अधिकाधिक नवीन विचार मिळतात. मनुष्याच्या बुध्दींत नवीन नवीन विचार निर्माण करणारें ज्ञान, हें येतें कोठून? हें कोठून कसे मिळतें? सामान्यतः ज्याला आपण व्यवहारांत बुध्दिमान् म्हणतों तो मनुष्य आणि आत्मशक्ति जागृत करून आपल्या बुध्दीला जागवणारा मनुष्य यांच्यात कोणता बरें फरक असतो? सामान्य मनुष्य जेव्हां युक्तिवाद करतो, बुध्दिवाद लढवतो, त्या वेळेस त्याला स्वतःच्या बुध्दीची मर्यादा, स्वतःच्या मतींतील दोष या गोष्टी लक्षांत येत नाहींत. आपल्या मनाची एक लकब आहे कीं, एखाद्या गोष्टींचे समर्थन करायचें असलें म्हणजे सारा युक्तिवाद तिच्यासाठी आपण करतों. ही वकिली बुध्दि असते. पुष्कळ वेळा वकीलाला माहीत असतें कीं, आपल्या अशीलाची बाजू खोटी आहे. परंतु तिच्या समर्थनार्थ तो सारी सृष्टि उभी करतो. मुद्दे मांडणारी एखादी बाजू घेऊन तदर्थ भांडणारी बुध्दि ही कांही सत्यार्थी नसते. तिनें मांडलेलें, प्रतिपादिलेलें सत्य कांही खरे नसतें. कोणाची तरी बाजू घ्यायची, पक्ष घ्यायचा नि भांडायचें असें अशा माणसांचें असतें. सत्यार्थी मनुष्याची रीत अशी नसते. तो बुध्दिवाद मागून करतो. तो आधीं सत्पक्ष कोणता हें समजून घेतो. खरोखर वस्तुस्थिति काय आहे, न्याय कोठें आहे हें तो बघतो. सत्य कोठें आहे तें पाहिल्यावर, त्याची अंतःकरणांत खात्री करून घेतल्यानंतर मग तें जगाला पटवण्यासाठीं सत्यार्थी मनुष्य बुध्दिवाद करतो. व्यवहारांत आपण ज्याला बुध्दिवाद म्हणतों तें पक्ष घेऊन भांडणें असतें. तो वकिली बाणा, वकिली डावपेंच असतो. तेथें सत्य असतेंच असें नाहीं. खरें सत्य काय तें समजून घ्यावें आणि तें जगाला पटवावें असा तेथें प्रयत्नहि नसतो. व्यवहारांत सामाजिक, राजकीय प्रश्न पदोपदीं येतात. तेथें सत्याचा अर्थ काय? सत्य म्हणजे सत्. प्रशस्ते कर्मणि निष्ठा. जें प्रशस्त कर्म आहे, हितकर आहे, तें आपलेसें करणें. सत् काय आहे हा प्रश्न सत्यार्थी विचारीत असतो. जें मला सत्य म्हणून वाटतें तें सत् आहे ना? सत्य सत् आहे कीं नाहीं हें कसें ठरवायचें? जें मला सत्य म्हणून वाटतें तें प्रशस्त, योग्य आहे कीं नाहीं? जें आपणांस सत्य वाटतें, तें सत् आहे कीं नाही याची एक कसोटी आहे.

''यद्ताभूहितमत्यन्तं एतत्सत्यम् मतं मम ॥''

आत्यन्तिक भूतहिताच्या दृष्टीनें विचार करून सत्य काय तें ठरवायचें. सत्य काय, असत्य काय हें ठरवितांना जगत्कल्याणाची शाश्वतदृष्टि हवी. त्या दृष्टीचा उपयोग हवा. आत्महितासाठी खोटेंहि बोलावें असें म्हणत. म्हणजे सर्वश्रेष्ठ आत्महित. आत्महित साधेल तर तें सत्य. तुमची कोणतीही लोकशाही असो. अमुक गोष्ट करावी कीं न करावी; अमुक कायदा करावा कीं न करावा; अमुक नियम हवा कीं नको; कशावरून ठरवावयाचें? आपण लोकशाहींत मत घेतों. मत देतांना कोणती दृष्टि हवी? सावकारीचें नियंत्रण करावें कीं न करावें? तुम्ही सर्व समाजाच्या दृष्टीनें विचार करा. सावकारानें फक्त सावकारवर्गाचें हित बघावें, कुळानें केवळ स्वतःच्या दृष्टीनें. यामुळें सत्य दूर राहील. तुमच्या वर्गहितानें भूतमात्राचें हित साधणार आहे का? इतर सटर फटर गोष्टी नको सांगूं. ते आपापले वर्गीय अहंकार दूर ठेवून सर्व भूतमात्राच्या हिताच्या दृष्टीने उत्तर द्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel