दुसरी गोष्ट म्हणजे थोडया गरजा. हे पाहिजे ते पाहिजे अशी त्या वेळच्या लोकांना भगभग नव्हती. त्यामुळे व त्या काळात भरपूर खाण्यापिण्याला  मिळत असल्यामुळे मध्ययुगीन कारागिराला एका घटकेत लखपती व्हावे.  अशी श्रीमंत होण्याची असोशी व उतावळी नसे. आज नाना प्रकारच्या सुखसोयी व विलासवस्तू मिळण्यासाठी श्रीमंत व्हावे. पैसे मिळवावे असे वाटत असते. आज गरजा व मोह वाढले आहेत व देश तर दरिद्री झाला.  आहे. त्या काळी हल्लीचे नाना मोह नव्हते. त्यामुळे कामास भरपूर वेळ देता येत असे. जी वस्तू कारागीर तयार करी, ती त्याच्या जीवनाचे सुख असे, ती वस्तुच त्याचे बक्षीस, तोच त्याचा आनंद आपणास हया वस्तूपासून आनंद होत आहे तसाच तो इतरांसही होईल अशी सुध्दा भावना त्याच्या  हृदयात येत नसे. आपण चित्रात अमुक रंग गर्द का दिला, येथे जरा छाया  का दाखविली येथे जरा बांक का दिले. यागोष्टीची ती कारणे त्यांचा  आनंद जो त्याचा त्याला ठावा. तो आनंद, त्याची सहृदयता याची दुसर्‍याला काय कल्पना येणार? तो आपल्याच वस्तूस पाही, तिचे चुंबन घेई, तिला हृदयाशी धरी. ती वस्तू म्हणजे त्याचा देव, त्याचे बाळ. ती वस्तू म्हणजे त्याचा आनंद होणार्‍या आनंदाची अंधुक कल्पनाही त्याला इतरास देता येत नसे. तो अंतरी उचंबळे, हेलावे, डोले. स्वत:चा आनंद तो शब्दात  व्यक्त करू शकत नसे. तो वर्णन करावा असेही त्याच्या मनात स्वप्नीही येत नसे. तो आनंद स्वसंवेद्य असे, म्हणूनच फार पवित्र असे.

वस्तू निर्माण करणार्‍याला स्फूर्ती कोठून मिळाली, प्रेरणा कशातून झाली हे जर कळले तर त्या वस्तूचे स्वरूप समजण्याला अधिक मदत होते. त्या वस्तूचे स्वरूप अधिक स्वच्छपणे ध्यानात येते. त्या ज्ञानाचा मग दिवा हातात घेऊन त्या वस्तुकडे आपण पाहतो. पैशाचा किंवा नावलौकिकाचा हेतू जर कलावस्तूच्या निर्मितीच्या मुळाशी असेल तर कलेतील सारा अभिजात मोठेपणा नाहीसा होतो. कलेच्या मुखमंडलाभोवती असणारे तेजोवलय नाहीसे होते. खर्‍या कलावंताला कशाची अपेक्षा नसते! न धनाची, न मनाची. आपल्या मर्त्य हातांकडून अमर्त्य वस्तू निर्माण व्हावी यातच त्याचा सारा संतोष भरून राहिलेला असतो. दुष्काळ पडला तरी  पुन:पुन्हा पेरणार्‍या कष्टाळू व श्रध्दाळू शेतकर्‍याप्रमाणे मार्गात कितीही निराशाजनक परिस्थिती आली तरी पुन:पुन्हा आपल कामाला मन:पूर्वक वाहून घेतो. आपले कमळ उत्कृष्टपणे फुलविण्यासाठी तो आपली पराकष्ठा करतो.  सर्व सामर्थ्य त्या कामी खर्च करतो. कीर्ती मिळेल की नाही, गौरव होईल की नाही, धनलाभ होईल की नाही, त्याची चिंता त्याला कशाला ? तो त्याचा खर्‍या कलावंताचा प्रश्नच नव्हे. 

स्वत:च्या अंत:करणातील भावनांना प्रकट करण्यासाठी खरा कलापूजक कलासर्जन करीत असतो. त्या सर्जनाच्या द्वारा तो स्वत:च्या अंतराला बाहेर पाहात असतो. आपल्या भावनांचे आंतररूप बाहेर पाहण्याची त्याला इच्छा असते. स्वत:ला मूर्त झालेले पाहण्याचा जो आनंद, त्या आनंदासाठी तो ते काम करतो ज्या ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो त्या सर्वाना त्याची ती कला वस्तू आवडते. अशा साध्या सरळ व भावनोत्कट जीवांच आनंदामधूनच त्यांच्या निरागस, अकपट व सहज सुंदर निर्दोष सुखामधूनच जगातील अत्यंत भव्य व दिव्य, लावण्यपूर्ण व हृदयंगम अशा वस्तू निर्माण झाल्या आहेत. लहान मूल खेळण्याशी खेळताना ज्याप्रमाणे रंगून जाते. त्याप्रमाणे हे साधे सरळ जीव वस्तुनिर्मितीत रंगून जात. काम हाच त्यांचा आनंद व  खेळ, मोठमोठी गोपूरे, मंदिरे, मोठमोठी भव्य लेणी, सुंदर चित्रे व रमणीय  मूर्ती, मोठमोठी शहरे व मोठमोठी राज्ये या वस्तू निर्माण करणार्‍यांना त्या  निर्माण करण्यात अपूर्व आनंद वाटत असतो. सूर्यप्रकाशात पाखरे उडतात व गाऊ लागतात. तितक्याच सहजतेने हे लोक त्या त्या प्रिय वस्तू आपल्या मनाच्या वस्तू घडवीत असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel