४ व्यापक व वाढते विधिशास्त्र
ज्या धर्माला जिवंत राहावयाचे आहे त्याने वाढले पाहिजे, त्याने स्थाणू असून भागणार नाही. नदीने वाहात राहिले पाहिजे, वार्याने फिरत राहिले पाहिजे, धर्माने वाढत राहिले पाहिजे. ज्यात जीवन नाही त्यातील लवचिकपणा जातो. ती वस्तू शुष्क, नीरस , कठिण होते. तिच्यात बदल करतायेत नाही, तिच्यात वाढ होत नाही. त्या वस्तूचा विकास थांबतो. जे जिवंत आहेत त्यांनी नवीन नवीन प्रांत आक्रमण केले पाहिजेत. नवशक्ती संपादिली पाहिजे, नवीन साधने त्यांनी मिळवली पाहिजेत. पूर्वी माहित नसलेल्या अज्ञात असलेल्या अशा गोष्टीसाठी, असा प्रांतात घुसण्यासाठी, स्फूर्ती त्यांच्या अंतरंगात संचारली पाहिजे. जे जिवंत राहू इच्छितात त्यांनी नवीन ध्येये, नवीन प्रकाश यांना मिठी मारण्यासाठी उभे राहिले पाहिजे. बदलणार्या परिस्थतीला आकार देण्यासाठी त्यांनी कंबर बांधून तयार राहिले पाहिजे.
सनातनधर्मानेही वाढण्यात त्याचे सनातनत्व आहे. वाढीचा नियम सनातनधर्मानेही पाळला पाहिजे. जर हिंदुधर्म वाढणार नाही, घरातून बाहेर येणार नाही, नवीन पोषाख घालणार नाही. नवीन पल्लव त्याला जर फुटले नाहीत तर तो चिरंजीव होणार नाही. हिंnwधर्म जर नवीन अनुभव घेणार नाही, नूतर कार्यक्षेत्रात जर तो घुसणार नाही तर तो टिकणार नाही. इतर सगळया धर्मापेक्षा हिंदुधर्मात अधिक विकासक्षमता आहे. हिंदूधर्माची वाढ खुरटलेली नाही. तो वाढेल. नवीन मिळवील, नवीन जोडील, नवीन भाव प्रकट करील, नवीन रुप दाखवील. हिंदुधर्मात ही क्षमता आहे म्हणूनच त्याला आपण सनातनधर्म, अमरधर्म असे म्हणतो 'बाबावाक्यं प्रमाण~' साठी तयाला सनातन म्हणत नाही.
परंतु कोणत्या कोणत्या बाबतीत फेरफार केले पाहिजेत ते समजून घेणे अशक्य आहे. कोणत्या गोष्टीत फेरफार करण्याची वेळ आली आहे हे जाणण्याची बुध्दी हवी. गेली हजार दीड हजार वर्षे हिंnwधर्म म्हणजे व्यक्ती व परमात्मा यादोघांपुरताच जणू झाला आहे. यजमान व उपाध्याय, जीव व शिव एवढयातच धर्म येऊन बसला आहे. सर्व धर्माची शेवटची शिकवण, सर्व धर्मातील अंतिम प्राप्तव्य हेच आहे, ही गोष्ट खरी, आध्यात्मिक व्यक्तीवाद किंवा वैयक्तिक अध्यात्मवाद; जिवाचा व्यक्तिगत उध्दार; हेच सुसंस्कृत व सुसंघटित धर्माचे सार आहे. जाता जाता काही सामाजिक विचारही आनुषंगिक रीत्या धर्म सांगत असतात. परंतु धर्म ती गोष्ट मुख्य मानीत नाहीत? प्रधान मानीत नाहीत. परंतु धर्म केवळ वैयक्तिक नाही तर सामुदायिकही आहे. धर्म जिवाशिवाचे ऐक्य करतो. त्याचप्रमाणे मानवजातीचेही ऐक्य करतो. आपण जर सारी एकाच परमेश्वराची लेकरे असू तर आपण सारे एक झालो. भाऊ भाऊ झालो. एका बाजूने प्रगती झाली असेल तर दुसर्या बाजूनेही झाली पाहिजे, एरवी पूर्णता नाही. आज सामुदायिक पूजेने, सार्वत्रिक पूजेने अधिकांचा, पुष्कळांचा उध्दार होईल. सर्वांच्या सेवेवर आज जोर द्या, सर्व मिळून पूजा करा.
यासाठी सामुदायिक प्रार्थना हवी. सामुदायिक प्रार्थनेची संघटना सुरू केली पाहिजे. हजारो मुखातून एकच सूर बाहेर पडत आहे. हजारो लोक एका क्षणात एका विचाराने प्रेरित होत आहेत, एका भावनेने भारून जात आहेत अशा प्रार्थना प्रचारात आल्या पाहिजेत. या प्रार्थना अर्थातच लोकांच्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत असल्या पाहिजेत. समुदयिक प्रार्थनेत दोन भाग करावे. काहींनी सांगावी व इतरांनी ती प्रार्थना म्हणावी.