आपले सर्व व्यवहार, आपल्या सर्व क्रिया प्रथम आपल्या वासनांतूनच निर्माण होत असतात. आपल्या वासनांनीच आपल्या वृत्ती बनू लागतात,  त्या वाढू लागतात. परंतु मागून कळू लागते की, वासना म्हणजे विकार आहे. एक प्रकारचा रोग आहे; या रोगातून आपण मुक्त झालेच पाहिजे.  आपल्या लहरींच्याताब्यात जाणे, आपल्या वासना अत्यंत प्रबळ होऊ देणे म्हणज स्वातंत्र्य नव्हे. आपल्या वासनांतील सद्वासना कोणत्या हे शोधून काढले पाहिजे. कुवासनांचे अत्यंत सूक्ष्म परंतु बळकट असे बंध आपणास जखडून टाकीत असतात. या वासनांच्या हातातील खेळणे होणे हे फार भयंकर आहे; ही गोष्ट घातुक आहे, मारक आहे. शारीरीक व मानसिक,  बाहय व आंतरिक, स्थूल व सूक्ष्म, सर्व प्रकारच्या वासना व आसक्ती  झडझडून फेकून दिल्याशिवाय आपले सत्य स्वरूप आपणांस कळत नसते. तोपर्यंत शुची निश्चय होत नाही. खरे स्वातंत्र्य लाभ नाही. 

ज्याला अंतरात्म्याच्या अमृत क्षेत्रात हे दिव्य, स्वर्गीय स्वातंत्र्य लाभते  त्याचे जीवन खरोखर किती विशाल, किती शांत, किती स्थिर, किती  अनुपम आनंदमय, किती वैभवशाली! तेथील ज्ञानप्रकाश कधी मावळत नाही, तेथे अखंड शांती, अखंड आनंद व अखंड प्रकाश भरून असतात.  मुक्त पुरुषाला, जो खरोखर स्वतंत्र झाला त्याला या दिव्य संपत्तीचा वारसा मिळत असतो. अखंड चिन्मयत्वाचे छत्र त्याच्यावर झळकत राहाते. हे  महान जीवन एकदा लाभले महणजे मग ते सार्‍या गोष्टीत प्रकट होते तुम्ही  काही करा, त्यात ते दिव्यत्व प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. मुक्त पुरुषालाच मुक्तीचा अर्थ कळतो. आपला स्वतंत्रपणा कसा कोठे दाखवावा,  हे तोच जाणतो मुक्त पुरुषाचे कर्म, प्रभावशाली व प्राणमय असू शकते त्याला स्वत:चा दुबळेपणा उरत नाही व दुसर्‍याचे हेडेलहप्पी व दडपेगिरी तो चालू देत नाही. मुक्त, स्वतंत्र! होय, मुक्ती हेच आत्म्याचं अंतिम प्राप्तव्य. मुक्ति-खरे स्वातंत्र; तेथे रात्र नाही, अंधार नाही, संशय नाही,  दुबळेपणा नाही. पूर्ण मोकळा प्रकाश! अधिक नाही कमी नाही! विश्वातील कानाकोपर्‍यातही अलोट प्रकाश! अशा त्या प्रकाशाचे वर्णन करावयास  जाल तर वाणी लटपटेल, कल्पना मान मुरडील, 'नेति' 'नेति' असेच  म्हणत बसावे लागेल!

आज्ञा पाळणे, हुकुमाप्रमाणे वागणे, मरणाच्या तोंडात उडी घेणे, हीच शिपायाची प्रार्थना. विश्रांतीच्या वेळी जप नको व कर्माच्या वेळी निद्रा नको. योग्य कर्म न करणे यात हानी आहे; तो मोहच आहे मोह वाईटाचाच असतो असे नाही. तर चांगल्याचाही मोह असतो. दिवसभर कार्ममय जप झाल्यावर रात्री निजावयाचे वेळेस माळा ओढीत बसणे हे योग्य नव्हे. अशाने पुण्य मिळत नसते. आई मुलाला सांगते, ''जा, बाहेर खेळावयास जा...'' त्या वेळेला आईला सोडून, आईला विसरून, एकदम बाहेर खेळावयास जाणारे मूल ते आनंदी सूर्यकिरणाप्रमाणे सुदंर हंसरे मूल. त्या मुलाजवळ खरी मातृभक्ती आहे. तुमच्या शेकडो नमस्कारांपेक्षा व प्रदक्षिणांपेक्षा त्या मुलाची ती बाहेर जाण्यात असणारी, आईला विसरण्यात  असणारी भक्ती थोर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel