चीन देशात लीना नावाची मुलगी तिची आई डेबोरा हिच्यासोबत छोट्याशा झोपडीत रहात होती.  लीनाचे वडील वारले होते.  त्यांची परिस्थिती गरिबीची होती.  डेबोरा रोज शेतात काम करायला जायची तर लीना छोटे मोठे काम शोधायला रोज बाहेर पडायची.  कधी का मिळायचे तर कधी नाही.

एके रात्री लीनाला स्वप्न पडले की ती संपूर्ण जग प्रवास करते आहे.  दुसऱ्या दिवशी आईला तिने हे स्वप्न सांगितले तेव्हा आई रागावली आणि म्हणाली, "चुपचाप काम शोधायला जा.  आपण गरीब आहोत.  आपण जग प्रवास करू शकत नाही.  तुला आपली परिस्थिती कळत नाही का?"

लीना निराश झाली पण तिला मनापासून वाटत होते की तिचे हे स्वप्न एके दिवशी पूर्ण होणार!

एक दिवशी काम शोधता शोधता लीना सगळीकडे सारखी घरं असलेल्या एका छोट्याशा गावात आली.  त्यापैकी सहज एका घराच्या दाराची तिने बेल वाजवली.  आतून दार उघडले गेले.  दारात एक लाल परी उभी होती.

"काही काम मिळेल का? कोणतेही काम चालेल.  मला आणि माझ्या आईला पैशाची खूप गरज आहे.  आम्ही गरीब आहोत!" लीनाने विचारले.

लाल परी म्हणाली, "काम शोधत शोधत तू परी राज्यात आलीस.  कोण तू कुठून आलीस? आणि अगदी वेळेवर आलीस.  माझ्याकडे सहा खोल्या आहेत त्यापैकी पाच खोल्या रोज झाडून स्वच्छ करायच्या आणि मी नसताना दिवसभर पाचही खोल्यांमध्ये लक्ष द्यायचे.  काही दिवसांपूर्वी येथे काम करणारी बाई सोडून गेली, म्हणून मी तुला कामावर घेते.  पण स्वच्छता राखली पाहिजे.  मान्य असेल तरच काम स्वीकार!"

"हो मी नक्की स्वच्छता राखीन आणि नियमाप्रमाणे वागीन! पण परी ताई माझे एक स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पैसे मिळतील ना?" लीना म्हणाली.

लीनाचे निरागस भाव बघून परी म्हणाली, " नक्की तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील! एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, सहावी खोली नेहमी बंद असते.  ती कधीही उघडायची नाही.  नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकीन आणि कायमची मांजर बनवून टाकीन!"

" हो परी ताई नक्की मी तुम्ही सांगितल्या प्रमाणेच करेन!" लीनाने आश्वासन दिले.

अशा रीतीने लीनाला काम मिळाले आणि ती परीकडे नियमितपणे काम करू लागली.  लीनाची आईसुद्धा खुश होती.

एक दिवशी परी घरी नसताना लीना सगळ्या खोल्या साफ करत होती.  पाचवी खोलीत साफ करताना सहाव्या खोलीतून तिला काहीतरी खट खट असा आवाज ऐकू येऊ लागला.  पण परीने सांगितलेल्या नियमानुसार सहावी खोली उघडायची नाही हे ठरलं होतं.  सहाव्या खोलीला कुलूप नसायचं, नुसती कडी लावलेली असायची पण तिने आजपर्यंत कधीही खोली उघडली नव्हती.

आज मात्र त्या खोलीतून खूप मोठ्याने आवाज येत होता त्यामुळे कडीच्या जवळ असलेल्या एका छिद्रातून लीनाने आत बघितले तर तिला आश्चऱ्याचा धक्का बसला आणि भीतीही वाटली,  कारण एक चेटकीण झाडूवर बसून त्या खोलीत उडत होती आणि त्या खोलीतले सोने चोरून गोल झरोक्यातून बाहेर उडून जाण्याच्या बेतात होती.

तेवढ्यात प्रसंगावधान राखून चपळाईने लीनाने कडी उघडून तिच्या हातातले झाडू त्या चेटकिणीच्या झाडूवर फेकून मारले आणि ती चेटकीण दाणकन खाली आपटली आणि तिचा झाडू तुटला.  पाठीवर आपटल्याने चेटकीणची पाठ दुखायला लागली,  त्यामुळे ती उठू शकत नव्हती.  तोपर्यंत पटकन खिडकीतून जोराजोराने ओढून लीनाने आरडाओरडा केला, "चोरी चोरी!"

आजूबाजूच्या घरांमधील काही वेगवेगळ्या निळ्या, पिवळ्या, हिरव्या पऱ्या धावत आल्या आणि सगळ्यांनी मिळून चेटकिणीला बांधून ठेवले.

लाल परी घरी आल्यानंतर इतर पऱ्यानी लीनाचे कौतुक केले आणि लाल परीने आनंदाने लीनाला सांगितले की तिने खूप मोठे काम केले आहे.  सहाव्या खोलीतले सोने जे सगळ्या पऱ्यांच्या मालकीचे आहे ते आज चोरीला जाण्यापासून वाचवले.

परीने तिला बक्षीस म्हणून त्या खोलीत आडवे झोपायला सांगितले आणि तिच्या अंगाच्या खाली जेवढे सोने येईल तेवढे सोने तिला भेट म्हणून दिले आणि तिला कामावरून कायमचे मुक्त केले.

त्या मिळालेल्या सोन्यातून लीनाने एक घर घेतले आणि नंतर उरलेल्या पैशांत तिचे जग प्रवासाचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले.

(मूळ कथेचा स्वैर मराठी अनुवाद निमिष सोनार यांनी केला आहे)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to आरंभ: सप्टेंबर २०१९


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
अजरामर कथा
श्यामची आई
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
विनोदी कथा भाग १