२ सहकार्य

सहकारी तत्वावर, 'परस्परसाहाय्याच्या तत्वावर, ख्रिश्चन लोकांनी युरोपमध्ये जसे काम चालविले आहे, त्याच नमुन्यावर किंवा त्याप्रमाणेच हिंदुस्थानातील हिंदू व मुसलमान यांनी केल्याशिवाय गत्यंतर नाही. पाश्मिमात्य नाचतात तसे आपण नाचावे असा हया सांगण्यातील हेतू नाही. पाश्चिमात्यांचे सदैव अनुकरण करीत राहावे असेही कोणाचे म्हणणे नाही. अनुकरण करणे निराळे आणि पाश्चिमामात्यांच्या संस्थांचे स्वरूप व महत्व समजून घेऊन आपण तशाच गोष्टी आपल्यास अनुरूप व आपल्या परंपरेस शोभतील अशा स्वरूपात प्रकट करणे हे निराळे. पाश्चिमात्य संस्कृती व पाश्चिमात्य जीवनपध्दती आपल्याकडे आल्यामुळे आपल्याबहुमोल अशा संघटनेच्या प्राचीन संस्था नष्टप्राय झाल्या आहेत. जुन्या ग्रामसंस्था, त्यांच्यातील सहकार्य व जूट, त्यातील साधी, सुटसुटीत, कालापव्यय न करणारी आणि परिणामकारिता अशी कार्यपध्दती, ती नैतिक व्यवस्था, प्रत्येक गोष्टीतील सहेतुकता व उपयुक्तता, उच्च विचार व श्रेष्ठ त्याग यांचे स्वागत करावयास सदैव सज्ज असणारी वृत्ती; हे सर्व आता नाहीसे झाले. आज सतरा ठिगळे लागलेली. बेढब असा नागरसंस्कृतीची; शहरात रूढ झालेल्या या नवसंस्कृतीची; गोधडी आपल्या अंगावर पडली आहे. पूर्वीची शाल गेली व ही गोधडी आली.

मध्ययुगातील आपली नगरेही व्यवस्थित होती. त्याच्या व्यवस्थेत हेतुबध्दता होती. मध्ययुगीन भारतीय नागरजीवनात परस्पर सहकार्य होते. उत्कृष्ट जीवनरचना होती. येथे उगीच बजबजपुरी व बाजारबुणगेपणा नसे, उत्कृष्ट संस्कृतीचे दर्शन तेथे होत असे. सुव्यवस्थेशिवाय संस्कृती नाही. पूर्वी जो कोणी काशी किंवा अलाहाबाद येथे जाई, तो आपआपल्या विशिष्ट लोकांच्या वस्तीतच उत्तरे. दक्षिणी ब्राम्हणांच्या पुर्‍यात दक्षिणी ब्राम्हण जाई. बंगाली लोकांच्या वस्तीत वंगीय जाई. आलेल्या मनुष्याच्या भोवती लगेच त्या त्या पुर्‍यातील लोक जमायचे, विचारपूस व्हावयाची, मित्र भेटायला येत, लगेच ओळखी होत. आलेल्या मनुष्याची व्यवस्था ताबोडतोब लावण्यात येईल, त्याला सहाय्य दिले जाई, त्याला सल्ला मिळे. या प्रकारे तो नवखा मनुष्य तेथील संस्कृती पाहू शके व ती आपलीशी करून घेऊ शके. जोपर्यंत तो त्या नगरात राही तो पुरा, तोपर्यत म्हणजेच त्याचे घर. पुरा म्हणजेच त्याचे जणू एक मंडळ असे, क्लबच असे म्हणा ना. आलेला नवीन मनुष्य आजारी पडला तर त्याची शुश्रूषा होई, औषधपाण्याची व्यवस्था केली जाई.त्याला कोणत्याही प्रकारची वाण तेथे कोणी पडू देत नसे. अर्वाचीन शहरातून महाराष्ट्रसंघ, वंगीय मंडळ, तामीळ आश्रम वगैरे तत्प्रांतीयांच्या संस्था असतात; परंतु हया संस्थापेक्षा पूर्वीचे ते पुरे फारच उत्कृष्टपणे कार्य करीत व उपयोगी पडत. कारण आलेल्या नवख्या मनुष्यास आपल्या बंधुचे सारे जीवन अतंर्बाहय पाहता येत असे. या शहरातच सुसंघटित असे जातीय मतप्रदर्शन होई. व त्याचा परिणाम व प्रसार अन्यत्र दूरवरच्या प्रांतातही होई. या मोठमोठया नगरीतून प्रथम मतध्वनी उठत व त्यांचे पडसाद मग सर्वत्र जात. एकाच नगरात भिन्न भिन्न जातीय संघ असत. हे संघ उदार असत. संघातील वातावरण मोकळेपणाचे असे. बंधुभाव व स्नेहभाव भरपूर असे. शुल्क औपचारिक पध्दतीस तेथे वाव नसे; तेथे जिव्हाळा असे. या संघाना श्रीमंत लोक राजाप्रमाणे देणग्या देत असत. अशा रीतीने सामाजिक वातावरण, तत्तत् जातीय वातावरण, तत्तत् प्रांतीय वातावरण, शुध्द ठेवले जाई. या जातीय जीवनाचा विकास होई. सांभाळ होई. सामाजाचे किंवा त्या त्या जातीतील लोकांचे आदर्श आचरण कसे असावे, शील कसे असावे, हे अशा संघाकडून दिग्दर्शित केले जाई. हे संघ म्हणजे दीपस्तंभ असत, मार्गदर्शक असत. प्राचीन नगरातून अशी  ही परंपरा उत्कृष्टपणे पाळली जाई. कल्पना करा की, एखादा दक्षिण हिंदुस्थानातील विद्यार्थी काशीत शिकण्यासाठी म्हणून गेला, तर तेथे जाताच, तो आपल्या प्रांतातील आपल्या जातीच्या लोकातच राहावयास जाई. त्यामुळे शहरातील मोह किंवा व्यसने यापासून तो पहिल्यापासूनच दूर राही. जणू आपल्या स्वत:च्याच दुसर्‍या घरात राहावयास आपण आलो असे त्यास वाटे. आपल्याच वडीलधार्‍या मंडळीत आपण वावरत आहोत असे त्याला वाटे. त्याच्या सोभवतालचे लोक त्याच्याच प्रांतातील, त्याच्याच जिल्हयातील असत. आपण आयोग्य रीतीने वागलो तर ती बातमी आज ना उदया आपल्या घरी जाईल अशी त्याला भीती वाटे. कारण त्याच्या प्रांतातील जाणारे येणारे नेहमी असतच व ते तेथेच उतरत. आपल्या गावी जर आपल्या वाईट वर्तनाची बातमी गेली तर आपल्या आईबापांस खाली मान घालण्याची पाळी येईल हा विचार त्या तरूण विद्यार्थ्याच्या मनात सदैव जागृत असे व म्हणून ता जपून सावधगिरीने वागे.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel