मी जेव्हा तुमचे भाषण ऐकतो तेव्हा सर्व काही स्पष्ट झाल्यासारखे वाटते .घरी गेल्यावर पुन्हा जुनाटपणा व अस्वस्थपणा यांनी मी भरून जातो.माझ्यात काही दोष आहे का ?

उत्तर--आपल्या आयुष्यात नेहमी काय घडत आहे ?नेहमी आव्हान व जबाब याशिवाय दुसरे आयुष्यात काय आहे ?हेच जीवन . हेच अस्तित्व . सतत क्रिया व प्रतिक्रिया म्हणजे अस्तित्व नाही काय ?आव्हान नेहमी नवीन असते व जबाब मात्र नेहमी जुनाट असतो .मी तुम्हाला काल भेटलो आणि आज तुम्ही पुनः  माझ्याकडे आले आहात . तुम्ही मला वास्तविक  नवीन आहात.तुम्ही बदललेले आहात तुमच्यात काहीतरी बदल झालेला आहे .तुम्ही गेल्या दिवशी जसे होता त्याचा ,माझ्या समजुतीप्रमाणे, माझ्याजवळ ठसा आहे .मी तुम्हाला ताजेपणाने भेटू शकत नाही .अशा प्रकारे नवे जुन्यांमध्ये शोषून घेतले जाते .माझ्याजवळ तुमचे कालचेच चित्र आहे.  

आणि म्हणूनच माझा जबाब आकारित आहे .याक्षणी  तुम्ही कोण आहात ,ब्राह्मण श्रेष्ठवर्णीय हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख बौद्ध  ते तुम्ही विसरता. तुम्ही फक्त ऐकत असता.तुम्ही गुंगलेले असता.तुम्ही उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न करीत असता.तुम्ही पुनः जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनक्रमात जाता ,त्या वेळेला तुम्हाला तुमच्या तुमच्या धारणा पुनः  वेढून टाकतात.तुमची जात तुमच्या प्रणाल्या तुमचे कुटुंब यात तुम्ही पुन: प्रवेश करता.दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे नेहमी नवे जुन्यांमध्ये शोषून घेतले जाते .जुन्या सवयी जुन्या समजुती जुन्या कल्पना जुन्या परंपरा जुन्या आठवणी यात सर्व नवीन शोषले जाते. तुम्हाला नाविन्य कुठेही आढळत नाही कारण तुम्ही जुन्याच चष्म्यातून नव्याकडे पाहात असता .आव्हान नवीन आहे परंतु तुमची दृष्टी मात्र जुनाट विकृत आहे .या प्रश्नातील समस्या अशी आहे .विचाराला या जुन्यातून मुक्त कसे काय करावे ?नंतर फक्त नित्य नाविन्यच असेल.जेव्हा तुम्ही एखादे फूल पाहता,जेव्हा तुम्ही एखादा चेहरा पाहता, जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, जेव्हा वृक्ष  निर्झर पक्षी हास्य अश्रू यांच्याकडे पाहता, तेव्हा या सर्वांकडे नाविन्याने कसे पाहावे ?या सर्वांना नवीन पणाने ताजेपणाने कसे भेटावे ?आपण नेहमी नवीन पणाने भेटू का शकत नाही?नेहमी या नाविन्याचे या जुन्याकडून शोषण का केले जाते ? जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा येथे वाटणारा ताजेपणा  पुनः  नष्ट का होतो ?

जुना जबाब हा विचार करणाऱ्यापासून उद्भवतो . विचार करणारा हा नेहमीच जुना नसतो काय?तो जुन्यातून उत्पन्न झालेला असतो .जेव्हा तुम्हाला नवीन भेटते त्यावेळी वस्तुत: हा विचार करणारा भेटत असतो. गेला दिवस नाविन्याला भेटत असतो .विचार करणारा हा नेहमीच जुनाट असतो .अशाप्रकारे आपण पुनः  त्याच समस्येकडे दुसऱ्या बाजूने येऊन पोचतो .मनाला विचार करणारा या दृष्टीने विचार करणाऱ्यापासून कसे काय मुक्त होता येईल ?हे स्मरण कसे काय उपटून फेकून द्यावे . अर्थात भौतिक स्मरण नव्हे तर मानसिक स्मरण म्हणजेच अनुभव संग्रह कसा काय नष्ट करावा ?या अनुभव संचित संग्रहापासून स्वतंत्र झाल्याशिवाय,आपल्याला नाविन्याचे स्वागत करता येणार नाही.विचार मुक्त करणे,विचार प्रक्रियेपासून स्वतंत्रता प्राप्त होणे, प्रतिक्षणी नाविन्य भोजन करणे, हे फार कठीण आहे.ते कठीण नाही काय ?आपल्या सर्व श्रद्धा, आपल्या सर्व परंपरा, आपल्या सर्व शिक्षण पद्धती, म्हणजे  स्मरण नक्कल प्रक्रिया आहे.स्मरण संग्रहाची डागडुजी करणे,मजबुती करणे, आणि त्यात वाढ करणे, या शिवाय त्यात दुसरे काय आहे ?हे स्मरण सातत्याने नाविन्याला ओ देत असते.या ओ देण्याला आपण विचार असे म्हणतो . ही विचारप्रक्रिया नाविन्याला भेटत असते .अशा परिस्थितीमध्ये नवीन ,नवीन कसे काय राहणार ?जेव्हा हा स्मरण अवशेषरूपी गाळ नसतो तेव्हा नवीन असू शकेल. जोपर्यंत अनुभव संपलेला नाही, अऩुभव शेवटाला आलेला नाहीं, म्हणजेच अनुभव अपूर्ण आहे, तोपर्यंत हा स्मरण गाळ असणे अपरिहार्य आहे.जेव्हा अनुभव संपूर्ण असतो तेव्हा त्याचा ठसा मागे रहात नाही .आणि जीवनाचे सौंदर्य त्यातच आहे .प्रेम हा ठसा नाही.ती एक स्थिती आहे. प्रेम अंतिम नवे आहे .प्रेम हा अनुभवाचा शिल्लक रहालेला अवशेष नाहीं .तेव्हा आपली समस्या अशी आहे की एखादा, घरी सुद्धा जीवनाला नाविन्याने कसा काय भेटू शकेल.?अर्थात मी ठामपणे सांगतो की नक्की भेटू शकेल .हे होण्यासाठी अनुभवात,विचारात,भावनेत, क्रांती झाली पाहिजे .प्रत्येक घटनेचा विचार हा त्या त्या क्षणी  होऊन गेला पाहिजे .जेव्हा प्रत्येक जबाब हा त्या त्या वेळी पूर्णपणे समजला जातो,एकदा त्याच्याकडे पाहून दूर सारला जात नाही,तेव्हा हे होते .जेव्हा प्रत्येक विचार प्रत्येक भावना ही पूर्ण झालेली असते,त्या त्या क्षणी संपूर्ण समज आलेली असते,तेव्हा स्मरण संग्रह प्रवृत्तीपासून स्वातंत्र्य प्राप्त होते.दुसर्‍या  शब्दात सांगावयाचे म्हणजे जेव्हा प्रत्येक विचार प्रत्येक भावना  ही विचार करून संपवलेली असते,त्याचा शेवट केलेला असतो,तेव्हा त्या विचाराला शेवट असतो .हा शेवट व दुसरा विचार यांमध्ये थोडीशी फट असते .त्या दोन विचारांमधील शांततेत पुनर्जन्म असतो. नाविन्य असते.सृजनशीलता असते .

ही एक प्रणाली नव्हे . ही अशक्य गोष्ट नाही .जर तुम्ही प्रत्येक विचार प्रत्येक भावना विचार करून संपविण्याचा प्रयत्न केलात,तर जीवनात ही गोष्ट सहज सतत अखंड करता येण्यासारखी आहे, असे आपल्याला निश्चित आढळून येईल .मग तुम्ही प्रतिक्षणी नवीन असता व नवीन हेच फक्त नित्य  टिकणारे आहे.नवीन असणे म्हणजेच सृजनशील असणे होय .सृजनशीलता म्हणजे आनंदी असणे .स्वत: श्रीमंत आहे की गरीब आहे, समाजातल्या कुठच्या थरात व कुठच्या पातळीवर आहे, कुठल्या देशात, कुठल्या धर्मात, व कुठल्या जातीत, आहे याच्याशी आनंदी माणसाला काहीही कर्तव्य नसते .तो फक्त असतो व आनंदी असतो.त्याला कुणी पुढारी नसतो.त्याला कोणता देव नसतो.त्याला कुठचे देऊळ नसते.त्याला कुठचा धर्म नसतो.त्याला कुठचे चर्च किंवा मशीद नसते.आणि म्हणून त्याचे कोणाशीही भांडण नसते .त्याच्याजवळ विरोध नसतो. तो कुणाचा शत्रू नसतो .

चालू जगातील गोंधळात आपल्या सर्व अडचणी सोडवण्याचा हाच एक मार्ग आहे .आपण सृजनशील नसल्यामुळे, कृपाकरून मी हा शब्द कोणत्या अर्थाने वापरीत आहे ते लक्षात घ्या,अापण जाणिवेच्या निरनिराळ्या पातळ्यांवर प्रचंड समाज विघातक आहोत.सामाजिक संबंधरूपतेत व्यवहार्य व परिणामकारक असण्यासाठी आपण आनंदी असले पाहिजे .जर सतत शेवट नसेल तर आनंद असणार नाही . जर बनणे प्रक्रिया कार्यरत असेल तर आनंद असणार नाही.शेवटा मध्ये क्षणाक्षणाच्या मृत्यूमध्ये पुनर्जन्म नाविन्य ताजेपणा आनंद व अमृतत्व आहे.

जोपर्यंत पार्श्वभूमी आहे जोपर्यंत विचार करणारा  हा विचारांनी आकारित आहे तोपर्यंत जुने नवे शोषून घेणार .अशाप्रकारे जुन्याकडून नव्याचा सतत नाश होत राहणार .पार्श्वभूमी आकारित प्रतिक्रिया प्रक्रियेपासून, स्मरणा पासून स्वतंत्र होण्यासाठी सातत्यापासून स्वातंत्र्य पाहिजे.विचार व भावना यांचा संपूर्ण नाश झाला नाही तोपर्यंत सातत्य आहे .जेव्हा एखाद्या विचाराचा आपण त्याचा शेवट होईपर्यंत पाठलाग करतो तेव्हा तो विचार पूर्णपणे संपविला जातो.अशा प्रकारे प्रत्येक विचार प्रत्येक भावना यांचा तुम्ही शेवट करता .प्रेम ही सवय नाही किंवा ते स्मरणही नाही .ते नित्य नवे आहे .जेव्हा मन ताजेतवाने असेल तेव्हाच आपण नव्याला भेटू शकू .मन जोपर्यंत या स्मरण अवशेषांपासून मुक्त झाले नाही तोपर्यंत ताजेपणा अशक्य आहे. स्मरण हे भौतिक व मानसिक दोन प्रकारचे असते .मी भौतिक स्मरणाबद्दल बोलत नाही तर मानसिक स्मरणाबद्दल बोलत आहे.जोपर्यंत अनुभव समज यथार्थ व  संपूर्ण आली नाही तोपर्यंत अवशेष शिल्लक राहणार. हेच जुने,हेच भूत,हाच गेला दिवस, हीच ती वास्तविक मृत परंतु जिवंत होणारी वस्तू, की जी नव्याला शोषून घेते  व अशा प्रकारे त्याचा नाश करते .जेव्हा मन जुन्यापासून भूतापासून स्वतंत्र असते तेंव्हा व तेव्हाच ते नाविन्याने जीवनाला भेटू शकते व त्यातच आनंद असतो.

++++++++++++++++++ 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel