anjanakarnik@gmail.com

मी का  लिहते? असा प्रश्न मी कधीकधी स्वत:लाच विचारते!
उत्तर शोधायला गेले की नवे वाटत स्वता:शीच संवााद   साधायला मी लिहते वा दुसऱ्यापर्यत पोचताच येत संवादातून!
संवाद  साधूनही समोर योग्य  तो परिणाम होत नाही म्हणून  निरुपायाने अधिक जणांपर्यत पोचण्यासाठी लेखणी हातात घेते?
कधी कधी आपल्या मनातलं  दुसऱ्या  कोणाला सांगावं, तोंडची वाफ दवडावी तर समोरच्यानी ते ऐकावं अस घडतही नाही!
मी तेंव्हा मात्र नक्कीच लिहते जेंव्हा मी अस्वस्थ असते पार आतून!

सभोवतालच्या  चक्रावून टाकणाऱ्या हिंसेमूळे,  दंगलीं,  जाळपोळ,  खून मारामाऱ्या अशा  भेसूर घटनांमुळे.  दुबळ्यांवर  घडणाऱ्या अन्यायामूळे मी फार चिंतेत पडते.  हतबल वाटत मला.

अजाण पोरींवरच्या राक्षसी अत्याचारानी मी घुसमटते.  अशा वेळी काही कृती जर मी करु शकत नसेन तर माझ्या लेखणीलाच धार लावते मी.
मन विचारांनी,  भावनांनी भरभरून वाहू  लागल की लिहते! मना शून्यता दाटली की लिहते.  

शाळेत शिकवत असताना नोकरीची तीस बत्तीस वर्ष प्रत्येक विद्यार्थी मला टोचत असे! 'माझ्यावर लिही' अस मला डोळ्यातून विनवत असे.  कधी कोणाची लेक  ऐन दहावीच्या वर्षात परिक्षा न देताच बोहल्यावर ढकलली जाण्याच्या संकटात पडे.  तिला त्यातून सोडवण्याचं अवघड काम करताना आम्ही सहकार्‍यांनी  केलेला झगडा,  संघर्ष, मिळालेल यश वा अपयश मला शब्दबद्ध करायला भाग पाडायच! कधी सुशिक्षीत कुटूंबातील गृहिणी शेजारच्या घरात मार खाताना गुरासारखी ओरडायची,  तिची सुटका केली,  तिला घरात आश्रय दिला,  तिचं दु:ख हलकं करायचा प्रयत्न केला तरी मनात प्रचंड खळबळ भरुन राहायची.  

मग अशा वेळी तिचच मन माझ्या लेखणीतून झरायच.  कोणा गरीब विद्यार्थीनीस  जट राखून जोगतीण बनवण्याचा घाट पालकच करायचे! तिची सुटका झाली तरी माझ्या रात्री झोपेविना! ती पोर यायची आपली कैफियत घेऊन माझ्या लेखणीकडे!
माझे कथासंग्रह 'प्रकाशवाट' आणि 'ज्याचा त्याचा संघर्ष' अशा अनेक जीवनाच व्याकुळ करणार चित्रण आहे. आणि ते वाचणाऱ्याला विचार व कृती करायला ऊद्युक्त करेल एवढ नक्की!

कुचंबणा, अन्याय,  भ्रष्टाचार एक ना अनेक कारणांनी  जशी अस्वस्थ होऊन मी लिहते तशी या जगात जे  सत्यम शिवम  सुंदरम  आहे ते मला कागदावर शब्दबद्ध करावस वाटत.  जगवणारा पाऊस,  रंगीबेरंगी निसर्ग,  स्वर्णरंगी सुर्योदय, रंगगंधाची ऊधळण करणारे श्रावण आणि  वसंत तर माझ्या कवितेत वारंवार डोकावतातच. पण जाळणारा ग्रीष्म,  गोठवणारा,  निसर्गाला ऊजाड करणारा शिशिर,  भयाण वैशाख हे ही खुणावतात. कष्टकरी भूकेलाच राहतो, बहूमजली घरं बांधणारे मजूर बेघरच राहतात! भूमीची सेवा करणारा बळीराजा कर्जबाजारी होतो. कुटूंबास निराधार करुन प्राणत्याग करतो. ते दु:ख लेखणीतून उतरल्याशिवाय रहात नाही!

'वाचेल तो वाचेल' अस म्हणतात! मला तर वाटत, 'वाचेल तो लिहणारच' नक्की!  पुस्तकांच किती अफाट विश्व पसरलेय सभोवती. जे वाचलं त्यावर, त्याबद्दल लिहावसं वाटतंच. त्यातल्या खऱ्या, काल्पनिक घटना,  पात्र मनाला अस्वस्थ करतात! कधी भावतात तर कधी नकोशा वाटतात! ते ही कागदावर परिक्षणाच्या रुपात ऊतरतच!

शालेय वयापासून घरात,  शाळेत  राष्र्टसेवादलासारख्या चरित्र घडवणाऱ्या सस्थेत वावरताना लिहावस वाटायच.  कुवतीप्रमाणे लिहायला लागायची. पुणे येथील  एस. पी कॉलेज  मधे आणि विद्यापीठात असंख्य पुस्तक वााचता  वाचता  लेखणीकडे मन वळल आणि मी लिहु लागले.   आता जगभर प्रवास करताना,  सामाजिक संस्थांमधून काम करताना नवनव्या माणसांना जाणून घेताना ,  देशांना पाहताना  निसर्गात  रमताना ते लेखणीबद्ध करावस वाटतच!  

आणि आता निवृत्तीनंतर तर लेखन हाच माझा श्वास झाला आहे.  तो संपला की लिहणं संपेल!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel