ज्या काळापासून भारताचा इतिहास सापडतो, त्या काळापासून आपण पाहिले तर आपणास असे आढळून येईल की, भारताने संकुचित नीतीला कधीही प्राधान्य दिले नाही. ज्या नीतीत मी मात्र जगावे व दुसर्याने मरावे, एवढेच येते, ज्या नीतीत मी मात्र श्रेष्ठ व बाकी सारे कनिष्ठ येते, अशी नीती भारताचे कधीही ध्येय नव्हते. भारतवर्षाचा हा उज्ज्वल व थोर असा विशेष आहे. भारतीय ध्येय हे विशिष्ट जातीपुरते, भारतीय नीती ही विशिष्ट जातीपुरती असे कधीच झाले नाही. ही अभिमान धरण्यासारखी गोष्ट आहे. ह्याच तत्वावर भारताचा वैभवकाळ पुन्हा येईल; याच प्राचीन विधानाच्या जोरावर, याच पुण्याईवर भारत पुन्हा जगद्गुरु होईल, अशी आमची आशा आहे. वेदान्तासारखे तत्वज्ञान, अद्वैतासारखा विचार, यांचा सामाजिक जीवनाशी व सामाजिक अनुभवाशी निकट संबंध आहे. तसा संबंध नसता तर या तत्वज्ञानाचा जन्मच होता ना, भौतिक शोध जसे सामाजिक गरजेने लागले त्याप्रमाणे आध्यात्मिक शोधही सामाजीक गरजेतूनच उत्पन्न होतात. आशा करू या की, या भारतवर्षात असा एक दिवस पुन्हा उजडेल की, ज्या वेळेस सारे तरुण निरनिराळ्या कठीण कठीण शास्त्राचे गाढे अध्ययन करून त्यात पारंगत होतील व समाजाच्या अस्तोदयांचे कार्यकारणभाव हुडकून काढतील. जाती व वर्णव्यवस्था, राष्ट्रिय जीवन, सामाजीक जीवन याचे परस्परांशी कसे संबंध असत हे शोधून काढतील. आमच्या देशातील वैभवाचा सामाजिक व जातीविषयक व्यवस्थेशी कसा संबंध होता व कितपत होता हे समजून आले पाहिजे. व्यवस्था नीट असल्याशिवाय वैभव मिळत नसते. व्यवस्थेच्या पायाजवळ वैभव चालत येते. नाना जाती व वंश, नाना विभिन्न ध्येये व विचार, नानाविध विचार व रूढी, या सर्वांचा समन्वय करणारे चातुर्वर्ण्य, समन्वय करणारी जातिव्यवस्था, आणि या सर्वांना धर्माशी व परमात्म्याशी जोडणारी ती थोर अद्वैत विचारपध्दती यात आमचे भाग्याचे बीज आहे काय? या रचनेत जी बुध्दीची व्यापकता व विशालता दिसून येते, जे घटनापटुत्व दिसून येते, त्यात आमच्या भाग्याचे मूळ आहे काय? बुध्दीची व्यापकता व विशालता हीच भारताची जगाला देणगी आहे. कारण अजूनही जगात या गोष्टीचा दुष्काळ आहे. का भारताच्या वैभवाचे गणित अन्य कोठे आहे? येईल तो दिवस जाईल, ज्या दिवशी भारतीय तरुण हे सर्व शोधून काढतील, अभ्यास करून याचा उलगडा करतील व छडा लावतील. आपण त्याच थोर विशालदृष्टी पूर्वजांचे जर सुपुत्र असू तर आजही आपण संकुचित नीती पत्करणार नाही. आज जो मानवी विकास होत आहे त्यात हिंदुस्थान भाग घेत नसला, तो मागे असला तरी तो सदैव मागेच राहील असे नाही. आज हिंदुस्थानची उपेक्षा होत आहे. परंतु उपेक्षिलेल्या शक्तींची लौकरच जरूर लागेल. भारत मोठा असो वा क्षुद्र असो. विचारांची शक्ती मोजता येत नसते. सत्यविचारात, अभिजात व थोर अशा विचारात अनंत सामर्थ्य असते. तो विचार सर्व शास्त्रांपेक्षा बलवान असतो. शेवटी जगावर जगाची सत्ता नसून विचाराची व चैतन्याची सत्ता चालत असते
आपले ऋषी व योगी असे सांगतात की, ध्यान करता करता अशी एक मानसिक स्थिती प्राप्त होते की, ज्या स्थितीत असताना आपण विश्वाच्या भाषेतच व्यवहार करतो. क्षुद्र मी मग त्या हवेत जगत नाहीत, त्या स्थितीत टिकत नाहीत. आपण विश्वाकार झालेले असतो, 'भूर्भुव:स्व: सारे लोक मी. रविचंद्र-तारे-गिरीवृक्षवारे-सारे चराचर मी' रुद्रसुक्ततील तो ऋषि असाच विश्वाकार होऊन बोलत आहे व विश्वाजनांच्या गरजा बोलून दाखवीत आहे. '' मला तूप पाहिजे. मला मध पाहिजे, मला गहू पाहिजेत, मला सत्य पाहिजे, मला बुध्दी पाहिजे. '' असा तो संस्फूर्त ऋषी गर्जून राहिला आहे. त्याप्रमाणेच तो सर्व वस्तुमात्राला वंदन करीत आहे. '' कुंभाराला नमस्कार, सुताराला नमस्कार, चांडाळाला नमस्कार, चोरांच्या नायकाला नमस्कार'' अशी ही जी भव्य अवस्था, ही जी विश्वव्यापी सृष्टी, तिला आपण दुरूनच वंदन करू या.
परंतु या भूमिकेखालची पायरी म्हणजे जागतिक भूमिका. या जागतिक भूमिकेवर उभे राहून विचार करण्यास शिकू या व आपल्या मुलाबाळांसही शिकवू या. हा धडा जर नीट पाठ केला तर वैश्विक भूमिकेवर जावयास आपण लायक होऊ. जगन्नर झाल्यावर विश्वनर होता येईल. आधी जगाचे होऊ या. मग विश्चाचे होता येईल ही जागतिक जाणीव सर्व मानवजातीच्या जाणीव, ज्या वेळेस आपणास होईल, त्या वेळेस सार्या मानवजातीच्या दु:खाने आपण दु:खी होऊ व सुखाने सु:खी होऊ. सर्व मानव जातीच्या वेदना यातना, मानखंडना माझ्याच आहेत ही भावना आपण हृदयास शिकवू या. म्हणजे खूप सामर्थ्य येईल व त्या सामर्थ्यातून सर्व जगाला व्यापणारी नीती आपण निर्माण करू शकू.