३२ शिराळा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते ती नागपंचमी आणि तेथील जिवंत नागाची पूजा! ३२ शिराळा आणि येथील नागपंचमी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.  

शिराळा हे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एक गाव आहे,  हे गाव अतिशय छोटे खेडेही नाही आणि अतिशय मोठे शहरही नाही, शिराळा हे ग्रामीण परंपरा जपणारे एक गाव आहे जे तालुक्याचे ठिकाण आहे.  शिराळा हे जरी सांगली जिल्ह्यातील गाव असले तरी ते अतिशय पश्चिम भागात असल्याने कोकणाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे शिराळ्याला मिनी कोकण असेही म्हटले जाते.  शिराळा हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी ३२ गावांचा कर येथे जमा केला जायचा त्यावरून गावाला ३२ शिराळा असे नाव आहे.  गावात समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती मंदिरापैकी एक वीर मारुती मंदिर आहे. संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जात असताना त्यांना सोडवण्यासाठी शिराळा मध्ये प्रयत्न झाला होता.  

शिराळा मधील नागपंचमी तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.  नावनाथांपैकी एक गोरक्षनाथ महाराज यांनी येथील नागपंचमी सुरू केली आहे,  इतकी प्राचीन परंपरा या नागपंचमीला लाभली आहे.  गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागण्यासाठी आले होते महाराज दारात उभे होते. त्यांना भिक्षा वाढण्यासाठी वेळ लागला. महाराजांनी याचे कारण विचारले असता मातेने सांगितले की आज नागपंचमी आहे त्यामुळे  पूजा करायची असल्याने वेळ लागला.  त्यावर महाराजांनी आशीर्वाद दिला व जिवंत नागाची पूजा सुरू केली व तेंव्हापासून ही नागपंचमी सुरू आहे.

नागपंचमीच्या एक महिना आधीपासूनच येथे नागपंचमीची तयारी सुरू होते. अंबाबाई मातेच्या मंदिराचे कौल लावल्यानंतर नाग पकडायला सुरवात केली जाते. पकडलेले नाग गडग्यामध्ये ठेवले जातात. नागाला कुठलाही त्रास व इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. नागपंचमी संपल्यानंतर नागाला पुन्हा सुरक्षित रित्या पकडलेल्या ठिकाणी निसर्गात सोडले जाते.

येथील नागपंचमी ही शास्त्रीय पद्धतीने केली जाते. शिराळकर जाणतात की नाग हा दूध पित नाही त्यामुळे नाग दूध पितो अशी कुठलीच अंधश्रद्धा येथे नाही! खास नागराजाला खाण्यासाठी बेडूक पकडले जातात.

शिराळा व पंचक्रोशीत कुठेही जर साप आढळला तर त्याला मारले जात नाही. त्या नागाला पकडून सुरक्षित रित्या सोडले जाते. कित्येकदा विहिरीत पडलेले, जखमी झालेल्या नागांना पकडून त्यांच्यावर उपचार करून निसर्गात सोडले जाते.  असे हे शिराळा व तेथील प्रसिध्द नागपंचमी ही आता कायद्याच्या बंधनात सापडली आहे.  शिराळ्यातील नागरिकांचा आपली ही प्राचीन परंपरा कायदेशीर रित्या पुन्हा सुरू करण्यासाठी लढा सुरू आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel