हे भारतातील प्राचीन शहरातील चित्र डोळयांसमोर आणले व आजच्या शहरातील चित्र ही मनासमोर आणले, तर केवढा विरोध दिसतो! हा विरोध पाहून मनाला वाईट वाटते. कलकत्यासारख्या शहरात हजारो मुसलमान खेडयापाडयातून येतात व गाडीवान होणे, टांगा, बगी हाकणारे होणे, हे यांचे धंदे असतात. या जीवनात कसे पदोपदी मोह असतात ते सांगण्याची आवश्यकता नाही, त्या गोष्टी सुप्रसिध्दच आहेत. दारू, बिडी, पानपट्टी, हॉटेल यांनी बनलेली त्यांची संस्कृती असते, दुदैवाने दारूचे गुत्तेही ठिकठिकाणी उघडले जात आहेत, वाढत आहेत! ज्याने त्याने आपल्याच मोहल्यात जाऊन राहाण्याची चाल मागे पडत चालली. वाटेल तेथे मनुष्य राहतो, म्हणजेच वाटेल ते करावयास हरकत राहत नाही. कोण हटकणार, कोण आपल्या घरी कळवणार? अशा प्रकारची रहाणी रूढ होऊ पहात आहे. शहरातील या अनिर्बंध व स्वच्छंद राहणीमुळे खेडयातील शेकडो कुटुंबाचे सुख मातीत मिळत असेल तर त्यात आर्श्चय कसले? कलकत्यात गेलेल्या या मजुरांच्या व्यसनमय जीवनामुळे खेडयातील त्यांच्या घरी अश्रू पडत असतात.
इतके आहे तरी जगातील इतर लोकांपेक्षा हे आपले लोक अजून अधिक वरच्या दर्जाचे आहेत. सभोवतालच्या परकी लोकांच्या संसर्गामुळे व परकी संस्कृतीने आणलेल्या व्यसनामुळे, फॅशनीमुळे, ज्या गरीब माणसाचे जीवन शहरात बिघडून जाते, जो गरीब मनुष्य मोहात व व्यसनात बुडून जातो, तोच मनुष्य पोटाला एकदाच खाऊन खेडयातील आपल्या घरी काही पैसे पाठवीतच असतो! किती त्याची धडपड! या हल्लीच्या काळी हिंदी नोकरांच्या जीवनात जो त्याग दिसून येत आहे तो इतिहासात नमूद केला जाणार नाही हे खरे आहे. पंरतु आज आपल्या देशातील अगदी साधे सामान्य असे लोकही पोटाला इतके चिमटे घेत आहेत, स्वत:च्या क्षुधेवर एवडे नियंत्रण घालीत आहेत, स्वत: इतके उपासतापास काढीत आहेत की अशा त्यागी माणसांना इतर देशांनी हुतात्मे म्हणून गौरविले असते. त्या त्यागाला तोड नाही.
आजच्या विद्यार्थ्यांवर सभोवतालच्या सामाजिक प्रश्नांचा विचार करावा लागण्याची पाळी अजून आली नाही का? आपल्या राष्ट्रासाठी आपण काय केले पाहिजे, आपापली स्थिती सुधारण्यासाठी लोकांनी काय केले पाहिजे, लोकात बळ कसे येईल, उत्साह कशाने येईल, त्यांना खाण्यापिण्यास पोटभर कसे मिळेल, या प्रश्नाचा विचार तरूण विद्यार्थ्यांनी नको का करायला? नवीन धर्मतत्वे शोधून काढण्याची जरूर नाही. आपल्या पूर्वजांच्या कृपेने त्याचा भरपूर ठेवा आपणाला लाभलेला आहे. नैतिक भावना आज प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात, रोजच्या वागणुकीत कशा आणाव्या, कशा आणता येतील, हा प्रश्न आहे. नैतिक भावनांच्या आधारावर सहकारी संस्था, परस्परसाहाय्यक मंडळे कशी स्थापावी हा प्रश्न आहे. पूर्वजांची ध्येये कृतीत कशी आणावयाची "सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:" हा मंत्र केवळ पोपटाप्रमाणे म्हणत न बसता प्रत्यक्ष आचरणात कसा आणावयाचा व सत्य करावयाचा, दैन्य हरून सुखाचा सुकाळ कसा करावयाचा, हा प्रश्न आहे; रोग हरून आरोग्य सर्वांस कसे द्यावयाचे हा प्रश्न आहे.