकारक असतात ते म्हणतात : ''कशाला जुन्याचे तुणतुणे वाजवतां आता? फेका ते. आता जुना जमाना राव राहिला नाही. जुने नका उगाळीत बसू. तो जुना इतिहास तुच्छ आहे, रद्दी आहे. त्या रद्दीतून, त्या चिंध्यांतून काय प्रकाश मिळणार? फेका तो गळाठा. या दोहोंहून महात्माजींची दृष्टि निराळी आहे. ते म्हणतील : ''पूर्वजांनी त्यांच्या काळात पराक्रम केला. त्यांनी स्वतःच्या काळांत क्रान्ति केली, इतिहास निर्मिला. त्या काळी क्रान्ति करून ते पुढे गेले. आपण आज आपल्या काळी क्रान्ति करून पुढे जाऊ या. आपण नवदिव्य इतिहास बनवू या, घडवू या. पूर्वजांनी पराक्रम करून नवइतिहास लिहिला. आपण नको का नवे पान लिहायला? पूर्वजांचे अनुकरण करायचें नाही. त्यांची स्फूर्ति घ्यायची. त्यांचा प्रयत्नवाद घ्यायचा. पूर्वजांची ध्येये तीच आपली असणार नाहीत. आपली ध्येये नवीन असणार, नवीन काळाला अनुरूप असणार, असायला हवीतच. आपणांस पूर्वजांचा वारसा मिळाला आहे. परंतु तेवढयावर समाधान मानून रुटुखुटू संसार चालवणे हे लाजिरवाणें आहे. तो पूर्वजांचा अपमान आहे. त्यांची स्तुतिस्तोत्रें गात बसणे, पुढे न जाणे म्हणजे पूर्वज-पूजा नव्हे. मिळालेल्या वारश्यांत आपण नवीन मोलाची भर घातली पाहिजे. तो वारसा अधिक समृध्द करून आपण पुढच्या पिढीच्या हाती दिला पाहिजे. अशा रीतीनेच संस्कृतीची मशाल अखंड तेवत राहते. जो जुना ठेवा लाभला त्यांत भर घालून तो वाढवा. आपण आजपर्यंत बाह्य सृष्टीत शोध बोध करीत आलो. आता आंतरिक सृष्टीतहि नको का करायला? हे आंतरिक जग दिसले नाही तरी ते सर्वांच्याजवळ सदैव आहे. ते सर्वांच्या प्रतिक्षणी अनुभवास येतच असते. आपण नवीन क्रान्तिमार्ग शोधू या. आध्यात्मिक सृष्टीतील क्रान्ति. मानवाने नेहमी का पशूप्रमाणेच वागावे? टक्केटोणपे खाऊन अधिक शहाणे नको का व्हायला? मी मानव आहे, मी पशूहून निराळा आहे, असे नुसते म्हणून भागत नसते. पशूहून निराळे असाल तर पशूहून निराळया रीतीने वागा. मनुष्यत्वास शोभेल अशा रीतीने आपण इतिहास बनवूं या. मानव्याला उन्नत करील अशी क्रांति करू या. क्रान्तिशास्त्राला निराळी दिशा देऊ या.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel