प्रश्न --शिक्षण व ज्ञान हे अडथळे आहेत असे मला तुमच्या शिकवणुकीतून आढळून आले आहे .ते कशाला अडथळे आहेत ?
उत्तर--नवीन कालरहित व अंतीम अशा वस्तूच्या समजाला ज्ञान व शिक्षण हे अडथळे आहेत .एखादे तंत्र परिणितावस्थेला नेण्यातून तुम्ही सृजननशील बनत नाही .तुम्ही उत्कृष्ट रंगकाम कसे करावे ते शिकाल परंतु या तंत्रामधून तुम्ही सृजनशील चित्रकार कसे बनावे ते शिकू शकत नाही.उत्कृष्ट कविता कशा लिहाव्या यातील तंत्र तुम्हाला माहित असेल परंतु तुम्ही सृजनशील कविता लिहू शकत नाही .उत्कृष्ट काव्याचे सृजन तुम्ही करू शकत नाही.कवि असणे यांत एक गर्भितार्थ आहे. तो नाही काय?तुम्ही नाविन्याचे ग्रहण करण्यासाठी समर्थ असले पाहिजे .काही तरी नवीन असलेल्याला तुमचा जबाब संवेदनाक्षम असला पाहिजे .हा गर्भितार्थ कवि असण्यामध्ये नाही काय?आपल्यापैकी बऱ्याच जणांना ज्ञान व शिक्षण याचे व्यसन लागले आहे .त्याची आपल्याला चटक लागली आहे .आपल्याला असे वाटते कि या ज्ञानसंग्रहातून या शिक्षणातून आपण सृजनशील बनू .जे मन निरनिराळ्या गोष्टींनी खच्चून भरलेले आहे,ज्ञानाने व्यापलेले आहे, असे मन तत्काळतेचे स्वयंभूततेचे ग्रहण करण्यास समर्थ आहे काय?जर तुमचे मन ज्ञाताने खच्चून भरलेले असेल तर ते अज्ञाताचे ग्रहण कसे काय करू शकेल ? ज्ञान हे फक्त ज्ञाताबदलचे असते.या ज्ञाताच्या साहाय्याने अापण अज्ञात समजण्याचा प्रयत्न करीत असतो.जे काहीतरी समजण्याच्या पलीकडचे आहे ते समजण्याचा प्रयत्न करीत असतो.
उदाहरणार्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडणारी गोष्ट घेऊ या .जे धार्मिक आहेत या शब्दाचा अर्थ तुम्हाला जो काही घ्यावयाचा असेल तो घ्या, ते नेहमी परमेश्वर कसा आहे याबद्दल विचार करीत कल्पना लढवीत असतात, किंवा परमेश्वर कसा आहे याबद्दल या लोकांनी असंख्य पुस्तके वाचलेली असतात,असंख्य प्रवचने ऐकलेली असतात.त्यांनी निरनिराळ्या संत महात्म्यांचे अनुभव वाचलेले असतात वगैरे वगैरे.आता ते परमेश्वर कसा आहे त्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतात .किंवा जो अनुभव इतरांचा आहे तो स्वत:ला यावा यासाठी प्रयत्न करतात.ज्ञातातून ते अज्ञात शोधू पाहतात ,ज्ञातातून अज्ञात शोधणे कधीतरी शक्य आहे काय? जे तुम्हाला माहित नाही त्याबद्दल ते वस्तुत: जसे आहे त्याची बरोबर कल्पना करता येईल काय?तुम्ही ज्ञाताबद्दलचा विचार करू शकता .तुम्ही परमेश्वराबद्दल जो काही आराखडा काढाल तो ज्ञातावर आधारित असेल. हे असामान्य स्खलन जगात सर्वत्र चालू आहे .जास्त माहितीतून जास्त समजेल असे आपल्याला वाटते मग काय वाचा जास्त पुस्तके !!
"मी" ज्ञातोत्पन्न नाही अशा स्थितीबद्दल जागृत असण्यासाठी, प्रथम ज्ञाताचे, ज्ञातप्रक्रिया समजातून उच्चाटन झाले पाहिजे.हे आपले मन सारखे ज्ञाताला जळू सारखे चिपकून का बरे बसलेले असते?मन सतत सुरक्षिततेचा अभयत्वाचा शोध घेत असते .हेच त्याचे कारण नाही काय?मनाची प्रकृतीच मुळी ज्ञातात कालात रुपलेली आहे .ज्याचा काल हा पाया आहे असे मनोवृत्तीच्या कालरहिताचा कसा काय शोध घेवू शकेल ?ते अज्ञाताची कल्पना करू शकेल, त्याचे चित्र रेखाटू शकेल, परंतु हा सर्व गाढवपणा आहे. ज्ञाताच्या संपूर्ण समजातून ज्ञात वितळविले जाईल आणि तेव्हाच अज्ञात प्रगट होईल.ही अत्यंत बिकट गोष्ट आहे.ज्या क्षणी तुम्हाला एखादा अनुभव येतो, त्याच क्षणी मन त्याचे ज्ञातामध्ये भाषांतर करते.अशा प्रकारे तो अनुभव भूतामध्ये जमा होतो.प्रत्येक अनुभव हा ज्ञातामध्ये भाषांतरित केला जातो. त्याला नाव दिले जाते.त्याचे वर्गीकरण केले जाते.नंतर संस्कारीकरण केले जाते.हे आपल्या लक्षात आले आहे किंवा नाही ते मला माहीत नाही.अशा प्रकारे ज्ञाताची हालचाल म्हणजे ज्ञान होय.अर्थातच असे ज्ञान व शिक्षण हा अडथळा आहे .
अापण अशी कल्पना करू या कि तुम्ही कधीही धर्म तत्वज्ञान किंवा मानसशास्र यावरील एकही पुस्तक वाचलेले नाही .आता तुम्हाला जीवनाचा अर्थ जाणून घ्यावयाचा आहे. तुम्ही कशी काय सुरुवात कराल ? कुठचाही धर्म, कुठचाही गुरू, बुद्ध ख्रिस्त वगैरे प्रेषिताची शिकवण,कुठलेही पुस्तक, अस्तित्वात नाही.अर्थातच तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल .तुम्ही कशी काय सुरुवात कराल ?प्रथम तुम्हाला आपली विचार प्रक्रिया समजून घेतली पाहिजे .ती तुम्हाला समजून घेणे आवश्यक नाही काय ?दुसरे तुम्ही काय करू शकता ?त्याचप्रमाणे तुम्ही आपले विचार कल्पना यांच्या आधारे ,एखादा परमेश्वर निर्माण करता कामा नये. कारण तसे तुम्ही केले तर ते अत्यंत बालिश होईल.आता तुमच्या जवळ एकच मार्ग आहे एकच साधन आहे .ते म्हणजे स्वतःची विचार प्रक्रिया समजून घेणे हा होय. फक्त हाच मार्ग काही नवीन शोधू शकेल .दुसरा कुठला मार्ग आहे काय ?
जेव्हा आपण ज्ञान व शिक्षण हा अडथळा आहे असे म्हणतो तेव्हा सर्व प्रकारचे तांत्रिक ज्ञान उदाहरणार्थ विमान मोटार कशी चालवावी यंत्रावर कसे काम करावे इत्यादी व त्यापासून निर्माण होणारी कार्यक्षमता अर्थातच आम्हाला अभिप्रेत नाही .आमच्या मनात सर्वस्वी एक वेगळी गोष्ट आहे, जी कितीही शिक्षण व ज्ञान यातून मिळणार नाही,येणार नाही, अशी सृजनशील आनंदाची जाणीव आमच्या मनात आहे .प्रतिक्षणी भूतापासून स्वतंत्र असणे,कारण या भूताची सदैव वर्तमानावर सावली पडलेली असते, म्हणजेच सृजनशील असणे होय .भूत गेले कि फक्त वर्तमानच उरते . माहितीला जळू सारखे सतत चिकटून बसणे, इतरांच्या अनुभवाला सतत घट्ट धरून बसणे ,इतरांच्या सांगण्याला प्रमाणभूत मानणे,व, अशाप्रकारे स्वतः त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणे ,म्हणजेच ज्ञान होय .ज्ञान ज्ञान ते हेच नव्हे काय?नवीन काही शोधून काढण्यासाठी तुम्ही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे .या प्रवासात तुम्हाला तथाकथित ज्ञानाचा वासवारासुद्धा लागता कामा नये.कारण ज्ञान व श्रद्धा यातून काही अनुभव येणे फार सोपे आहे.असले अनुभव केवळ स्वरचित असतात . त्यामुळे ते सर्वस्वी असत्य व फसवे असतात."नवे" तुमचे तुम्हालाच शोधून काढले पाहिजे .या प्रवासात इतर जणांचे अनुभव व लिखाण हे अडथळे आहेत .त्यामुळे हे भूत-ज्ञानाचे ओझे प्रवासात वागवणे हे मूर्खपणाचे आहे.मग ते ज्ञान तो अनुभव कितीही मोठ्या व्यक्तीचा असो .तुम्ही हे ज्ञान स्वसंरक्षणासाठी वापरता .तुम्हाला खात्री करून घ्यावयाची असते कि तुम्ही योग्य मार्गाने जात आहात .तुमचे मन सुरक्षितता शोधीत असते .तुम्हाला आलेले अनुभव बुद्ध ख्रिस्त किंवा क्ष ज्ञ याप्रमाणेच आहेत ना हे तुम्हाला ताडून पाहावयाचे असते.परंतु जो मनुष्य स्वतःला ज्ञानातून सुरक्षित करू पाहात आहे तो खऱ्या अर्थाने सत्यशोधकच नाही.
सत्याच्या शोधासाठी मार्ग नाही.या सागरात तुम्हाला आधाराशिवायच मार्गाशिवायच प्रवेश केला पाहिजे.यात धाडसही नाही किंवा दबून जाण्यासारखेही काही नाही.जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन शोधून काढावयाचे असेल,जेव्हा तुमचे मन प्रयोग करीत असेल,तेव्हा तुमचे मन अत्यंत स्तब्ध पाहिजे. ते तसे नको क़ाय?जर तुमचे मन ज्ञान माहिती इत्यादिकानी भरलेले असेल, तर या सर्वांचा "नव्याला" अडथळा होतो.आपल्यापैकी बहुतेक जणांची अडचण अशी आहे कि मन हे आपल्याला इतके महत्त्वाचे ठरले आहे कि काहीही जे कदाचित नवे असू शकेल, व जे या ज्ञानाबरोबर एकत्रित कदाचित राहू शकेल, त्याच्यामध्ये हे मन अडमडते. त्यामुळे समज अशक्य होते.अशा प्रकारे ज्यांना कालरहिताचा शोध घ्यावयाचा आहे ,ज्यांना कालरहित समजून घ्यावयाचे आहे,त्यांना वर वर्णन केल्याप्रकारचे ज्ञान व शिक्षण हे अडथळे आहेत.