३ पंथप्रियता
नाना पंथ अस्तित्वात आल्याने फार नुकसान होते अशी सर्वत्र ओरड ऐकू येते. परंतु असल्या ओरडीत सत्याचा अंश फारच थोडा असून अतिशयोक्तीचा भागच बराचसा असतो. पुष्कळ वेळा मनुष्य काही गोष्टी गृहीतच धरून चालतो. त्यासंबंधी तो कधी विचारच करीत नाही. वरच्या विधानासारखी विधाने अविवेकाने व मूर्खपणाने केली जातात. पंथांचा उपयोग होतो की दुरुपयोग होतो याचा काळजीपूर्वक विचार करावयास हवा, पूर्वग्रह सोडून शांतपणे सत्य काय ते शोधून पाहावयास हवे.
क्षूद्र गोष्टीसच नुसते महत्व देऊन त्यासंबंधी काथ्याकूट करणे व रणे माजवणे ही प्रवृत्ती त्याज्याच होय यात बिलकूल संशय नाही. असल्या हलकट वृत्तीमुळे, उथळ वृत्तीमुळे, भांडणे माजतात व मत्सरास ऊत येतो. कलीने एकदा प्रवेश केला की, बारीकशा कारणासाठी वाट पाहणारा, निमित्तावरच टेकलेला, असा जो समाज, त्याचे तुकडे पडण्यास उशीर लागत नाही. असला प्रकार खोडसाळ व निंद्य आहे याबदल दुमत नाही, वाद नाही. पंथासाठी केवळ पंथाभिमान, माझाच पंथ खरा, इतर सारे खोटे, असला दुरभिमान यांची जर पंथासाठी आवश्यकता असेल, अशा वृत्तीची जर कोणत्या पंथास जरूर भासत असेल, तर मात्र तो पंथ मृत्युपंथासच लागलेला बरा. आपले अहंपूर्ण पंथ म्हणजे प्लेगचे जंतूच ते. असेल विषारी प्राण घेणारे जंतू कोणत्याही सबबीवर अस्तित्वात येता कामा नयेत. परंतु पंथ म्हटला म्हणजे भांडणतंटे, खोटा अभिमान एवढाच अर्थ का? पंथाने भांडणे माजवावी हाच एक पंथाचा उद्देश असतो का? पंथांनी जगात भेदभावच माजवले? मत्सरच माजवले? याहून अन्य काहीच त्यांनी केले नाही का? पंथांच्या नावावर काही चांगल्या गोष्टी नमूद आहेत की नाहीत? काही हित, मंगल त्यांच्या नावे जमा आहे की नाही?
नवीन पंथ अस्तित्वात का येतो, भांडणासाठी खात्रीने नाही. तोडण्यासाठी नसून जोडण्यासाठी पंथ जन्माला येत असतो. एका ध्येयाच्या झेंडयाखाली, एका सत्याच्या सेवेसाठी, त्या ध्येयावर व त्या सत्यावर ज्यांची श्रध्दा असेल, सत्यरुप परमेश्वराची त्या विशिष्ट सत्यानेच ज्यांना पूजा करावयाची असेल, त्यांची ही पूजा यथासांग व संपूर्णपणे पार पाडावी यासाठी ग्रंथ प्रकट होत असतो. पंथ सहकार्य व सद्भाव शिकवतो. पंथ याची व्याख्याच करावयाची झाली तर 'श्रध्दावान जिवांचा संघ' अशी करता येईल. अशी व्याख्या प्राचीन काळीच करण्यात आलेली होती. या विशाल अर्थाने पंथाकडे बघा, ''स्वेच्छेने व श्रध्देने एका ध्येयासाठी किंवा एखाद्या विशिष्टगोष्टीचा अभ्यास करण्यासाठी एकत्र आलेल्या मंडळींचा समुदाय'' त्याला पंथ असे म्हणता येईल. वैद्यकशास्त्र मंडळ, इतिहास संशोधक मंडळ, आरोग्य मंडळ, जीवदयाप्रसारक मंडळ ही सारी मंडळे म्हणजे एक प्रकारचे धर्मपंथच होत. ही मंडळे संघही आहेत व धर्मपंथही आहेत. काही लोक एकत्र. आले महणून त्यास संघ म्हणता येईल, एका ध्येयाने प्रेरित होऊन श्रध्देने एकत्र आले म्हणून त्यांना धर्मपंथ असेही म्हणता येईल. अशा दृष्टीनेपंथाकडे पाहिले म्हणजे पंथ हा एकत्र आणणारा, विखुरलेल्या फुलांना एकत्र गुंफून हार करणारा, ऐक्यावर जीव देणारा आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही. पंथ म्हणजे घटना आहे, विघटना नाही, बंधुभाव आहे, वैरभाव नाही, प्रेम आहे विरोध नाही.