प्रश्न --परमेश्वराच्या इच्छेला शरण जाणे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जे काही आहे त्याला शरण जाणे यात काय फरक आहे ?
उत्तर--या दोघांमध्ये फार फरक आहे. तो तसा नाही काय ?परमेश्वराच्या इच्छेला शरण जाणे, यामध्ये तुम्ही ती इच्छा काय आहे ते अगोदर ओळखता असा अर्थ अभिप्रेत आहे.म्हणजेच तुम्ही जे काही माहित आहे त्याला शरण जात आहात .तुम्ही जे काही जाणत नाही त्याला शरण जात नाही. असा अर्थ स्वाभाविक आहे . जर तुम्ही सत्य ओळखत असाल तर त्याला शरण जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .तुमचे अस्तित्वच नष्ट होते .उच्च अशा इच्छेला (सत्याला)शरण जाता येत नाही .जर तुम्ही उच्च अशा इच्छेला शरण जात असाल तर तो तुम्ही काढलेला आराखडा आहे .सत्य हे ज्ञातातून ज्ञात करून घेता येण्यासारखे नाही .जेव्हा ज्ञात असण्याचे थांबते तेव्हाच ते प्रगट होते . ज्ञात हे मनाचे अपत्य आहे .विचार हा ज्ञाताचा परिणाम असतो.विचार भूतकालावर आधारित असतो .विचार फक्त जे काही ज्ञात आहे त्याचीच निर्मिती करू शकतो.आणि म्हणूनच विचार जे जाणतो ते सत्य नसते .परमेश्वराच्या इच्छेला जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा तुम्ही स्वरचिताला शरण जात असता. त्यातून संतोष व समाधान तुम्हाला कदाचित प्राप्त होत असेल, परंतु ते फसवे आहे असे मला वाटते .
जे काही आहे ते समजण्यासाठी एक वेगळीच प्रक्रिया लागते .कदाचित प्रक्रिया हा शब्द बरोबर नसेल.
परंतु माझ्या म्हणण्याचा आशय असा आहे की जे काही आहे ते समजण्याला कठीण आहे .त्यासाठी फार शुद्ध बुद्धी लागते. फार जास्त जागृतता लागते .एखादी कल्पना मान्य करणे, स्वतः तिचा गुलाम बनणे, याहून हे फार वेगळे आहे .जे आहे ते समजण्यासाठी प्रयत्न लागत नाहीत .उलट इथे प्रयत्न मारक ठरतात .प्रयत्न म्हणजे फरफट आहे .विद्रुपता आहे .जर आपल्याला काही समजून घ्यायचे असेल, जर आपल्याला जे काही आहे ते समजून घ्यायचे असेल ,तर फरफट होऊन कसे चालेल ?तुम्ही जे काही म्हणत आहात ते मला समजून घयायचे असेल तर बाहेर चाललेल्या गायनाकडे किंवा इतर गडबडी कडे मला लक्ष देऊन चालणार नाही .मला सर्व लक्ष तुमच्याकडे दिले पाहिजे. तरच तुम्ही काय म्हणत आहात ते मी समजून घेऊ शकेन.आपली विचारप्रक्रिया हीच एक फरफट आहे .आपल्याला जे काही आहे ते समजून घेण्याची इच्छाच नसते .जे काही आहे त्याच्याकडे आपण पूर्वग्रह समर्थन धि:कार स्वीकार तुलना ओळख यांचे चष्मे लावून बघत असतो .हे चष्मे टाकून प्रत्यक्ष जे काही आहे त्याकडे बघणे फार कठीण आहे .
वास्तविक जे काही आहे ते तेच आहे .तीच वस्तुस्थिती आहे .तेच सत्य आहे .आणि उरलेल्या सर्व पळवाटा आहेत .उरलेले सर्व असत्य आहे .जे आहे ते समजण्यासाठी विरोध संपुष्टात आला पाहिजे .जे काही आपण आहोत, त्यापासून दुसरे बनण्यासाठी चाललेली धडपडरूपी प्रतिक्रिया,म्हणजे जे काही आहे त्याला समजण्यासाठी दिलेला नकार होय .जर मला औध्दत्य समजून घ्यावयाचे असेल तर त्याच्या विरुद्ध जे काही आहे ते बनण्यासाठी मी प्रयत्न करता कामा नये .इतकेच नव्हे तर जे काही आहे ते समजून घेण्याचाही प्रयत्नहि मी करता कामा नये.कारण जे काही आहे ते आहे व उरलेली सर्व फरफट आहे .जर मी उद्धट असेन तर काय होते?जर मी त्याला उध्दटपणा असे नाव दिले नाही तर तो उद्धटपणा असण्याचे थांबतो.म्हणजेच समस्येतच त्याचे उत्तर असते दूर कुठेतरी नव्हे.
जे काही आहे त्याचा स्वीकार करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो .जे आहे ते आहे असे तुम्हाला निश्चित पटेल तर त्याचा स्वीकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .तुम्ही काळे आहात, तुम्ही गोरे आहात ,तुम्ही हिंदुस्थानी आहात ,तुम्ही अमेरिकन आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही स्त्री आहात, याचा तुम्ही स्वीकार करीत नाही .जेव्हा तुम्ही जे काही आहा त्याहून वेगळे बनण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हाच स्वीकार करण्याचा प्रश्न निर्माण होतो .ज्याक्षणी तुम्ही एखादी गोष्ट वस्तुस्थिती म्हणून ओळखता तेव्हाच त्याचा स्वाभाविक स्वीकार होतो .परंतु जे मन भूत किंवा भविष्याचा विचार करण्याला शिकले आहे, अनेक दिशांनी धावायला शिकले आहे , असे मन जे काही आहे ते समजण्याला असमर्थ असते.जे आहे त्याच्या समजाशिवाय सत्य प्रगट होणार नाही .सत्य ज्ञानाशिवाय जीवनाला अर्थ नाही .त्याशिवाय जीवन म्हणजे जिथे सतत दुःख व क्लेश आहेत असे एक केवळ युद्धच होऊन बसते .सत्य फक्त जे काही आहे त्याच्या समजातूनच अस्तित्वात येईल .धि:कार किंवा समर्थन असेल तर ते समजणार नाही. जे मन सतत धि:कार किंवा समर्थन करीत आहे त्या मनाला समज अशक्य आहे .ते मन फक्त ज्याच्यात पकडले गेले आहे तेवढेच समजू शकेल .जे आहे ते समजणे त्याबद्दल जागृत असणे यातून असामान्य (मानसिक) खोलीचा साक्षात्कार होतो .त्यातच सत्य व आनंद असतो .
++++++++++++++++++