१६: चारित्र्य म्हणजे आध्यात्मिकता
खाण तशी माती, बीज तसा अंकुर, कूळ तसे मूल, हा जो मंत्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस उच्चारला गेला तोच अर्वाचीन काळातील अतिमहत्वाचा असा सर्वसामान्य सिध्दांत होऊन बसला आहे. व्यक्ती आपल्या वंशाप्रमाणे वागते. व्यक्तीचा विकास कुळधर्माप्रमाणे, आपल्या वंशधर्माप्रमाणे, जातिधर्माप्रमाणे होतो. ज्या वेळेस व्यक्तीचे शिक्षण पुरे होते. मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष असो; त्या वेळेस त्या व्यक्तीमध्ये सारा गत इतिहास जणू अवतीर्ण होतो. मानवजातीची सारी गत ध्येये, मानवजातीच्या सार्या गत आकांक्षा त्या व्यक्तीत उभ्या राहतात. विसाव्या शतकातील युरोपियन गुरूंचा साधूसमान पेस्टालाझी याने जी नवी शिक्षणपध्दती शोधून काढली ती याच महान तत्त्वाने प्रेरित होऊन याच तत्त्वाचा विकास त्याच्या पध्दतीत केलेला आहे. चांगले शिक्षण मिळाल्याशिवाय मुळीच आशा नाही हे त्या थोर आचार्याने पाहिले. नवीन विचारांचेच अर्वाचीन शिक्षण परंतु मानसशास्त्राच्या सिध्दांतावर उभारलेले मानवजातीच्या विकासेतिहासावर रचलेले असे द्यावयास हवे, ही गोष्ट पेस्टालाझीने जाहीर केली.
स्वित्झर्लंडमधील स्वजनांवर प्रेम करणारा पेस्टालाझी याला जो प्रश्न सोडवावयाचा होता त्यापेक्षा भारतीय लोकांना जो प्रश्न सोडवावयाचा आहे तो शतपटीने गंभीर व अधिक महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नापुढे पेस्टालाझीचा प्रश्न म्हणजे काहीच नाही. तरीही दोन्ही प्रश्न मुळात एकरूपच आहेत. हिंदुस्थानातील लोकांच्याही मनात आज नवीन विचारांचे बीजारोपण करावयाचे आहे. जी नवसंस्कृती त्यांना द्यावयाची आहे ती वरवर उथळपणे दिली जाऊ नये, जीवनावर खोल व गंभीर ठसा उमटविणारी ती व्हावी ही गोष्ट पाहणे फार जरूर आहे. भारतीय जनतेला हे नवशिक्षण देताना प्राचीन भारतीय विकास, प्राचीन ध्येये हे सारे लक्षात ठेवावे लागेल. भारतीय जनतेने नवसंस्कृती घेऊन शेवाळाशी खेळत न बसता कमळांवरदृष्टी ठेवावी. तीरावरच्या शिंपल्यांशी खेळत न बसता सागरात मोत्यांसाठी बुड्या माराव्या या गोष्टीकडे फार लक्ष दिले पाहिजे. ज्या भूमीने तालतमाल व बकुल; आम्र अशा वृक्षांना वाढविले त्या भूमिने क्षुद्र सरपटणारे व लगेच मरणारे, दोडकी व कारली यांचेच वेल लावीत बसू नये. त्यातच धन्यता मानू नये; हे पाहिले पाहिजे. वेदांची जी जननी, ज्ञानयोगाला प्रसवणारी जी माता, अद्वैताला जन्म देणारी अंबा-तिने पाश्चिमात्य कला व विद्या यांचे अनुकरण करीत किंवा त्यांचे गुण-दोष बघत बसू नये, तर स्वत:नवीन दृष्टी घेऊन काहीतरी भव्य दिव्य असे निर्माण करावे.
जोपर्यंत भारतीय मन ऐतिहासिक दृष्टीचा अंगीकार करीत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती केवळ अनुकरणशील व मधून मधून टीका करणारी अशीच राहील; तोपर्यंत हे क्षुद्र कामच तिला करावे लागणार. नवीन ऐतिहासिक दृष्टी येण्यासाठी नवीन मोजमाप पाहिजे. नवीन आखणी केली पाहिजे, नवीन आकार घेतला पाहिजे. तेव्हाच एकमेकांत मिसळून गेलेल्या गोष्टी निरनिराळ्या व स्पष्ट दिसू लागतील. मग सार्या गोष्टींची खिचडी आपण करणार नाही, मग जे आजपर्यंत कसेतरी होत होते ते ध्येय म्हणून बुध्दिपूर्वक व विचारपूर्वक अनुसरले जाईल, आंधळेपणाने होणार्या त्याच क्रिया परंतु डोळसपणाने होऊ लागतील; प्रत्येक गोष्टीला रहस्य, हेतु प्रयोजन वगैरे पाहिले जाईल, दृष्टी रसग्राही व सारग्राही होईल; ध्येयाची निश्चितता ठरेल.