स्वातंत्र्याच्या कल्पनेत मुख्य कल्पना झगडण्याची आहे. स्वातंत्र्य शब्द उच्चारताच डोळयांसमोर झगडा उभा राहतो. कोणाजवळ तरी झगडून कशापाशी तरी झगडून, स्वातंत्र्य अनुभवावयाचे असते. स्वातंत्र्य म्हणजे झगडा, विरोधाशी झगडण्यात स्वातंत्र्याचा जन्म होतो. चकमक झाल्याने ठिणगी पडते. मनुष्य किंवा मनुष्यांनी बनलेला समाज समजू इच्छित असतो. स्वत:चे स्वरुप समजू इच्छित असतो. स्वत:तील अर्थ प्रकट करु इच्छित असतो. ज्याप्रमाणे बीज स्वत:मधील विकास प्रकट करू पाहते. त्याप्रमाणेच व्यक्तीचेही असते. व्यक्ती किंवा व्यक्ती मिळून बनलेली समष्टी प्रयत्न करून, स्वत:चा विकास करून घेऊ पहात असते. दुसर्याचे दडपण व्यक्ती किंवा समष्टी झुगारून देत असते. व्यक्तीला समाजाचे बंधन झुगारावेसे वाटते. व एक समाज दुसर्या समाजाची बंधने झुगारून देऊपाहत असतो. जे मर्द असतात. खरे नरवीर असतात. त्याना सामाजिक बंधने केव्हा एकदा झुगारून देऊ असे होते. समाजाचे कृत्रिम दडपण त्यांना सहन होत नाही. असा स्वतंत्र बुध्दीचा मर्द पुरुष कधी समाजाच्या इच्छेप्रमाणे वागताना दिसेल. परंतु त्याच्या त्या वागण्यात समाजाची हुकमत नसते. त्याला स्वत:ला तसे वागणे पसतं पडलेले असते, म्हणूनच तसा तो वागतो. परंतु अशा जीवनात कधी कधी धोका असतो. कारण हे झुंजार वीर पुरुष हे स्वातंत्र्येच्छु पुरुष, आपल्या स्वत:च्याच मनाला फार मानतात, स्वत:च्या विचारांचेच स्तोम माजवतात. स्वत:चाच उदो उदो करतात, ते हटट् धरून बसतात, आग्रही होतात, काहीतरी ओढताण करून स्वत:च्या मताचे समर्थन करीत रहाणे एवढेच त्यांचे काम होऊन बसते. आपले मतस्वातंत्र्य कोणी हिरावून घेईल म्हणून असा मनुष्य फार जपतो, अधीर व उल्लू बनतो. असा मनुष्य लहान मुलासारखा वागू लागतो. ज्या मुलाला 'वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय' हे माहित नाही, असे मूलही त्याच्याजवळ काही मागा, त्याला काही श्री. ग म्हणावयास सांगा, तर ते नाही नाही म्हणेल. कारण नाकारण्यात त्याला स्वत:चा हक्क दिसतो] स्वत:चे स्वातंत्र्य दिसते. जसे मुलाचे तसेच वरील व्यक्तीचेही होण्याचा संभव असतो. आपल्याच मताल चिकटून बसणार असे हे लोक कोत्या व संकुचित दृष्टीचे होतात. दुसर्याला नेति' 'नेति' म्हणू लागतात स्वतंत्र राहू पाहता गुलाम होतात. त्यांच्या मनात घमेंडखोरपणा शिरतो, स्वार्थ बळावतो, आत्मश्लाघा वाढते. अशा व्यक्ती मग दुसर्यांच्या सुखदु:खाकडे बघत नाहीत. स्वत:चे झाले की संपले, आपले झाले की पुरे, असे त्यांना वाटते. अशा व्यक्तींना मग पुढे जीवनात मोठमोठया कार्यासाठी एकत्र येणे, सहकार करणे या गोष्टी साधत नाहीत. ते एकांडे शिलेदार बनतात. खरोखर मोठे जे असतात. त्यांना 'आपले स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकणार नाही' ही जाणीव असते. माझे स्वातंत्र कोणी हिरावून घेणार नाही व आपण हिरावू देणार नाही'. ही श्रध्दा, हा आत्मविश्वास ज्यांच्याजवळ असतो. ते दुसर्याला स्वातंत्र्य देतात, दुसर्याच्या स्वातंत्र्याचा अपहार ते करीत नाहीत. असे थोर पुरुष आपण समाजात नेहमी पाहतो. ते गमावू इच्छित नाहीत. असे थोर पुरुष आपण समाजात नेहमी पाहतो. त्याग, मनाचा मोठेपणा हा मान मानवजातीत दुर्मिळ नाही. पदोपदी तो दिसून येत असतो. समाजाची सारी इमारत मजबूतपणे, भक्कमपणे उभी राहणे शक्य करणारा चुना म्हणजेच तर त्याग. त्याच्याशिवाय कसे चालणार? तो नसेल तर कसे होणार?
समाजाजवळ झगडून व्यक्तीला आपले स्वातंत्र्य हिसकावून घ्यावयाचे असते. परंतु एवढयाने प्रश्न सुटला नाही. अजून शिल्लक आहे. मनुष्य जी ही स्वतंत्रता मिळवू पाहतो तिचे स्वरूप काय? आणि हे ठरवताना, अशा वेळीच चुका होण्याचा फार संभव असतो. कोणी म्हणतात की, कसले स्वातंत्र्य घेऊन बसलात! माहित आहे तुमचे स्वातंत्र्य ! स्वतंत्र व अनिर्बंध वागू पाहणारे तुम्ही शेवटी स्वत:च्या वासनांचे गुलाम होता झाले! तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला स्वच्छंदी बनवितं, विलासी सुखलोलुप व स्वार्थी बनविते! असे हे पै किंमतीचे तुमचे स्वातंत्र्य आहे. त्याने विकास तर दूरच रहिला. विनाश मात्र दारात येऊन उभा रहील. तुमचे स्वातंत्र्य म्हणजे वासनांचे पराकाष्टाचे दास्य होय!’