त्या त्या विषयातील गुरु, त्या त्या विचारक्षेत्रातील गुरु त्या विविक्षित ज्ञानप्रांतात आजपर्यत जितकी प्रगति झालेली असेल त्या प्रगतीच्या पराकोटीशी आपणांस घेऊन जात असतो. आईबापापासून शरीर मिळते, गुरू पासून आध्यात्मिक व बौध्दीक जीवन आपणास मिळते. आईबाप जगाच्या अंगणात आपणास आणून सोडतात. गुरू जगाच्या अंत:पुरात घेऊन जातो. या क्षणापर्यत जे जे कळले, जे जे ज्ञान झाले ते सारे तो दाखवितो त्या त्या विषयातील आजतागायत ज्ञानाची तो मूर्ती असतो; त्या ज्ञानाचा तो प्रतिनिधी असतो. ज्ञानाच्या अदम्य तृषेने शिक्षणाच्या अतुलनीय उत्कंठेमुळेच तो  असा ज्ञानमूर्ति झालेला असतो. ज्याच्याजवळ शिकण्यासाठी, जगातून सारखे ग्रहण करण्यासाठी, अनंत शक्ती व अनंत उत्साह आहे, ज्याचे मन  व बुध्दी कधी थकतच नाहीतच, तो सदैव शिकू पाहणारा नम्र पुरुष थोर शिकविणारा गुरू या पदवीला चढेल.

विद्यार्थ्यांनी ज्ञान कसे मिळवावे, रसग्राही कसे व्हावे हे शिकविण्यासाठी विद्यापीठे असतात. वस्तुमात्रातील ज्ञानाचा गंध कसा चोखून घ्यावा. त्याचे  रहस्य, त्याची पध्दती विद्यापीठांनी समजून घ्यावयाची असते. उडण्याची कला शिकवून भक्ष्य कसे मिळवावे हे शिकवून पक्षी पिलांना स्वातंत्र्य देतात. दिलेल्या पारिस्थितीतून, दिलेल्या जगातून, दिलेल्या वस्तुजातातून,  जो जास्तीत जास्त ज्ञान मिळवून घेतो तो सर्वांहून मोठया बुद्धिचा, जो जास्त रस शोषून घेईल तोच खरा रसग्राही. गुळाचा एकही कण, साखवेचा एकही कण मातीत शिल्लक आहे तोपर्यु±त मुंगी जात येत राहील. शिक्षणाची सर्वात मोठी खूण म्हणजे मनुष्याची ग्रहणशक्ती किती वाढली ते पाहाणे ही  होय. शिक्षणाने नम्र किती झाला, ज्ञानासाठी प्रेमाने प्रत्येक वस्तूजवळ वाकण्याची वृत्ती किती उत्पन्न झाली. एक प्रकारे निष्क्रिय, मुका व स्थिर होऊन थोडक्यात मन रिकामे करून जगातील ज्ञानरस आत किती भरून घेतो, यावर सारे अवलंबून आहे. आपण मोकळं झाले पाहिजे की जगातील ज्ञान आत शिरलेच समजा; श्रीकृष्णाचा उपदेश काय फक्त पार्थच ऐकत  होता? श्रीकृष्णाचे शब्द ऐकून रथाचे घोडेही फुरफुरत होते. नाचत होते.  घोडेच नाही तर तो निर्जीव रथ-रथावरही घों घों करून येणारा श्रीकृष्णाच्या गंभीर वाणीचा जो प्रवाह त्याचा परिणाम होत होता नर, हय, रथ तिघे जरी मूक राहून उपदेश श्रवण करीत होते तरी तिघांच्या मुकेपणाची भूमिका,  तिघांची ग्रहण करण्याची भूमिका ती एकच होती का? ती सारखीच होती का? नाही. दोन माणसेही निरनिराळया रीतीने ऐकतात. मग येथे तर नर,  तुरुंग व रथ असे श्रोते आहेत! प्रत्येकाची योग्य वेळ आली पाहिजे. त्याला कळले ते मला कळत नाही. म्हणून आदळआपट करण्यात काय अर्थ? योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणे म्हणजे धसमुसळेपणा होय. आपली मूकता आपणास पुढे पुढे नेतच असते. गुरूचरणाजवळची आपली मूकता, ती का आळशी असते? नाही. ती अत्यंत काम करीत असते. आपल्या अनंत गतजन्मातील सारी धडपड, सारे झगडे, सार्‍या  गुंतागुंती त्या गुरूपदाशी मुकेपणाने बसण्यात असतात.

आपल्या सावकाराच्या पाठीमागे, आपल्या सिद्धिच्या पाठीमागे, यशाच्या पाठीमागे गुरूकृपा असते. गुरूचे सामर्थ्य असते. आपला प्रयत्न कशासाठीही असो, परंतु मानवजातीने जे जे अनुभव पूर्वी मिळविले, जे जे शोध केले,  जी जी कमाई केली, ते सारे जर पुन्हा आपण नव्याने करून बघू असे म्हणू तर आपले प्रयत्न व्यर्थ जातील. पूर्वीच्या अनुभवाची शिदोरी न घेता अहंकाराने आपण जर जगू लागलो तर एक रेघोटी येथे, एक रेघ तेथे, एक सूचना येथे, एक कल्पना तेथे याहून जास्त काही एक करता येणार नाही.  कारण शास्त्र अपार आहे व जीवित हे अत्यल्प आहे अनंतस्वरूपी ज्ञानेश्वराकडे मानवजातीची यात्रा सारखी सुरू आहे त्या यात्रेतूनच जर आपणही जाऊ तर श्रेय मिळेल. पुण्य घडेल. पूर्वजांची जी कालपर्यंतची सिध्दी तिच्यावर मी उभा आहे; उद्याची उषा माझी आहे ज्या उंचीवर आधीच आपण उभे आहोत ती उंची अनेक शतकांतील लहानमोठयाच्या श्रमाचे फल आहे. गुरूजवळ आपण निष्ठेने रहिलो म्हणून हे स्थान आपणास मिळालेले असते. हया उंचीवर आणून त्याने बसविले जसजसे आपले ज्ञान वाढेल, अनुभर वाढेल. तसतशी आपण ज्ञानात घालण्यासाठी आणलेली भर तो आपला कण अत्यंत शुध्द आपणास दिसू लागेल जसजसे अधिक शिकू  तसतसा इतिहासाचा सिंहनाद, इतिहासाचे रणशिंग जास्तच गंभीरपणे ऐकू येऊ लागेल. मोठमोठ्यांची कृत्ये, विचार व वचने ह्यांच्यात अधिकच अर्थ दिसू लागेल, अधिकच रहस्य दिसू लागेल. आपल्या गुरूप्रमाणे आपणही मग अधिकाधिक पाहावयास शिकू उंच जाण्याचा प्रयत्न करू. त्या गुरूच्या वतीने त्याच्याच झेंडयाखाली राहून नवीन नवीन प्रांतात घुसू; त्याच्याच देखरेखीखाली, त्याच्याच कृपाछात्राखाली त्याच्याच स्फूर्तीने अन्यत्र नवीन प्रयत्न करू.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel