यतिधर्म नि राजधर्म

यतिधर्म नि राजधर्म यांत फरक असा कीं,  यति कधींच हिंसा करणार नाही. परंतु सत्यस्थापनेसाठीं, न्यायस्थापनेंसाठीं राजधर्मांत मर्यादित हिंसा सांगितली आहे. न्यायप्रस्थापनेसाठी राजधर्मांत हिंसेला मुभा दिली आहे. ती हिंसा शास्त्रोक्त आहे. ज्याला शास्त्रोल्लंघन करण्याचा अधिकार नाही त्यानें हिंसाहि सोडतां कामा नये. क्षत्रियानें क्षत्रियधर्म तर सोडायचा नाहीं, मग हिंसा कशी सोडायची? परंतु यतीनें सत्य-अहिंसा सांभाळून वाटेल तें मोडावें. सारे विधिनिषेध, सारे शास्त्रार्थ त्यानें गुंडाळून ठेवावे. सारे नियम सत्य नि अहिंसेच्या पोटांत येतात. जो सत्याग्रही आहे, अहिंसक सत्याग्रही आहे, तो इतर सर्व सोडून सत्यासाठी उभा राहतो. ''सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज'' यांतील हाच भावार्थ आहे. आणि खरें पाहिलें, आजवरचा अनुभव पाहिला तर अखेर असेंच दिसेल. हिंसेनें सत्याची स्थापना होत नाही. असत्य व हिंसा यांनीं समाजांत सत्य नि अहिंसा कशीं कशीं येणार? म्हणून अहिंसेलाच बंड करण्याचा अधिकार गांधीजी देऊं पाहातात. यतिधर्मांत सारें सहन करायचें. गांधीजी त्यांत प्रतिकार ओतूं इच्छितात. अहिंसकशक्ति प्रतिकाररूपानें, बंडाच्या स्वरूपांत ते उभी करूं इच्छितात. कारण हिंसक बंडांतून, हिंसक क्रान्तींतून पुन्हां निराळया स्वरूपांत हिंसाच सत्तारूढ दिसते. मतपरिवर्तन करून कायदे बदला यांत लोकशाहीचा प्राण आहे. परंतु मतपरिवर्तन करायला मी आत्मक्लेशहि भोगीन. कायदा अहिंसक रीतीनें मोडून तदर्थ होणारी शिक्षा भोगून मी माझ्या आत्मबलानें मतपरिवर्तन करू इच्छितों. मानवाचा हा जन्मसिध्द हक्क आहे असें गांधीजी म्हणतात. पाश्चिमात्य राजनीतिज्ञ ही गोष्य कबूल करींत नाहींत. मानवाचा हा अभिजात हक्क आहे अशी कबुली द्यायला पाश्चिमात्य तयार नाहींत. ते म्हणतात, अशानें क्रान्ति होईल. गांधीजी म्हणतात, ''होऊ दे.'' जी राज्यसंस्था अन्याय करील, तिचें लोकमताचें अधिष्ठान काढून घेतलें पाहिजे. ती चालतां कामा नये. ती राज्यसंस्था म्हणेल कीं, बेकायदा वागायचा तुम्हांला अधिकार नाहीं. मी म्हणेन आहे; जोंपर्यंत अहिंसक तोंवर आहे. मी हिंसेनें विरोध करणार नाहीं. हिंसेनें जाणारे जावोत; माझा मार्ग अहिंसेचा. मी कायदा मोडला तर मला शिक्षा करतील. मी ती भोगीन; परंतु स्वस्थ नाहीं बसणार. जनतेच्या नागरिक हक्कांची गळचेपी निमूटपणें मी सहन नाहीं करणार. मी अहिंसक रीतीनें त्या कायद्यांना विरोध करीन. मला न्यायालयासमोर खेंचतील. हा बंडखोर आहे असें म्हणून माझ्यावर खटला भरतील. भरोत. मी सांगतच राहणार कीं, जोंपर्यंत मनुष्य अहिंसक प्रचार करीत आहे तोंवर त्याच्या नागरिक हक्कांवर गदा येतां कामा नये. काँग्रेसमंत्र्यांनीं अहिंसक रीतीनें प्रचार करणार्‍यांवर खटले भरूं नये, त्यांचे नागरिक हक्क हिरावून घेऊं नये. अत्याचार करणारे कोणी असतील तर त्यांची गोष्ट निराळी. मी क्रान्तिकारक आहें. सरकारविरुध्द अहिंसक रीतीनें अप्रीति उत्पन्न करण्याचा माझा जन्मजात हक्क आहे. हिंसक क्रान्ति समजांत यावयास नको असेल तर अहिंसक रीतीनें दाद मागणार्‍यांस, अहिंसक रीतीनें चळवळ करणार्‍यांस मुभा द्यायला हवी. समाजव्यवस्था वा राज्यव्यवस्था कायम स्वरूपाची कधींच नसते. परिस्थित्यनुरूप फेरबदल करावे लागतात. विधिनिषेध, संकेत बदलावे लागतात. गांधीजी रूढ अर्थानें सनातनी नाहींत; परंतु ते खर्‍या अर्थानें स्वतःला सनातनी म्हणवतात. सनातनी शब्दचा खरा अर्थ ''सनातनो नित्यनूतनः'' असा आहे. जो बुध्दीप्रमाणें वागतो, काळाची गति ओळखून वागतो तो सनातनी. आज रूढीच्या भक्तांना, जुन्याला चिकटून बसणार्‍यांना आपण सनातनी म्हणतों. गांधीजी जेव्हां स्वतःला सनातनी म्हणतात तेव्हां ते जुन्या अर्थानें नाही म्हणत. ते तर बंडखोर आहेत. ते म्हणतात, ''महाभारताचा कर्ता वेदव्यास यांच्या अर्थानें मी सनातनी हिंदु आहें ! व्यासांनीं लक्षावधि लिहून सार काय सांगितलें? व्यास महर्षि म्हणतात की, तराजूच्या एका पारडयांत राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, इत्यादींचे वजन टाका आणि दुसर्‍या पारडयांत सत्याचें टाका. काय दिसेल? सत्याचें पारडें जड आढळेल.'' याचा अर्थ हा कीं, बाह्य कर्मकांडाचा पसारा, हीं यज्ञादिक कर्मे यांना तादृश महत्त्व नाहीं. महत्त्व सत्यनिष्ठेला आहे. रूढी, विधिनिषेधांचीं अवडंबरें यांना नाहीं. विधिनिषेध एके काळीं सत्य, अहिंसेसाठींच होते. परंतु परिस्थिति बदलल्यावर ते कुचकामी होतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel