rita.joharapurkar@gmail.com

युरोपायन: भाग ७- जखमी सिंह

जेव्हा कुणावर बेसावध असतांना हल्ला करुन त्यांना मारले जाते तेव्हा त्या हल्याला आपण भेकडपणाचे कृत्य,  भ्याड हल्ला किंवा पाठीत खंजीर खुपसणे म्हणतोआणि जगात असे हल्ले आधीही झाले व आताही होतात.

असाच भ्याड हल्ला स्विझरलँडच्या शूर सैनिकांवर ते बेसावध असतांना झाला.  त्यात त्यांचे अनेक लोक व सैनिक मारल्या गेले.  त्याचं शल्य त्यांच्या जिव्हारी लागलं.  त्याची आठवण व प्रतीक म्हणून ल्युसर्न शहरात हे जखमी सिंहाचं स्मारक आहे.  बारकाईने पाहिल्यावरही त्यातला अजून एक संदेश आमच्या लक्षात नाही आला.  पण जेव्हा आमच्या टूर मॅनेजरने सांगितले की, " तो एक उत्तम गाईड पण आहे. लक्षपूर्वक बघा त्या सिंहाच्या वर जो काळा आकार दिसतोय त्याचा आकार डुकरासारखा आहे आणि युरोपियन लोकांमध्ये हा शब्द शिवी समजला जातो!"  म्हणजेच तो जखमी सिंह म्हणजे त्यांचे शूर सैनिक व तो आकार म्हणजे बेसावध असतांना पाठीत खंजीर खूपसणारे भ्याड शत्रू!

प्रत्येक कलाकृती तिच्याही नकळत काही संदेश देत असते.  तो संदेश ती भूमिका म्हणजे आपल्याला उपदेश नसतो की बोधही नसतो.  तो प्रचारही नसतो तर आपले माणूसपण व माणूसकी अधोरेखित करणारे अमोलिक अशी मुल्यात्मक स्वरुपाची जाण असते.  हेच कार्य शिल्पकार घटना,  प्रसंग,  संवेदना हे सारे त्या शिल्पात ओतून नकळतपणे त्यात एक जाणिवेचे बीज पेरतो.

अशी 'स्मारकं' समाज शुद्धीकरणाचेही काम करीत असतात.  त्यातून संस्कृती विकृती पासून वेगळी होते आणि हाच संदर्भ पकडून ज्या छोट्या छोट्या देशांनी आपापल्या वेगळ्या चुली मांडल्या होत्या त्यांना आता कळून चुकले की सामर्थ्यवानाच्या शांततेलाच अर्थ असतो.  म्हणून ती छोटी छोटी राष्ट्र एकत्र आली व ठरविले की आपण जरी स्वतंत्र असलो तरी आपले चलन एकच राहील व एकमेकांच्या देशात येण्यासाठी कुणाला सीमा बंदी नसेल.  थोडक्यात अपयश माणसाला शहाणे बनवते.  पुन्हा उभे राहण्याची ताकद देते व आपला पाया भक्कम करण्यास मदत करत.  खरचं अपयशानं माणूस जे काही शिकतो ते यश मिळविल्यानंतरही कामी येतं.  कदाचित हाच संदेश द्यायचा असेल! ओम् शांती.

युरोपायन: भाग ८- अखंड उर्जेचा प्रवाह (जॉय ऑफ युरोप)

युरोप मधील प्रवास सुखकर व आनंददायी करणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे बसचा कोच कँप्टन! म्हणजेच आपलाकडचा ड्रायव्हर! तिकडे त्याला "ए ड्रायव्हर" म्हणून संबोधणार नाही,  तर कँप्टन म्हणून सन्मानपूर्वक वागणूक देतात!

असा हा जॉय नावाप्रमाणेच सतत आनंदी हसतमुख व अखंड उर्जेचा स्रोत असणारा.  आम्ही बसमधून केव्हाही चढत उतरत असतांना गुड मार्निंग,  गुड आफ्टरनुन,  हॅव अ नाईस डे असं त्या त्या वेळेप्रमाणे शुभेच्छा देणारा! या उलट आपण माणसं अगदी सहजपणे जात,  धर्म,  रंग,  रुप,  आर्थिकता इत्यादी प्रकाराने समाजाला विभागतो. त्यापेक्षा  कालानुरूप  दिलेल्या अशा शुभेच्छा अखंड उर्जेचा स्रोत  घेऊन,  चेतना बनून शरीरात जीवनरस ओततात.  त्यामुळे आपल्या वाटेला आलेला प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने व आनंदाने जगायला शिकवतो.  व्यक्तिगत संवेदना,  आनंद सामाजिक सार्वत्रिक होत जातात.  त्यामुळे सतत आनंदी राहण्याचा  मार्ग सापडतो.

ह्या न्यायाने आमच्या  त्रेचाळीस जणींच्या  जवळजवळ ऐंशी नव्वद बॅगा तो एकटाच रोज सकाळी डिक्कित ठेवणार व रात्री काढणार,  ते ही व्यवस्थितच! कुठेही कशाही न फेकता लाईन मधे ठेवणार!
अशावेळेस आम्हालाच लाज वाटून त्याला आम्ही "कँन आय हेल्प यू?" म्हणत असू तेव्हा नम्रपणे (लाचारीने नव्हे) नकार देऊन हसून "नो प्राब्लेम" म्हणतं असे.  अशावेळी मला आपल्याकडचा शिवनेरी बसचा प्रसंग आठवला.  एकदा पुणे नासिक प्रवास करीत असताना बसमध्ये दोन तीन वयस्कर बायामाणसं होती.  नासिकला गाडी थांबल्यावर त्यांना स्वतःच डिक्की उघडून त्यांच्या बॅगा काढाव्या लागल्या.  गाडीत कंडक्टर असूनही कुठलीही मदत न करता निघून गेला.  त्यातच आमच्या भारतीयांची अवजड सामानाच्या बाबतीत जी मानसिकता आहे ती टूर कंपन्यांनी कितीही सोय केली तरी बदलायला तयार नाही.  काही तुरळक अपवाद वगळता प्रत्येकीच्या
दोन दोन अवजड बॅगा,  हँडबँग वेगळ्याच! याउलट तेथील लोकांच्या बॅगा एखादा लहान मुलगाही ओढू शकेल इतक्या छोट्या असतात.

वेळ पाळण्याच्या बाबतीतही हे लोक एकदम कडक शिस्तीचे! जी वेळ ठरली असेल त्याच वेळेस हजर! एक मिनिटही मागेपुढे नाही की विडी तंबाखू खात टाईमपास नाही.  माझ्या पाठीवर व बँगवर शाकाहाराच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर बघून एकदिवस तो आमच्या टेबलकडे उत्सुकतेने आम्ही काय जेवतो हे बघण्यास व जेवण्यासाठी आला.  मी केलेली वड्याची भाजी व पालक पुरीचा स्वाद त्याने आवडीने घेतला व प्रामाणिकपणे कौतुक ही केले.  

कुणीतरी म्हटलंय,  "ये दुनिया ताकद से नही,  रंगो से नही,  मोहब्बत से चलती है!"
खरचं आहे ते:  अवघे विश्वची माझे घर. ओम् शांती.

युरोपायन : भाग ९- आहे मनोहर तरी.

युरोपायनच्या या लेखमालेतून लंडन ते इटली या आठ,  दहा देशांचे धावते वर्णन करतांना आलेले अनुभव आणि त्याचे मनात उमटलेले पडसाद मांडले.  वरवर जरी ते बघायला व ऐकायला मनोहर वाटत असले तरी म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात.  त्याप्रमाणे ह्या देशांची दुसरी बाजू काही वेगळचं सांगत होती.     

लंडन बघत असताना एकीकडे डोळ्यात कौतुक व कुतूहल दाटत होते तर दुसरीकडे विचारचक्र चालू होते,  हे सार साम्राज्य दुसऱ्याला लुटून उभं केलय यांनी व काही अंशी का होईना वर्णभेदही आहे. आपल्या देशातही उत्तुंग इमारती आहेत,  आकाशाशी स्पर्धा करणारे गिरीशिखरे आहेत,  दुर्गम गड किल्ले आहेत,  तरीसुद्धा आपण पर्यटन क्षेत्रात ही इतके मागे का? तर निसर्गानेच आपल्याला दोन्ही हाताने भरभरून फुकट दिल्यामुळे आपल्याला त्याचे मोल नाही?

चोवीस तास स्वर्गीय सुखाच्या रंगीन दुनियेत डुबलेले पॅरिस बघताना जाणवले,  विज्ञान,  तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने सुखोपभोगांची मुबलक साधने यांना प्राप्त झाली आहे.  त्यामुळे पैसा कमवणे आणि सुखोपभोगांसाठी त्याची उधळपट्टी करणे हाच बहुतांश लोकांचा एककलमी कार्यक्रम असावा असे वाटते.  त्यामुळे अशा या अनिर्बंध जीवनशैलीमुळे स्पर्धा,  संघर्ष,  मानसिक तणाव,  असुरक्षितता,  परस्परांविषयी अविश्वास या गोष्टींनी त्यांचे जीवन सैरभैर होत आहे.  त्याचमुळे कदाचित तेरा चोदा वर्षाची मुलांची हिंसक होऊन पिस्तुलाने अनेकांचे प्राण घेण्यापर्यंत मजल जात आहे.  त्यातच आता निर्वासितांच्या लोंढ्यामुळे तेथेही चोऱ्यामाऱ्या गुन्हेगारी वाढली आहे.

स्विझरलँडचे माऊंट टिटलीस पाहतानाआपल्या कडील सोनमर्ग,  लडाख,  दार्जिलिंगची हिमशिखरे आठवली.  जरी स्विझरलँडला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखले जात असले तरी त्यातही आपल्या भारतीयांचाच मोठा वाटा आहे कारण परकियांच्या आश्रयाने स्वकीयांनाच लुटण्याचा सोपा मार्ग स्वतःला संस्कृती रक्षक,  समाज रक्षक म्हणवणाऱ्यांनी स्विकारला व अरबो खरब संपत्ती त्यांच्या बँकेत ठेवली आहे आणि जेव्हा त्यांचे अकस्मात निधन होते तेव्हा पुराव्या अभावी कितीतरी अब्जो रुपये तसेच पडून राहतात व कालांतराने त्याच पैशातून त्याच पैशातून त्यांनी त्यांच्या देशाचा स्वर्ग भासावा असा विकास केला.  म्हणून तर सिनेमाच्या शुटिंग द्वारेही आपण त्यांना प्रसिद्धी मीळवून दिली.

थोड्याफार फरकाने सर्व युरोपमधील देशांची कहाणी सारखीच आहे.  त्यांच्या पूर्वजांनी जे बक्कळ कमवून ठेवले व जो वारसा जतन करून ठेवलाय त्यावरच ही राष्ट्रे ऐशोआराम भोगत आहेत.  थोडक्यात आपल्याकडील लाडावलेल्या बाळासारखी ही राष्ट्रे आहेत.  सिंगापूर,  दुबईशी तुलना करता गेल्या वीस पंचवीस वर्षात यांनी एकही नवीन शोध लावला नाही.  आहे त्या विरासतीची उधळपट्टी चालू आहे.  त्यामुळे त्यांनाही बेकारीची समस्या भेडसावत आहे.

इटलीच्या एकदिवसीय वास्तव्यात तेथील वास्तू पाहतांना अचंबित व्हायला होतं.  आमचा टूर मॅनेजर सांगत होता हा देश इतका मोठा आहे की तो सर्व पाहण्यासाठी एक महिना ही कमी पडेल.  तेवढं एक सोडले तर तो भारताचाच भाऊ शोभावा असा आहे कारण तेथेही प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे,  बेशिस्तपणा आहे.  याची थोडी जाणीव त्या देशात प्रवेश करतांनाच होते कारण संपूर्ण युरोपमधे अगदी शेवटच्या सीटवर बसूनही विमानात बसल्यासारखे वाटत होतं.  ते आठवून मलाच माझे हसू आले.  वाटलं आम्ही जे दहा बारा दिवस हवेत तरंगत होतो,  ते आता जमिनीवर येण्यासाठी! मुद्दाम इटलीला शेवटी ठेवले असावे त्यामुळे भारतात त्याच वातावरणात जाण्यासाठी मानसिकता तयार व्हावी.

थोडक्यात काय तर "दिसतं तस नसतं" या म्हणीप्रमाणे सर्व युरोपियन एकाच साच्यातून काढलेल्या शाडूच्या मूर्तीप्रमाणे वाटतात.  रंगरुप,  वेषभूषा,  संस्कृती,  खाणेपिणे जवळपास सारखेच! या उलट आपल्या देशात दर दहा मैलावर बदलणारी भाषा,  वेगवेगळे रंगरुप,  संस्कृती,  निरनिराळी वेषभूषा त्यामुळे कशी विविधतेतही एकता दिसते.  फक्त गरज आहे त्याला प्रामाणिकतेची,  स्वच्छतेची व शिस्तीची जोड मिळण्याची.  तेव्हा आपल्यासारखे आपणच असू कारण देशाची आर्थिक व सामाजिक व्यवस्था निकोप असेल तर त्याच देशाचा दर्जा उंचावतो.  शेवटी एवढेच म्हणेन!

अनेक भाषा, जातीपंथ, याभूमीचे वैशिष्ट्य असे। विविधतेत, या वैचित्र्यातही, भारत परी एकात्म दिसे।
भारत माझी माय माऊली,  भारतीय मी प्रथम असे। या श्रद्धेला,  परंपरेला, शत्रूचे आव्हान असे। जय हिंद.

युरोपायन: भाग १०- स्वार्थ ते परमार्थ

पर्यटन म्हणजे फक्त मौजमजा करणे नव्हे तर आपले व्यक्तीमत्व समृद्ध करण्यासाठी आपल्याला विविध प्रांत,  देश,  त्यांची संस्कृती,  इतिहास,  वर्तमान इत्यादी बघण्याची एक अपार उत्सुकता जवळ बाळगावी लागते.  त्याचबरोबर आपल्याही एखाद्या तत्वाचा प्रसार करता आला पाहिजे.  म्हणूनच युरोप बघत मौजमजा करतांनाही जे जीव स्वत:ची बाजू मांडू शकत नाहीत,  स्वतःच्या समर्थनार्थ बोलू शकत नाही,  त्यांच्यासाठी बोलून शांतपणे त्यांची बाजू मांडण्याच काम मी करण्याच ठरविले.

कारण वास्तव भयंकर आहे.  फक्त प्राणीच नव्हे तर आपले आरोग्यही धोक्यात आहे कारण निसर्गसाखळीच आपण धोक्यात आणली आहे.  या सर्व परिस्थितीस अज्ञानी नाही तर स्वतःला पदवीधारक,  सुशिक्षित समजणाऱ्यांचेच कर्तृत्व कारणीभूत आहे.  मानवाचा दिवसेंदिवस वाढणारा क्रूरपणा शिक्षणामुळे का थांबला नाही बरं? अहिंसा,  सहिष्णू या भावना फक्त पुस्तकांची शोभा वाढविण्यापुरत्या राहिल्या आहेत,  व्यवहारात मूल्य निष्फळ ठरत आहे कारण मुल्यांऐवजी स्वार्थाला,  व्यवहाराला आपण महत्त्व देत आहोत.  मुक्या प्राण्यांच्या जीवापेक्षा,  यातनेपेक्षा कुतर्क करण्याकडे कल वाढतोय.  हे वांरवार घडणाऱ्या घटनांकडे बघतांना जाणवते.  आपण जे करत आहोत त्याबद्दल सारासार विचार करण्याचीही तसदी आपण घेत नाही.

खरतरं तत्वज्ञान,  अध्यात्म,  अहिंसा,  फक्त मानवाची नाहीतर सर्व प्राणीमात्रांबद्धल समता,  करुणाभाव या साऱ्यांचे प्रथम पुरस्कर्ते आपण आहोत आणि स्वतःच्या जीभेचे चोचले पूरवन्यासाठी निष्पाप,  दुर्बल,  मुक्या प्राण्यांचा केला जाणारा छळ,  त्यांची निर्घृण कत्तली व त्याचे मतलबी समर्थन याची पराकोटीही आपल्याच देशात सर्वाधिक वेगाने होते आहे.

या उलट थोर संस्कृती,  थोर इतिहास हे काहीही नसणाऱ्या विदेशीयांची नैतिकता,  प्राण्यांप्रती असलेल त्यांच प्रेम,  मोजक्याच का होईना जेन गुडैल सारख्या काहीजणी स्वताचा जीव धोक्यात घालून प्राण्यांच्या अस्तित्वासाठी वर्षोनवर्षे जंगलात राहून धनदांडग्यांशी लढा देत आहे.  बाकी गोष्टींप्रमाणे त्यांच्या ह्या वृत्तीचं अनुकरण आम्ही का नाही करत? उलट त्या विरोधात अधिक उन्मादाने मुक्याप्राण्यांना उलटे सुलटे फिरवून सर्व जगासमोर किळसवाणे प्रदर्शन करतो.

अशावेळी मुठभर का होईना,  सगळ्या प्राणीमात्रांच्या अस्तित्वासाठी लढण्याचे दिवस अजूनही संपले नाहीत.  सारेच दीप काही मंदावलेले नाहीत.  निष्ठा,  समर्पण,  मूल्य ह्या शब्दांचे अर्थही बदलले नाहीत अजून! प्रश्न आहे तो ह्या साऱ्या प्राण्यांप्रती आपल्याही मनात करुनाभाव जागृत होण्याचा!

मला माहीत नाही माझा हा हेतू किती सफल होईल? पण त्यांच्या विचारांना न बोलता,  कुठलीही घोषणा  न देता एक छोटासा धक्का देण्याच काम मी पाठीवर व बॅगवर शाकाहाराच्या समर्थनार्थ बॅनर लावून नक्कीच केलं.  याचा पुरावा म्हणजे शेकडोजण मेसेज वाचत होते तर काही फोटो देखील काढत होते.  तरीही आपण जेव्हा सामाजिक परिवर्तनासाठी काम करतो तेव्हा आपल्या अपेक्षांमधे अशीही एक शक्यता ठेवली पहिजे की कदाचित आपल्या हयातीत काहीच बदल होणार नाहीत.  तरीही आपल्याला काम करायचं आहे कारण जबरदस्त इच्छेचा पारसमणी हातात असला की आपण जगही बदलू शकतो.  
शेवटी हीच प्रार्थना,
जे टाळणे अशक्य,  दे शक्ती ते सहाया| जे शक्य साध्य आहे,  निर्धार दे कराया | ओम् शांती.           

युरोपायन: भाग ११- जिने को और क्या चाहीये

ज्यांच्यामुळे मी नेहमीच्या अनुभवापलीकडल्या प्रदेशात पाऊल ठेवू शकली व अनेक स्नेहीजण जोडल्या गेले त्यामुळे माझं अनुभवविश्व अधिक समृद्ध झाले.  ह्याचे सारे श्रेय मी प्रथम माझ्या मिस्टरांना देते.  दोन्ही मुलं व्यवस्थित सेटल झाल्यावर मी मिस्टरांना सांगितले की आतापर्यंत मी माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यात.  त्यामुळे आता मला वर्षातून पंधरा दिवस फक्त स्वता:साठी जगायचे.  पण नक्की कुठे जायचे असा काहीच प्लॅन नव्हता.  जाऊ एखाद्या विपश्यना शिबिरात  असा विचार केला होता.  कारण एकटी दुसरीकडे कुठे जाणार! पण एकदिवस योगायोगाने'वुमन्स स्पेशल'ची जाहिरात वाचण्यात आली आणि माझ्या मनाने परत उचल घेतली.  मला माझे इप्सित साध्य झाल्यासारखे वाटले.  

पण नेहमीच आपण ठरवतो तसेच घडू देईल ती नियती कसली? ती आपला तडाखा देतेच.  त्यामुळे आयुष्यात आलेल्या काही अकस्मात कठीण प्रसंगांना तोंड देता देता सार आर्थिक गणित कोलमडलं.  पण त्यावरही मात करत आमच्या ह्यांनी मला थायलंडच्या रुपाने पहिली परदेशवारी घडवून आणली.  खरतरं मनातून थोड गिल्टी वाटत होते! पण म्हणाले मला माहिती आहे तुला जग बघण्याची खूप हौस आहे! तू निसंकोचपणे जा! याचा अर्थ असा नाही की आम्ही, "जो तुमको हो पसंद वही बात करेंगे,  तुम दिनको रात कहो तो रात कहेंगे" या कँटेगरीतले आहोत!

तर, "भाडणं,  रुसवेफुगवे,  थोडासा ईगो" ह्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे सामान्यच जोडपं आहोत! तरीही आमची जोडी कशी जोडाक्षरा सारखी, एकमेकांना विलग केल्यास अर्थ नसल्या सारखी अशी अतूट आहे!

त्यानंतर माझे दोन्ही मुलं आपापल्या कामाचा व्याप सांभाळून दूर असूनही आमची काळजी घेणारे! अकस्मात आलेल्या संकटांना न डगमगता सामोरं जात वरतून, "आई तू जा फिरायला,  होईल सारं नीट,  आम्ही आहोत ना!" म्हणून धीर देणारे! माझे स्वप्न पूर्ण करण्याची दोघांमध्ये जणू चढाओढच लागलेली असते.  

ते म्हणजे माझ्यासाठी. "मेरे दो अनमोल रतन,  एक है राम और दूजा लखन" आहेत.

आणि त्यांच्या पाठीशी माझ्या दोन्ही सुना आनंदाने उभ्या असतात.  माझ्या ह्या महागड्या छंदाबद्धल त्यांची कधीही कुरकुर नसते.  उलट जास्तीत जास्त नवीन नवीन तंत्रज्ञानाची मला ओळख करून देऊन मला अधिक स्वावलंबी बनवतात.  त्याच बरोबर माझ इंग्रजीचे ज्ञान वाढविण्यासही मदत करतात.  त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना सोपे जाते.  सुना नावालाच! आमच्यात मैत्रीचेच नातं अधिक! त्यामुळे त्यांना नात्याच दडपण व मला अपेक्षांचे ओझे बाळगावे लागत नाही.

आणि शेवटी ज्याच्या निरागस हास्यामुळे व मोहक बाललीलांमुळे मी सारी दु:ख विसरून नव्या उमेदीने रोजच्या जगण्याला सामोरी जाते तो माझा गोंडस नातू! खरंच - जिनेको और क्या चाहीए?

मी युरोपला जायचे ठरवले तेव्हा माझी एक मैत्रीण जी काँलेजची प्रिन्सिपल होती.  मागील वर्षीच रिटायर झाली.  मी तीला म्हणाले चल आता परत जुने दिवस आठवून आठ दहा दिवस एन्जॉय करुया,  तर म्हणाली, "अरे किती भाग्यवान आहेस गं तू! माझे मिस्टर तर मला एकटीला सोडतच नाहीत.  आम्ही म्हणजे सोन्याच्या पिंजऱ्यात फडफडणारे पक्षी आहोत! तू खरी करोडपती!"

तिच्या  त्या शब्दांमागची वेदना मनात कालवाकालव करुन गेली.  पण त्याच बरोबर आज मला सार्थ अभिमान आहे कारण पैशाने नसली तरी अनुभवसंपन्न जग पाहण्याची श्रीमंती
आणि त्यामुळे पाहिलेले जीवनातील चढ उतार! अस आयुष्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे.  म्हणून आज मी करोडपती पेक्षाही स्वतःला श्रीमंत समजते.  म्हणून माझ्या ह्या पार्टनरला परत एकदा थँक्स म्हणून त्यांच्या एकसष्टसाव्या  वाढदिवसाची ही माझी शब्दरुपी भावसुमनांजली!

नाही आणलेत आकाशातले तोडून जरी तारे, नव्या नव्या विचारांचे रोज घातले वारे
नसेल कधी आणला गजरा माझ्यासाठी,  आयुष्याच सुगंधित केले सतत राहून पाठी.  रीतरंजन.

युरोपायन: भाग १२- विडे निरोपाचे

युरोपायनच्या लेखमालेतील हा शेवटचा लेख.  अनेक देश फिरतांना आलेले अनुभव व सोबतच्या सगळ्यांच्या सहवासातून निर्माण झालेले मैत्रीचे नाते.  हे सगळं अनुभवल्यानंतर त्याचे मनात उठलेले तरंग हे सगळं तुमच्या समोर मांडतांना स्वतःच अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध होत असल्याच जाणवत होत.  तसेच तुमच्या प्रांजळपणे उस्फूर्त दाद देणाऱ्या प्रतिक्रिया मला नेहमीच आनंददायक वाटतात.  त्याबद्दल  वाचून व्यक्त होणारे व अव्यक्तांनाही मनापासून धन्यवाद. तसेच सोशल मिडीयाचेपण आभार मानते कारण इथे आपला एकलव्य होत नाही.  त्यामुळे मुक्तपणे विचार मांडू शकतो आणि त्या द्वारे जर कुणाच्या भावनांना मोकळे होण्याची वाट मिळत असेल तर माझ्यासाठी तो आनंदाचा,  समाधानाचा क्षण आहे.  कारण प्रत्येकाच्या मनात जरी असेच भाव असले तरी सगळ्यानांच नाही व्यक्त होता येतं.  म्हणून ह्या साऱ्या भावना माझ्या एकटीच्या नाहीत तर आपल्या सर्वांच्या आहेत.  म्हणून मी सहसा आभार मानन्याच्या फंदात पडत नाही.  कारण तुमचे स्थान माझ्या ह्दयात आहे.

शेवटी इतकेच म्हणेन की वाचकांपैकी काहीजणी जरी वर्षातून चार आठ दिवस फक्त स्वता:ला नव्याने ओळखण्यासाठी परत एकदा भूतकाळातल्या सारखे समरसून जगण्यासाठी व त्याच त्या मऱ्यादित परिघात फिरून डाऊन झालेली बँटरी खऱ्या अर्थाने रिजार्ज करण्यासाठी सगळ्या पाशातून मुक्त होऊन एकदा तरी परदेशात प्रवासाला जावे.  त्या निमित्ताने सर्व गुणदोषासकट आपणच आपल्याला नव्याने सापडतो आणि आपले ओठ एक से. मी. ने का होईना सगळ्यांनकडे बघून प्रसरण पावतात!

मला माहिती आहे 'बँग भरो निकल पडो' हे म्हणायला सोपे आहे पण ते कृतीत उतरवनं तितकेच कठीण आहे.  कारण एकतर'स्त्री'ला स्वतः एकटीने प्रवासाला जाण्याची हिंमत नाही आणि चुकून केलीच तर तशी पाठवण्याची पुरुषांची मानसिकता नसते.  पण 'वुमन्स स्पेशल' टूरला असणारी गर्दी पाहून बराच बदल झालेला दिसतो.  प्रश्न आहे अजून जिथे राहिलाय तीथे होण्याचा! तसा काही बदल घडला तरी या लेखमालेचा उद्देश सफल झाला असे मी समजेन!

बापरे;युरोप फिरतांना नाही दमले एवढे त्याचे वर्णन रंगवन्यात दमछाक झाली.  चला तर आता हे निरोपाचे विडे तुम्हाला पण पर्यटनाच्या आनंदात रंगण्यासाठी देऊन तुर्तास तुमचा निरोप घेते!
स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा.
मुक्ती नको मज तृप्ती नको, मज येथील हर्ष नि शोक हवा. सध्या एवढीच भावना. बायबाय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel