kirand.personal@gmail.com  
7757025122


(भावस्पर्शी व्यक्तिचित्रण या लेखमालिकेतील हा तिसरा भाग)

संध्याकाळ झालेली होती.  थोडासा अंधार पण पडलेला होता.  दुपारी लग्न विधी आटपून आता नवरदेव नवरीच्या स्वागत संमारंभाची जय्यत तयारी सुरू होती.  सगळीकडे धामधूम सुरू होती.  नुकत्याच सजविलेल्या प्रवेशदवारातून नवरदेव आणि नवरीचे आगमन झाले होते.  स्टार्टर,  शितपेय,  चहा आणि कॉफीची रेलचेल चालू होती.  प्रशस्त जागेवर सुरेख ओळीने खुर्च्या मांडल्या होत्या.  काही मंडळी खुर्च्यांवर विसावुन,  आपापल्या गंप्पामध्ये रंगली होती.  सुलंग्न लावण्यासाठी लोक ओळींनी सभामंडपावर आणि खालीही रांगेत उभे होते.  नवरदेवाच्या बाजुने एक आणि नवरीच्या बाजुने एक असे दोन लहान मुली मिळणारा भेटवस्तु लगबगीने घेत होत्या.  वधुवरही सगळ्यांचे हसतमुखानं स्वागत करीत होते आणि पाया पडून भावी जीवनासाठी आशीर्वाद घेत होते.  नवरदेवाचा भाऊ आणि बहीण त्यांच्या परिने आलेल्या पाहुणेमंडळीचे आदरातिथ्य करत होते  सगळ कसं आनंदी आनंद चाललेले होते. नव्हते फक्त नामदेवराव आणि त्यांच्या पत्नी.  आज त्यांच्या सर्वात लहान मुलाचा लग्नसंमारभ चालु होता.  हे सर्व पहात असतांना माझ्या डोळ्यांच्या कडा मधुन,  मधुन ओलसर होत होत्या आणि उरही भरून येत होते.  हा लग्नसोहंळा पाहण्यासाठी नामदेवराव आणि त्यांच्या पत्नी असायला हव्या होत्या.  मुलं सर्वकाही रितसर पार पाडीत होती.  नामदेवरावांच्या मुलीशी बोलतांना असे कळले की आईनी जाण्यापुर्वी मुलांना सांगीतले होते की आमच्या नंतर डोळ्यात पाणी आणुन रडायचे नाही,  कायम आनंदी राहायचे.  असे सांगत असतांना तिच्या चेहरांवरील संमिश्र भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत.  मोठ्या हिंमतीने आपल्या भावंनावंर नियत्रंण ठेऊन हसतमुखानं सर्व समारंभात ती मुलं कार्यरत होती.  त्या मुलांकडे बघुन मीसुद्धा माझ्या भावंनावर आवर घालण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होतो.  

माझी नजर सहजच आकाशात असणारा दोन विशिष्ट तारकांकडे गेली.  ते फक्त दोनच तारे एकाच ठिकाणी लुकलुकत होते.  मला खात्री झाली की हे दोन तारे म्हणजेच नामदेवराव आणि त्यांच्या पत्नी आहेत.  जे आकाशातुंन आपल्या लाडक्या मुलाच्या आणि सुनेच्या अंगावर पुष्षवृष्टी करून आशीर्वाद देत होते.  त्या ताऱ्यांकडे पहात असतांना माझी नजर शुन्यात गेली आणि मी अचानक माझ्या लहानपणात,  माझ्याच नकळत जाऊन पोहचलो.

माझ्या लहानपणी माझ्या आजोळी. नामदेवमामा म्हंटले की आम्हाला धडकी भरायची.  नामदेवमामा हे एक धाक दाखवण्याचे मानवी यंत्र होते.  शाळेत जायचे नाही म्हंटले की नामदेवला बोलवू का ? असे म्हणायची देर की आम्ही मुकाट शाळेत जायला तयार.  आमच्या कुठल्याही बालहट्टांचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे नामदेव मामा.  त्यांच्याबद्दल भिती वाटण्याचे कारण ही तसेच होते,  ते चालता बोलता आमच्या सर्व लहानांच्या सतत खोड्या काढत असत.  कधी कोणाला तुला ससा दाखवतो म्हणुन दोन्ही कान उपटून,  कानांच्याच आधारावर उचलून घेणे.  ससा दिसणे तर दुरच पण कान प्रंचड दुखायचे.  कोणाला चिमटे काढणे.  एखादा आपला ऐटीत चालत जात असेल,  तर हळुच त्यांच्या डोक्यावर टपली मारणे आणि सर्वांत भयानक धमकी म्हणजे शाळेत गेला नाही तर लिबांच्या झाडाला उलटा टागूंन ठेवेल.  या सर्वच प्रकारामुळे आम्हाला त्यावेळेस त्यांची प्रचंड भिती वाटायची आणि या सर्वांचाच गैरफायदा आमची पालक मंडळी त्याकाळी घेत असत.  याचा अर्थ असा नाही की नामदेवमामा खुप क्रुर होते.  त्यांचे आमच्या सर्वांवर प्रेमही तेवढेच होते.   त्याकाळी दहा,  वीस पैसेही खुप होते.  ते आमच्यासाठी संत्र्याच्या गोळ्या,  अस्मंताराच्या गोळ्या आणत असत.  अगदीच काही नसेल तर आमच्या हातावर दहा,  वीस  पैसे ठेऊन तर कधी,  कधी एक रुपया ठेऊन दुकानात गोळ्या आणायला पिटाळत असत.  आमच्या आजोळी संयुक्त कुटुंब पध्द्ती होती.  अगदी गोकुळ होते.  माझी आजी कृष्णाची भक्ती करायची.  तिच्या तोंडी सतत गोपाल कृष्ण,  राधे कृष्ण असा जप चाललेला असायचा.  आम्ही आठ,  दहा असे बालगोपाल त्या एका मोठया वाड्यात गोकुळासारखे खेळत असायचो.  आमचा वाडा अगदी प्रशस्त होता.  दोन्ही बाजुच्या मुख्य रस्त्यावर,  वाड्याची प्रवेशव्दार उघडायची.  भव्य आणि सुदंर अश्या वाड्यात आमचे बालपण गेले.

आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या माहितीनुसार,  आम्हाला नामदेवरांवाचे बालपण आणि संघर्ष याविषयीची माहिती मिळाली.  नामदेवरावांची कौटुंबिक परिस्थीती फार बिकट होती.  नामदेवराव दोन वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.  आई दोन,  तीन घरांची धुणी भांडी करून आपला व लहान नामदेवाचा उदरनिर्वाह करीत असे.  नामदेवाच्या आईचा तिच्या मुलावर प्रंचड जीव होता आणि नसेलही कसा म्हणा,  तिचा नामदेवच तिच अवघ विश्व होता.  नामदेवाच्या आईने नामदेव जेवल्याशिवाय कधी अन्नग्रहण केले नाही आणि हा नियम त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासांपर्यंत पाळला.

लहान नामदेव आपल्या आईसोबत,  आईच्या कामासाठी घरोघंरी फिरत असे.  आई काम करत असतांना आईच्या नजरेसमोरच नामदेव खेळत असे.  थोडा जरी आईच्या नजरेआड झाला तर आई अस्वस्थ होऊन जायची,  असेच एकेकांकडचे काम आटपून आई,  नामदेव सोबत आमच्या आजींच्या घरी यायची.  आमच्या आजीशी नामदेवांच्या आईची मस्त गट्टी जमायची.  हसत खेळत,  गप्पा टप्पा करत,  त्या आमच्या आजीला विनामूल्य मदत करायच्या.  नामदेवसुद्धा आमच्या आजीच्या घरी येण्यास खुप उत्सुक असायचा.  कारण त्याच्या वयोगटातील माझे मामा,  आई,  मावशी यांच्याशी त्याला खेळता यायचे म्हणुन.  नामदेवाला आमच्या वाड्यात खेळायला खुप आनंद वाटायचा.  नामदेव आणि त्याच्या आईला माझ्या आजोबा,  आजीबद्दल फार प्रेम आणि आदर वाटायचा.  माझे आजोबा शिक्षक असल्याने नामदेवाच्या शिक्षंणाबद्दल,  भविष्याबद्दल त्या नेहमीच त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायच्या.  माझ्या आजोबांना सर्व अण्णा म्हणायचे.  त्यांचा अण्णांवर ऐवढा विश्वास होता की, "अण्णा म्हनंतीन तस,  आपल्याले काय समजते त्यातले"  असे व-हाडी पध्दतीने बोलुन त्यांचा अण्णांवरील असलेला विश्वास व्यक्त करीत असत.  अण्णांनी नामदेवावर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम केले.  शैक्षणीक मार्गदर्शंनासोबतच वेळप्रंसंगी आपल्या मुलांसोबत नामदेवलासुद्धा कपडेलत्ते,  वह्यापुस्तके आणि अडीअडचणीला शाळेची फी भरणे असे चाललेले असायचे.  

नामदेवलासुद्धा अण्णांच्या प्रेमाची जाणीव होती.  ते त्यांना पितासमानच मानत आणि सन्मान देत असत.   अण्णांनीसुद्धा नामदेवाला आपला मानसपुत्र मानले होते.  अण्णांकडे कुठलाही सुखांचा,  दु:खांचा प्रंसग असो अण्णांचे नामदेवाशिवाय पान हलायचे नाही.  असेच दिवसां मागून दिवस गेलेत.  नामदेव शिक्षणात प्रगती करीत होता.  दहावी,  बारावी सुद्धा यशस्वीरित्या पुर्ण केली आणि त्या काळातील अतिशय लोकप्रिय असलेला कोर्स आयटीआय च्या ईलेक्ट्रीकल शाखेत नामदेवनी प्रवेश मिळवला होता.  नियोजित कालावधीत त्यानी तो कोर्स अतिशय मेहनतीने पुर्ण केला.  उच्च शिक्षण घेण्याची क्षमता असतांना सुद्धा प्राप्त परिस्थितीचे भान राखून आणि आपल्या आईला तिच्या रोजच्या कष्टातुन मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी लवकरात,  लवकर रोजगार मिळवुन,  आपल्या परिस्थितीची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.  नियतीनीसुद्धा त्यांना चांगली साथ दिली,  लवकरच नामदेवनी राज्य सरकारची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची नोकरी मिळवली.  नामदेव आणि आईच्या कष्टांना फळ मिळालं.  आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.  आईला जणू आभाळच ठेगंणे झाले होते.  नामदेवाला आता माझ्या आईचे कष्ट संपणार याचाच खुप आनंद झाला होता.  दोघेही मायलेकांनी हा आनंद अण्णांच्या परिवारासोबत साजरा केला.  नामदेवानी सर्वप्रथम आपल्या आईचे काम बंद केले आणि आईच्या आशिर्वादाने आपल्या नविन नोकरीला सुरूवात केली.

एकेका दिवसागणिक,  नामदेवाची घराची आणि आर्थिक परिस्थिती सुधारत गेली.  नामदेवाची संतोषी मातेवर खुप श्रध्दा होती.  नदीच्या काठावर त्याच्या एका स्नेहींचें घर होते.  त्यांच्या घरातच संतोषी मातेचे मंदिर होते आणि तिथे संतोषी मातेची भव्य मुर्ती होती.  नामदेवाचा गावाला जाण्या,  येण्याचा  तोच रस्ता होता.  नामदेवाचा एक अलिखीत नियम होता.  ते गावांहुन घरी येतांना आणि गावांला जातांना न चुकता संतोषी मातेचे दर्शन घेत असत.  मी सुद्धा लहान असंताना बरेचदा त्यांच्यासोबत जात असे.  संतोषी मातेसोबंतच नामदेवांची महालक्ष्मी या संणावरती खूपश्रध्दा आणि भक्ती होती.  पुर्वी परिस्थिती नसतांना सुद्धा राशीवरती का होईंना पण महालक्ष्मीचे मुख ठेऊन आहे त्या परिस्थितीत ते महालक्ष्मीचा तीन दिवसांचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करायचे.

सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यानंतर नामदेवाच्या आईच्या मनात आता नामदेवाच्या लग्नाचे विचार घोळू लागले.  आईनी हा विचार माझ्या आजीला बोलुन दाखविला आणि संधी मिळताच अण्णांच्या कानावर या विषयी बोलण्याची विनंती केली.  माझ्या आजीला सुद्धा आनंदच झाला,  शेवटी अण्णांचा मानसपुत्रच होता. आजीनीसुद्धा संधी साधुन अण्णांच्या कानांवर ही गोष्ट घातली.  मग काय लगेचच नामदेवासाठी वधुसंशोधनाची प्रकिया सुरू झाली.  नामदेव राज्य सरकारी कर्मचारी असल्याने आणि एकुलते एक असल्याने त्यांना स्थळांची कमी नव्हती.  

आमचे नामदेव मामा दिसायला अगदी देखणे होते.  सुदृढ,  गोरेपान. अगदी  ऋषी कपूर या नायकाप्रमाणेच म्हणां ना!  मग या ऋषी कपूर मामासाठी वधूसुद्धा एखाद्या हिरोईन सारखीच लागणार ना! दैव योगाने लवकरच आम्हाला मामांसाठी एक सुयोग्य वधु मिळाली.  ती पण ऐतिहासीक शहर असलेल्या ब-हाणंपुरात.  त्यांचे नाव मंगला होते.  मामी दिसायला खुपच सुंदर होत्या.  त्यांचे डोळे खुपच बोलके आणि निळसर होते.  त्या दिसायला बराच प्रमाणात जुन्या काळातील मंदाकिनी प्रमाणे दिसायच्या.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या सौदर्यांपेक्षा त्यांच्या मनाचे सौदर्य हे विशाल असे होते.  तसे पाहिले तर नामदेवाचे लग्न हे रितसर  वधुसंशोधन करून,  स्थळ निवडून आणि चहा पोह्यांच्या पारंपारिक पध्दतीने झाले होते.  पंरतु त्या दोघांमधिल प्रेम आणि आपुलकी बघता,  कोणीही त्यांना सहजच तुमचा प्रेमविवाह झाला आहे का हो ? असे पटकन विचारून जात असत.

नामदेवाचे लग्न ठरले तेव्हा त्यांची नेमणुक कु-हा काकोडा या गावी झाली होती.  ते आपल्या आईसह तिथे स्थलांतरीत झाले होते.  त्यांना एक छान टुमदार असे सरकारी घर मिळाले होते.  एम.  ए.  सि.  बी.  मध्ये कार्यरत असल्याने सब स्टेशनला लागूनच त्यांचे कर्मचारी निवास स्थान होते.  सबस्टेशन नविनच सुरू झाले असल्याने,  नविनच बांधकाम आणि रंगरंगोटी झालेली होती.  त्या सरकारी कॉलनीत तारेचे कुंपण होते.  त्या कुंपणात सबस्टेशन आणि चारच कर्मचारी व त्यांचा परिवार राहील अशी दोन मजली इमारत होती.  मी त्या वेळेस फार लहान होतो.  मामांचे हे घर म्हणजे आमच्यासाठी राजाचा राजवाडाच होता.  तारेच्या कुंपणाच्या आत वाटेल तसे खेळायचे.  सबस्टेशनला जाऊन ते रंगबिरंगी गोल लाईट पाहायचे.  मोठ मोठे,  एका ओळीने लावलेले कपाट पहात राहायचे.  तेथुन येणारे चित्र विचत्र आवाज ऐकत बसायचे.  त्या जुन्या काळ्याकुट्ट दुरध्वनीचा रिसीवर कानाला लाऊन मनात येईल ते नंबर फिरवत बसायचे.  मामा आमच्यावर लक्ष ठेऊन असायचे.  पंरतु त्यांनी आम्हाला कधीही याला हात लाऊ नको,  त्याला हात लाऊ नको असे सांगितले नाही.  या उलट ते आमच्यात आमच्यातलेच लहान होऊन खेळायचे.  एखाद्या  सणांला भजे,  वडे बनत असले तर ते बनत असतांना गुपचुप आमच्यापर्यंत पोहचवण्यात त्यांचे कौशल्य होते.  माझे अजुन एक मामा एस टी महामंडाळात चालक या पदावर होते.  ते नेहमी नांदुरा - कु-हा - काकोडा बस घेऊन जायचे.  जेव्हा मला शाळेला सुटी लागायची,  तेव्हा मामा मला गाडीत टिकीट काढुन,  केबिनमध्ये बसवायचे.  नामदेवमामा सबस्टेशनच्या थांब्यावरील ठिकाणी उपस्थित असायचे आणि मला बस मधुन उतरवुन घरी घेऊन जायचे.  दोन,  चार दिवस राहुन माझे मन भरले की पुन्हा त्याच पध्दतीने मी परत गावी यायचो.  मी माझ्याच बालपणात रंगलो. असो.  

तर मामाचे लग्न ठरले आम्ही सर्व पर्वीच्या काळी लग्नप्रवासासाठी वापरण्यात येणारा मॅटेडोअरनी ब-हाणपूरला लग्नांसाठी गेलो.  मला चागंले आठवते की त्यांचे लग्न ज्या वर्षी झाले,  त्याच वर्षी ॠषी कपूरचा 'प्रेमरोग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो गाजलाही होता.  त्या चित्रपटाची गाणीसुद्धा अप्रतिम होती.  मामाच्या लग्नात बँडवरही तीच गाणी वाजली होती.  लग्न थाटामाटात पार पडले होते.  आम्ही वरातीसह परत आलो होतो.  मामाचे दोनांचे चार हात झाले होते.  नविन नवरीसह मामाचे वैवाहिक जीवन सुरू झाले होते.  नविन मामी आमची खुप काळजी घ्यायची आणि आम्हाला हवे नको त्या सर्व गोष्टींची जातीनी लक्ष द्यायची,  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा लहान असुनही आम्हाला अहो,  काहो असे म्हणुन आवाज देत असे.  लहानपणात मिळणारा या मानामुळे आम्ही खुप सुखावुन जायचो आणि हा मान आम्हाला कायम मिळाला  म्हणुनच त्या आमच्या लाडक्या मामी झाल्यात.  मामी खुप चांगल्या स्वभावाच्या होत्या.  नामदेव आणि त्यांच्या आई मध्ये असलेल्या प्रेमाचा त्यांनी प्रवेशव्दारांवरील माप ओलंडताच अदांज घेतलेला होता.  नामदेवानीसुद्धा आपल्या नववधुला आपल्या आईच्या कष्टांची आणि जीवनातील तिच्या त्यागाची कल्पना दिली होती.  मामींनीसुद्धा या गोष्टी समजुतदार पणाने समजावुन घेतल्या होत्या.  मामींच्या आगमनानंतर बराच जणांनी असा अंदाज बांधला होता की मायलेकांच्या प्रेमात आता नविन सुनेमुळे नक्कीच अंतर पडणार.  पण लोकांचा अंदाज मामींनी साफ खोटा ठरविला होता आणि याउलट मायलेकांच्या प्रेमाला मामींचाच जास्त आधार मिळाला होता.  मामींना सासूबाईंनी घेतलेल्या कष्टांची पुर्ण जाणिव होती आणि या सर्व गोष्टींची जाणिव त्यांनी सासूबाईंच्या शेवटच्या क्षणांपर्यंत ठेवली.  मी आजपर्यंत अशी एकही सुन नाही बघितली जी सासूंची ऐवढी जिवापाड सेवा करते आणि काळजी घेते.  काही काही स्त्रियांना घडवतांना देव असा काही घडवतो की राग,  लोभ,  ईर्ष्या,  मत्सर,  आणि संताप या दुर्ग॔णाचा लवलेशही त्यांच्या व्यक्तीमत्वात शोधुन सापडत नाही.  अशा व्यक्ति खरोखरच फार दुर्मिळ असतात आणि आमच्या मामीही त्यापैकी एक होत्या.

नामदेवरावांचा संसार छान सुरू झाला होता.  त्यांच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले होते.  संतोषी मातेचे भक्त असल्याने,  पहिल्या बाळाचे नाव संतोष ठेवण्यात आले.  मामांकडे आता मामांचे बाळ आल्याने,  आमच्या प्रेमात वाटा पडुन मामांचे आमच्यावरील प्रेम कमी होईल की काय ? अशी आम्हाला भिती वाटायची,  पंरतु प्रेम कमी होण्याऐवजी,  त्यात वाढच झाल्यांचे आम्हाला जाणवले.  संतोषच्या पाठीवर पुनम आणि पुनमच्या पाठीवर सुरज,  असे आणखी दोन अपत्य मामांच्या कुंटुंबात जन्माला आलीत.  मामा मामींने आपल्या परीने सर्व मुलांना चांगले आणि सारखेच संस्कार देण्याचा शेवट पर्यंत प्रयत्न केला.  नामदेवच्या आईचे पण आपल्या नातवांवर प्रचंड प्रेम होते.  मुलंही आपल्या आईवडीलांने दिलेल्या संस्कारांप्रमाणे आजीचा,  आई वडीलांचा,  येणारा-जाणारांचा मान सन्मान ठेवत असतं.  कालांतराने आम्हीही मोठे झालो होतो.  मामांनी आम्हांला स्वतःच्या मुलांइतकेच प्रेम दिले होते.  आता ते आमच्याशी एका सच्चा मित्रांप्रमाणेच वागत असत.  आता त्यांनी आपल्या गावांकडील मातीच्या घराचे बाधंकाम करून घेतले होते.  सरकारी नियमांनुसार त्यांची बदली कु-हा या गावांहुन बोदवड या गावी झाली होती.  आता घरात महालक्ष्मींचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला.  धर्मशास्त्राप्रमाणे पूजा विधी करून,  आप्तस्वकीय,  गावांतील पाच पन्नास लोकांना जेऊ घालुन,  गौरीपुजनांचा हा उत्सव अखंडपणे चालु होता.  सर्वजण या उत्सवात सहभागी होऊन महालक्ष्मींचा आशीर्वाद घेऊन,  तृप्त होऊन जात असत.  

नामदेवरावांची मुले मोठी झाली संतोषला इंजिनियर बनवण्यांचा त्यांचा मानस होता.  संतोषही चांगल्याप्रकारे प्रगती करत होता.  पुनम शिक्षणांसोबत तिची आवड असलेल्या नृत्य कलेचे धडे घेत होती.  लवकरच तिला मराठी दुरदर्शनच्या दे दमा दम या नृत्याच्या कार्यक्रमात तिला नृत्य करण्यासाठी तिची निवड झाली.  नामदेवमामा आणि मांमीना खुप आंनद झाला.  ते दोघेही मुलीसह मुंबईला जाऊन नृत्याचे चित्रकरण करून आले.  मामांनी आम्हाला सर्वांना कळविले.  त्यांनी कार्यक्रम प्रक्षेपित होण्याची तारीख आणि वेळ आम्हाला सांगितली आणि कार्यक्रम पहाण्यासाठीची आग्रही विनंतीसुद्धा केली.  आम्हीसुद्धा आमच्या शेजारांसह हा कार्यक्रम कौतुकांने पाहिला.  मामांना कार्यक्रम झाल्यावर  फोन करून नृत्य आवडल्याचे आवर्जुन सांगितले.  छोटा सुरज ही अभ्यासात खुप हुशार होता आणि घरात सर्वात लहान असल्यांने सर्वांचा लाडका होता.  त्यांच्या लहानपणीची एक आठवण मला येथे सांगाविशी वाटते ती अशी की पुर्वी आलेल्या 'राम लखन' या चित्रपटातील लखन या पात्रामुळे सुरज फारच प्रभावित झाला होता,  इतका की त्याने आपले नावच लखन ठेऊन घेतले होते.  कोणीही त्याचे नाव विचारले की तो त्याचे नाव लखनच सांगायचा.  नामदेरावांकडे सगळा आनंदी आनंद होता.  सगळे कसे मस्तच चालेले होते.

आता मुले मोठी झाली होती.  मोठ्या मुलांनी आपले शिक्षण पुर्ण करून नाशिकला नोकरीसाठी प्रस्थान केले होते.  पुनमसांठी वरसंशोधन सुरू झाले होते.  प्रत्येक सामान्य माणसांप्रमाणे नामदेवरावांसुद्धा आपल्या जबाबदारीची जाणिव होती.  आपली मुलं शिक्षण करून व्यवस्थित मार्गी लागावी.  त्यांची लग्न कार्य सामाजीक चाली रितीने,  सर्वसामांन्याप्रमाणे व्हावी.  आपण उभा केलेला हा संसाराचा डोलारा,  सणवार आणि जोडलेली माणसे,  नातेसंबंध पुढच्या पिढीनेसुद्धा योग्य पध्दतीने पुढे चालवावी.  आपला मान-अभिमान आणि सामाजीक प्रतिष्ठा मुलांनी सुद्धा आपल्या प्रमाणेच जपावी.  अशी सामान्य अपेक्षा त्यांना होती.  आयुष्यभर कष्ट करून मिळवलेल्या पैश्या-अडक्यातुन तिन्ही मुलांची लग्नकार्य,  सणवार आटपून त्यांची घडी बसवावी.  उरलेल्या रक्कमेतुन आपल्या वृध्दावस्थेची तजविज करावी.  अशी त्यांची योजना होती.  पण असे म्हणतात की दैव जाणिले कोणी? नियतीचा डाव हा भल्या भल्यांना कळला नाही.  मनुष्य ठरवितो काय आणि घडते भलतेच.  असो.

नामदेवरावांच्या आई आता थकत चालल्या होत्या.  आईना उठुन बसणे,  चालणे दिवसं दिवस कठीण होत होते.  आईची सप्तश्रृंगीच्या गडावर जाण्याची खुपच इच्छा होती.  नामदेवानी लगेच ती इच्छा पुर्णं करण्याचे ठरविले आणि एक खाजगी वाहन करून गडावर दाखल झालेत.  आईवरील प्रेम अजुनही तसेच होते.  आईला स्वतः खांद्यावर घेऊन,  संपुर्ण सप्तश्रृंगीचा गड चढुन जाणारे नामदेवरांव हे आजच्या काळातील श्रावण बाळच! पुर्ण गड चढुन गेल्यांवर मायलेकांच्या चेहरांवरील आनंदाचे वर्णन शब्दात करणे अशक्यच.  वाचकांच्या माहितीसाठी त्यांच्या आईने वयांचे ऐंशी वर्ष पुर्ण केलेले होते  आणि कष्टांने किरकोळ झालेली शरीरयष्टी होती.  पंरतु त्या मागची मुलांची,  मातृप्रेमाची भांवना माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे.  त्यातच गर्दीमध्ये आई रस्ता चकून गेल्यांवर शोधतांना नामदेवरावांचा जीव अगदी कासावीस होऊन गेला.  चेहरांवर अगदी लहान मुलाचा आईकडून हात सुटल्यावर जे भाव असतात,  अगदी तेच भाव नामदेवरावांच्या चेहरांवर त्यांच्याकडून आईचा हात सुटल्यावर उमटले होते.  सुदेवाने आई लवकरच सापडल्यात.  हा एक भाग वगळता तिर्थयात्रा व्यवस्थीत पार पडली होती.  आता मात्र आई खुप थकली होती.  आईनी केलेल्या कष्टांचे चिज झाले होते.  श्रावण बाळासारखा मुलगा,  त्याचा बहरलेला संसार,  सर्वकाही मनासारखे.  वृध्दाअव्यवस्थेत याहुन अधिक काय हवे असते.  मुल संस्कारी असणं हे आई वडीलांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे असते हे या मायलेकांच्या आयुष्यावरून जाणवते.  मुल चांगले निघाले तर आई वडीलांच्या आयुष्याचे सोने नाहीतर मातीच.

आईची खुप सेवा केली, खुप सुख दिले आणि आईसुद्धा खुप समाधानी होती. वार्धक्याने आलेल्या सुरकुत्यावंरील  चेहरांवरसुद्धा समाधानाचे आणि आनंदाचे तेज आईच्या चेहरांवर,  अनंतात विलीन होण्यापुर्वीसुद्धा झळाळत होते.  आईचा मृत्यु नैसर्गिक पध्दतीने झाला.  अत्यंत दुःख अतंकरणाने नामदेवरावांनी आपल्या आईला शेवटचा निरोप दिला होता.  जन्मापासुन असलेली साथ. आणि जगात कोणत्याही आईने आपल्या मुलाला इतके भरभरून प्रेम दिले नसेल,  अशा आईचा आशीर्वाद आणि सोबतीशिवाय त्यांना जगणे बरेच दिवस जड गेले.  धन्य ती माता आणि धन्य तो तिचा पुत्र.  

नामदेवरांव आपल्या पुढील प्राप्त जबाबदारा पार पाडण्यासाठी सज्ज झाले होते.  पुनमच्या वरसंशोधनाच्या प्रयत्नांना फळ आले होते.  एक सुयोग्य स्थळ त्यांनी आपल्या मुंलीसाठी पसंत केले होते.  मुलीची पसंती विचारात घेऊन धुमधडाक्यात लग्नाचा बार नामदेवरावांनी उडवून दिला होता.  खंत होती ती फक्त आपली आई मुलीच्या लग्नात नसल्याची,  बाकी सर्व आनंदात पार पडले होते.  मुलगी आपल्या संसाराला लागली होती.  नामदेवरांवपण कन्यादानांच्या जबाबदारीतुन मुक्त झाल्याने आनंदीत झाले होते.

आयुष्य पुन्हा एकदा नित्यनियमांने सुरू झाले होते.  विनाकारणच्या एक,  दोन कोर्टाच्या केसेस नामदेवरावांच्या मागे लागल्या होत्या.  मनाने गोड असणारा नामदेवरावांन्हवर मधुमेहसुद्धा त्यांच्या प्रेमात पडला होता आणि त्यांना साथ देण्यास प्रारंभ केला होता.  घरातील वातावरणही थोडे अस्थिर झालेले होते.  दोन पिढ्यातील संघर्ष तोंड वर काढू लागला होता.  वैचारिक मतभेद,  अपेक्षांचे ओझे,  भुरळ पाडणारी आधुनिक शैली,  ही नामदेवराव उभयांतानांच्या पचनी पडत नव्हती.  इतरांची घडी बसवणांरा नामदेवरावांना आपलीच घडी बसवंणे कष्टदायक होत होते.  मनाने कोमल असणारा या माणसांचा तटस्थ असणांचा आव तरी किती दिवस आणता येणार होता.  काही गोष्टी मनाविरूद्ध घडत गेल्या.  परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येत होते.  मला त्यांचे वरचे वर फोन येत असत.  मी मधस्थी करावी अशी त्यांची इच्छा होती.  पंरतु जिथे ते स्वतः एवढे अनुभवी असतांना कमी पडलेत,  तिथे माझ्यासारख्यांचे काय कौशल्य पणाला लागणार होते आणि एकदा सुटलेला बाण परत कधीच येत नाही ही वास्तविकता त्यांनी स्विकारली होती.  माणसांना देवाने देताना सुखदुःखासह कमी जास्त प्रमाणात भोगही दिलेले असतात आणि ते येथेच भोगावे लागतात,  तसे त्यांच्याही वाट्याला आले आणि ते त्यांनी आनंदाने स्विकारले आणि मोठ्या मनाने आणि समजुतदारीने आपल्या बाजुने या संघर्षावंर पडदा टाकुन नविन पिढीशी जळवून घेऊन,  पुढील वाटचालीस सुरूवात केली होती.

असे म्हणतात की देवही अशाच व्यक्तिंची परिक्षा घेत असतो.  ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आणि क्षमता असते.  नामदेवरांवाच्या बाबतीत तसेच घडले.  एका मागोमाग एक अशा,  सारख्या परिक्षा देव घेत राहिला आणि नामदेवराव त्या परिक्षा  यशस्वीपणे देत राहीले.  परतु देवानी अजुन एक कठिण परिक्षा त्यांच्यासमोर ठेवली. त्यांच्या पत्नीला एका दुर्दैवी आजारांने ग्रासले.  नामदेवरावांसाठी हा खुप मोठा मानसिक धक्का होता.  त्यातूनही त्यांनी आणि त्यांच्या परिवांराने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि पैसा खर्च करून त्यांना त्या आजारांतुन मुक्त करण्याचा प्रयत्न केला.  आता मांमीच्या प्रकृतीमध्ये अपेक्षीत सुधारणा झाली होती,  प्रकृती स्थिरस्थावर झाली.  पण नामदेवरावांना सतत आपल्या पत्नीच्या प्रकृतीबाबत काळजी असायची.  या सर्व परिस्थितीचा त्यांच्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम झाल्यांचे मला आमच्या एका भेटीत जाणवले होते.  आमची एका रेल्वे स्थानकांवर अनपेक्षीत भेट झाली होती आणि खर तर तीच आमची शेवटची भेट ठरली.  

त्याकाळात आमचे फोनवरून बोलणे चालु असायचे.  मी त्यांना माझ्याकडे येण्याचा सारखा आग्रह करायचो.  पंरतु मला माझ्या आयुष्यात,  इतक भरभरून प्रेम देणाऱ्या या मामांनी त्यांची परतफेड करण्याची एकही संधी मला दिली नाही.  माझ्या आयुष्यात एका मित्राची,  एका आधाराची आणि एका मार्गदर्शकाची मोठी अशी पोकळी निर्माण करून हा माणुस अनपेक्षितपणे,  माझ्यासह अनेकांना एक मोठा धक्का देऊन,  जग सोडून गेला.  त्यांच्या मुलांकडून कळले की निवृतीसाठी पंधरा दिवस बाकी असंताना,  आपली नोकरी करत असतांना कार्यलयातच त्यांना मृत्यूने गाठले होते.  मामी तर नामदेवरांवाशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हत्या,  परंतु त्यांच्या पश्चात अपुर्ण असलेल्या त्यांच्या जबाबदा-रां  पार पाडण्यासाठी त्यांनी हिंमत बांधली. लहान मुलांसाठी योग्य मुलगी पाहुन ठेवली आणि लवकरच साखरपुडा करण्याचा मामींचा मानस होता.  मामाशिवाय या जबाबदारां पार पाडणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते,  तरीही उसने अवसान आणून कर्तव्यपुर्ती करत होत्या.  त्यांच्या आजाराने त्यांचेवर संपूर्णपणे ताबा मिळवला होता.  एकीकडे आजाराशी लढा देत,  तर दुसरीकडे एकेक  जबाबदारी पार पाडणे चालु होते.  माझ्या एका भेटीत त्यांनी मला सांगीतले.  माझ्या जीवनांत आता राम उरला नाही.  ते (नामदेवराव) माझी वाट पहात आहेत.  मला लवकर गेलेच पाहिजे.  हे ऐकतांना माझे डोळे पाण्याने डबडबलेले असायचे.  देवानी त्यांची ही इच्छा लवकरच पुर्ण केली आणि जास्त नाही तर फक्त दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचे निधन झाले.  त्या वेळेस त्या आपल्या मुलांसोबत येवला येथे  शेवटचे काही उरलेले दिवस घालवत होत्या.  मामांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले अशा त्या बोदवड गावातच आणि त्याच ठिकाणी माझे अंत्यसंस्कार व्हावे ही त्यांची अखेरची इच्छा मुलांनी पुर्ण केली आणि नियतीने फोडलेली ही जोडी स्वर्गातसुद्धा पुन्हा एकत्र झाली.  त्यांचे एकमेकांवरील असलेल्या प्रेमाची तुलना या जगात कुठल्याही प्रेमांशी होऊच शकत नाही.  मला एक प्रश्न सतत पडत असतो.  देव जगातील चांगली माणसे आपल्याजवळ लवकर का बोलावून घेत असतो ?उत्तरही तसेच आहे. जो आवडतो सर्वांना,  तोची आवडे देवाला!!    

अचानक वाजणाऱ्या या गाण्याच्या ध्वनीने मी भानावर आलो आणि नामदेवरांच्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देऊन मणामणांचे ओझे घेऊन मी माझ्या गावाला परत निघालो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel