sonar.manjusha@gmail.com
9767676972

स्वत:ला विसरून मुलांना घडवणारी,  त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई! आईचे व मुलांचे नाते जन्मोजन्मीचे असते.  आपल्याला जीवनातील पहिला धडा आईच शिकवीत असते.  परमेश्वराला एकच वेळी सर्व घरांकडे लक्ष देता येत नव्हते म्हणून त्याने आईला बनवले.  आई हीच आपल्या जीवनाचा पहिला गुरु होय.  तिच्या पंखाखाली आपण लहानाचे मोठे होतो.  चूक झाल्यास आई आपल्याला आपल्या भल्यासाठी शिक्षाही करते.  संतांनी देखील आईच्या मायेचे गोडवे गायले आहेत.  तुकाराम महाराज म्हणतात, "माता गुंतली कामाशी,  चित्त तिचे बाळापाशी! पिलू घेउनी उदरी,  वानर हिंडे झाडावरी!" मातृत्व हीच स्त्रीची मुक्ती असते.  आईच्या अस्तित्वाच्या खुणा प्रत्येक घरात असतात.  प्रत्येक मनात असतात.  घर हे आईच्या कुशीतून जन्म घेते.  अशा घरला गंगेचे पावित्र्य लाभलेले असते.  आईचे प्रेम निस्वार्थी असते,  तिच्यामुळेच जगण्याला अर्थ प्राप्त होतो.  

सर्वात सुंदर नाते आई आणि मुलांचे असते.  आई म्हणजे असे रसायन की जिच्या कुशीत गेल्यावर आपल्या आयुष्याचा जीवनपट खुलतो आणि तिच्या कुशीत गेल्यावर स्वर्गीय सुखाचा ठेवा गवसतो.  आई स्वत:ची दु:खे बाजूला ठेऊन कुटुंबासाठी झिजते.  तिच्यात समर्पण वृत्ती असते म्हणूनच घराचे घरपण टिकते!

"आई म्हणजे मंदिराचा कळस,  अंगणातील पवित्र तुळस,  वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे आई,  वाळवंटातील थंड पाणी म्हणजे आई!"

आमच्या लहानपणीचा तो काळ होता सत्तर आणि ऐंशीचे दशकाचा! माझी आई एक उत्साहाचा खळाळता स्त्रोत होती,  तिला आळस म्हणून काही माहितीच नव्हता.  माझ्या वडिलांची नोकरी खेड्यात.  आम्ही ५ बहिणी.  आमचे सर्वांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाले.  नंतर आम्ही पुढील शिक्षणासाठी मालेगांव येथे भाड्याच्या घरात राहू लागलो आणि नंतर मग घर विकत घेतले.  माझे वडील कामाच्या ठिकाणी राहायचे आणि शनिवार रविवार असे दोन दिवस घरी येत आणि सोमवारी डबा घेऊन जात.  त्यामुळे घराची वा आम्हा मुलींची जबाबदारी आईवर पडली.  भाजी आणण्यापासून ते दवाखाना,  आल्या गेल्यांचा पाहुणचार वगैरे तिलाच करावे लागे.  आजीसुद्धा आमच्याकडे होती.  तिला वेळेवर खायला देणे,  औषध देणे आणि घरातील सर्व कामे हे सर्व आईच करत असे.

सायंकाळी साडेपाच वाजता आम्हा मुलींची शाळा सुटत असे.  त्यानंतर तिला सर्व कामाचे नियोजन करावे लागत असे.  आम्ही मुली घरी येईपर्यंत ती आम्हा मुलींसाठी जेवण आणि घरातली बरीचशी कामे करून ठेवत असे.  त्यानंतर ती आम्हा मुलींचा अभ्यास घ्यायची.  माझ्या आईने काटकसरीने संसार केला,  मग ते आमचे शिक्षण असो वा घरखर्च! प्रत्येक गोष्टीत तिचे उत्तम नियोजन होते.  आम्हा मुलींना तिने शिस्त लावली,  स्वत:ची कामे स्वत: करण्याची सवय लावली तसेच अभ्यासाची गोडी लावली.  आम्हा मुलीना ती शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असो वा स्पर्धा यात भाग घेऊ द्यायची.  सर्वांची तयारी करुण घेण्याचे तसेच प्रोत्साहन देण्याचे काम माझी आई करायची.  आम्हा बहिणींमध्ये मी सर्वात लहान.  मी बी. ए.  ला कॉलेज ला पहिली आली. "यशवंत देव" यांचे तर्फे माझा सत्कार झाला.  खरे तर ही माझ्या आणि तिच्या प्रयत्नांना आणि कष्टांना मिळालेली पावती होती.  घरातील जबाबदाऱ्या निभावणे व त्या उत्तमरीत्या निभावणे या सगळ्यांवर तिने लक्ष दिले.  नातेवाईकांचे लग्न,  कौटुंबिक कार्यक्रम यातला तिचा सहभाग नेहमी उत्साही असायचा आणि आताही वयानुसार आहे.

माझ्या आईला अध्यात्माची प्रचंड आवड! चारीत्रवाचन,  ग्रंथवाचन हे आमच्या घरात नेहेमी व्हायचे.  श्रद्धेमुळे अंगी नम्रता येते असे आई नेहमी सांगते.  तिला पाककलेचीही खूप आवड.  दर रविवारी नवीन पदार्थ असायचा. आम्हा मुलीना तिने विविध लोणचे,  भाज्या,  कोशिंबिरी,  मुरब्बा,  चटण्या,  पापड शिकवले आणि हे पदार्थ आमच्या घरात कायम असतात. आमच्या घरासमोर छोटा बगीचा आहे.  

करियर विषयी निर्णय घेतांना तिने आम्हा मुलींवर कसलेही बंधनं घातली नाहीत.  आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे यासाठी माझी आई व वडील दोघांनी आम्हा सर्वाना सतत पाठींबा दिला. लग्ने होऊन आम्ही आता आमच्या घरी आलो तरी मागे वळून पाहता आईने केलेल्या त्याग आणि आमच्या प्रगतीसाठी तिने केलेली तडजोड आम्ही कधीही विसरू शकत नाही.  आम्हा मुलींचे सणवार,  बाळंतपण अगैरे याच घरात गेले.  आईचे घर! जगण्याचे धडे आईने दिले.  त्याचा फायदा आज होतो आहे.  आजही आई वडील आमच्या सुख: दु:खात धावून येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel