परंतु हे पहिले पाऊल टाकण्यापूर्वीही महत्त्वाचे काय व बिनमहत्त्वाचे काय, मुख्य काय व अमुख्य काय याची शहानिशा झाली पाहिजे. परकी संस्कृतीतील चांगले घ्यायचे, जे साररूप व प्राणमय आहे ते घ्यावयाचे व जे निस्सार आहे ते टाकावयाचे. परंतु या गोष्टीविषयी नीट स्वच्छ विचार झाला पाहिजे. अनावश्यक व आवश्यक उभय संस्कृतीत काय ते ठरले पाहिजे. नाहीतर सुक्याबरोबर ओलेही जळावयाचे, वाईटाबरोबर चांगले मारले जावयाचे. आपण नीट विचार न केला तर भलत्याच गोष्टींना महत्त्व दिले जाईल व महत्त्वाच्या गोष्टी कोपर्यातच राहातील, धोतर महत्त्वाचे वाटता विजारच महत्त्वाची वाटावयाची. एकदा बाह्य गोष्टी महत्त्वाचे नाहीत असे ठरले म्हणजे मग विजारही महत्त्वाची वाटावयास नको परंतु जसे पूर्वी खाणेपिणे व पेहराव यांना महत्त्व होते तेच पुन्हा आपण पाश्चिमात्य खाणेपिणे व पेहराव यांना दिले एवढेच होईल. म्हणजे पुन्हा आत्मा हा बाह्य गोष्टीतच रंगविला. जुन्या माणसास धोतर-पागोटे जेवढे प्रिय वा तेवढेच आपणास हॅट-बुट-कीट हे जर प्रिय वाटत असले तर विकास कोठे झाला? पुन्हा बाह्य गोष्टीतच जीव रंगविला. विवेकानंद कॉलेजमध्ये असताना एक दिवस बाराबंदी घालून जात, तर एके दिवसी सूटबूट करून जात एके दिवशी गुळगुळीत हजामत करीत, तर एके दिवशी भांग पाडून जात. त्यांना हेच दाखवावयाचे असे की, ह्या गोष्टींचा मी गुलाम नाही. डोक्यावरच केस-त्यांचा मी गुलाम नाही. त्यांना छाटीन वा वाढवीन मी धोतराचा गुलाम नाही वा विजारीचा नाही. म्हणून महत्त्वाचे काय ते आपण पाहिले पाहिजे. पाश्चिमात्यांचे कंगवे व सिगरेट यांना सिंहासन मिळावयाचे असेल तर साराच ग्रंथ आटोपला.
सर्व आचार व विचार यांच्या ज्या पध्दती असतात त्यांच्या मुळाशी शीलसंवर्धन हा हेतू असतो. चारित्र्यग्रथन, शीलसंवर्धन हे ध्येय आहे. मनुष्याला सुंदर सवयी लावून त्याचे चारित्र्य बनवावयाचे. सुंदर सवयी हे साधन व शीलसंवर्धन हे ध्येय. चारित्र्य हा हेतू मुख्य आहे, सवय ही दुय्यम गोष्ट आहे. हिंदुधर्मातील बाह्य आचारापेक्षा हिंदुधर्माची ध्येये फार थोर व उदात्त आहेत, हे कोणालाही नाकबूल करता येणार नाही. हिंदुस्थान हा एकच असा देश पृथ्वीच्या पाठीवर आहे की, जेथे अकिंचन निष्कांचन भिकार्याला सम्राटापेक्षा, राजेमहाराजे यांच्यापेक्षा अधिक मान दिला जातो. परंतु राजाही असावा जनकासारखा व भिकारी शुकदेवासारखा हे ध्येय त्याहूनही थोर आहे. भिकार्यालाही थोर होऊ दे. दोघांचे पोषाख निराळे परंतु दोघांचे ध्येय एकच-की नराचे नारायण होणे. देवो भूत्वा देव यजेत् पवित्र राजा पवित्र भिकार्याची पूजा करतो. तुम्ही कोणीही असा, शीलाचा शीतल व शांत चंद्र तुमच्या शिरावर शोभणारे तुम्ही चंद्रमोळी व्हा. शीलाचा जो विकास होत असतो त्यात सवयीला किती महत्व आहे. आचारांना किती महत्त्व आहे, ते तौलनिक पध्दतीने पाहू या. आपल्याही सवयी पाहू, पाश्चमात्त्यांच्याही पाहू. हिंदुस्थानात मनुष्य खाते काय, पितो काय, स्नानसंध्या करतो की नाही, तो कसे कसे राखतो, पोषाख कसा करतो तो प्रवास पायी करतो की कसा, प्रवासात कसा वागतो ह्या अशाच प्रकारच्या गोष्टीकडे समाजाचे डोळे असतात व ह्यांच्यावर समाजाची टीका सारखी चाललेली असते. तसेच विवाहाच्या किंवा शिक्षणाच्या इत्यादी महत्त्वाच्या बाबतीत जरा फेरफार करावयाचे म्हटले, नवीन प्रथा पाडावयाचे कोणी सुचविले, तर ते एकच हल्ला करून उठतील. ते संतापतील, घाबरतील. ''हे सारे अधार्मिक आहे, अपवित्र आहे, तुमचा काही तरी त्यात स्वार्थी हेतू आहे, कावा आहे'' असे म्हणतील. खेडयातील लोक शहरात जाऊ लागल्यापासून तर व्यक्तीवर या असल्या बाबतीत टीकेचा फारच ताशेरा उडतो व मोठा गहजब होतो. शहरात गेलेल्या मनुष्याला याची फार भीती वाटते. लहानशा समाजात वावरत असताना मनुष्याला धैर्याने बदल करता येतो; परंतु मोठ्या समाजात तो मिसळला म्हणजे '' आपणच कशाला नवीन प्रथा पाडा? आपण कोण?'' असे प्रत्येकाला वाटत असते. अशा वृत्तीच्या माणसाचे जमाव एकत्र वाढतात, परंतु त्यांचा दुबळेपणा तोही वाढीस लागतो. कोणालाच धैर्य नसल्यामुळे जे अर्धवट व दुबळे असेल त्यालाच सारे मान देतात. नवीन दृष्टी व नवीन विचार येण्यासाठी धैर्याने कोण उठणार? कोण बोलणार? '' आपण कशाला उठा? सारे काव काव करतील; जाऊ द्या, जे व्हावयाचे ते होईल'' अशी वृत्ती उराशी बाळगून सारे मढ्यांना कवटाळून बसतात.