प्रश्न --एखाद्या भावनेबद्दल तिला नाव दिल्याशिवाय जागृत असणे कसे काय शक्य आहे ?मी जर एखाद्या भावनेबद्दल जागृत असलो तर ती भावना जागृत झाल्याबरोबर मला ती लक्षात येते .तिचे नाव आपोआप लक्षात येते .आपण नामकरण करू नका असे म्हणता  तेव्हा आपल्याला सर्वस्वी काही वेगळेच अभिप्रेत  आहे काय ?

उत्तर--आपण एखाद्याला नाव कां बरे देतो? एखादे फूल व्यक्ती किंवा भावना यांना आपण चिठ्ठी का डकवतो ?अर्थात स्वतःची भावना दुसऱ्याला सांगण्यासाठी किंवा आपल्याला त्या भावनेत पाहण्यासाठी .हे बरोबर असेच काही काय ?एखादी भावना दुसर्‍याला सांगण्यासाठी मी त्याला नाव देतो.मी ती भावना शब्दरूप करतो . उदाहरणार्थ "मी क्रोधायमान आहे."हे इतरांना सांगण्यासाठी किंवा मी स्वतःला त्या भावनेत पहाण्यासाठी,त्या भावनेशी मी समरस होतो .ती भावना दृढ करण्यासाठी किंवा ती नष्ट करण्यासाठी किंवा तिथे दुसरे काही आणण्यासाठी मी त्याला नाव देतो .आपण एखाद्या पुष्पाला गुलाब असे नाव देतो कारण ही घटना मला दुसऱ्याला सांगायची असते.किवा अशाप्रकारे ती घटना आपल्याला समजून घ्यायची असते . आपण म्हणतो ते गुलाबाचे फुल आहे आणि आपण निघून जातो  .आपल्याला वाटते नामकरणातून ती गोष्ट आपल्याला समजली आहे .आपण त्या वस्तूंचे वर्गीकरण केले आहे. त्याला नाव दिले आहे. एका नावाची चिठ्ठी त्याच्या गळ्यांत अडकवली आहे .मग आपल्याला असे वाटते की त्या वस्तूचे सर्वस्व, त्या वस्तूचा गाभा ,त्या वस्तूंचे सौंदर्य, सर्व काही संपूर्णतया आपल्याला या वर्गीकरण व नामकरण प्रक्रियेतून कळले आहे .

अश्या प्रकारे आपण वर्गीकरण करून त्याला नाव देऊन एखाद्याची जात ठरवतो.स्वतःची समज करून घेतो की आता आपल्याला सर्व काही समजले आहे .अशा प्रकारे कुठच्याही वस्तूंकडे जास्त जवळून,जास्त काळजीपूर्वक, जास्त मन लावून, पाहण्याचे टाळतो. जर आपण त्याला नाव दिले नाही, जर आपण त्याचे वर्गीकरण केले नाही, तर आपल्याला जास्त जवळून,  जास्त काळजीपूर्वक,त्याच्याकडे पाहणे भाग पडते.म्हणजेच आपण जे काही असेल फूल किंवा आणखी काही त्याच्याकडे जास्त काळजीपूर्वक पाहण्याला सुरुवात करतो .आपल्याला जास्त जवळून जास्त काळजीपूर्वक पाहणे भागच पडते .म्हणजेच आपण फूल किंवा जे काही असेल त्याच्याकडे नाविन्यपूर्ण दृष्टीने पाहायला सुरुवात करतो .अशा वेळेला आपल्या तपासण्याचा दर्जा व प्रत सर्वस्वी भिन्न असते.आपण त्या वस्तूकडे जणु काही ती आयुष्यात आतापर्यंत पाहिलीच नाही प्रथमच पाहात आहोत अशा दृष्टीने काळजीपूर्वक पाहण्याला सुरुवात करतो. वस्तू व लोक दूर सारण्याचा नामकरण हा एक उत्तम उपाय आहे .जर्मन्स जपानी हिंदू मुस्लिम शीख सीरियन ज्यू अशी एखादी चिठ्ठी डकवतो आणि मग त्यांना मारण्याला उद्युक्त  होतो .परंतु जर तुम्ही लोकांना अशा प्रकारची चिठ्ठी डकवली नाही तर तुम्हाला त्यांच्याकडे जास्त जवळून पाहणे भाग आहे .मग एखाद्याला  ठार करणेही कठीण आहे .तुम्ही एखादी चिठी बॉम्बने उद्ध्वस्त करू शकता व समाधानही मानू शकता की आपण एक  उदात्त कृत्य केले आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या वस्तूला मग ती वस्तू फूल व्यक्ती भावना घटना किंवा  आणखी काहीही असो चिठ्ठी डकवली नाहीत तर तुम्हाला तुमची त्या वस्तूशी असलेली संबंधरूपता लक्षात घेणे भाग पडते .त्याचबरोबर तुमच्या होणार्‍या क्रियेचाहि विचार करणे भाग पडते .अशा प्रकारे वर्गीकरण नामकरण चिठ्ठी डकवणे ही एखादी गोष्ट समजली असे समजून ती झपाटय़ाने हातावेगळी करण्याचा ,नाकारण्याचा ,तिचा धिक्कार करण्याचा, वा तिचे समर्थन करण्याचा, सोयीस्कर मार्ग आहे. ही प्रश्नाची एक बाजू आहे.

कुठच्या गाभ्यातून ही तुमची नामकरण प्रक्रिया होते? नेहमी निवडणारा,नाव ठेवणारा, नाव देणारा, वर्गीकरण करणारा, चिठ्ठी डकवणारा ,हा मध्यबिंदू कोण आहे ?एका मध्य बिंदूतून एका सगळ्या गाभ्यातून हे होते असे आपल्याला वाटते.असा गाभा असा मध्य बिंदू असे केंद्र आपल्याला जाणवत नाही काय ?या केंद्रातून आपल्याला दिशा दाखविली जाते .या केंद्रातून आपल्याला हुकूम सुटतात.या केंद्रातून आपण योग्य अयोग्य ठरवत असतो. या केंद्रातून अापण नामकरण करीत असतो.हे केंद्र काय आहे? हा गाभा म्हणजे काय आहे ?एखाद्याला हे केंद्र म्हणजे आत्मिक शक्ती परमेश्वर असे वाटून घेण्याला आवडेल .परंतु वाटते काय,आवडते काय, यापेक्षा प्रत्यक्षात काय आहे ते महत्त्वाचे आहे .ते महत्त्वाचे नाही काय ?तेव्हा हा गाभा हे केंद्र जे नेहमी नामकरण करीत असते, वर्गीकरण करीत असते, चिठ्ठी डकवीत असते, योग्यायोग्य निश्चय निर्णय यामध्ये गुंतलेले असते, ते नक्की काय आहे हे आपण पाहू या .हे केंद्र हा गाभा म्हणजे  स्मरण नव्हे क़ाय ?स्मरण म्हणजे संवेदना मालिका, ज्या ओळखल्या गेल्या आहेत ,व नंतर बंदिस्त केल्या गेल्या आहेत. संग्रहित केलेल्या आहेत . या संवेदना मालिकांना या स्मरणाला या भूताला वर्तमानातून जीवन प्राप्त करून दिले जाते .नामकरण वर्गीकरण आठवण चिठ्ठी लावणे इत्यादी मार्फत ते केंद्र हा गाभा वर्तमानातून स्वतःचे दृढीकरण व पुष्टीकरण करीत असतो .

जसजसे आपण या विषयात खोल खोल जाऊ, जसजसे अापण हा गुंता उलगडत जाऊ, तसतसे आपल्याला असे आढळून येईल, की जोपर्यंत हा गाभा हे केंद्र आहे ,तोपर्यंत समज अशक्य आहे .या गाभ्याच्या विनाशातून या गाभ्याच्या बाष्पीभवनातून या केंद्राच्या वितळण्यातून आपल्याला समज येईल . हा गाभा म्हणजेच स्मरण होय .ज्याला नाव दिले आहे ज्याचे वर्गीकरण केले आहे ज्याला ओळखले आहे अशा सर्व अनुभवांचा संग्रह म्हणजेच स्मरण होय .त्या वर्गीकृत नामकृत अशा अनुभवातून, त्या केंद्रातून ,दुःख किंवा सुख यांच्या अनुभवाच्या होणार्‍या  स्मरणातून, त्या संवेदनातून, स्वीकार त्याग  निश्चय निर्णय असणे नसणे काहीतरी बनणे हे सर्व होत असते.अशाप्रकारे केंद्र म्हणजे अनेक शब्द होय.जर तुम्ही या केंद्राला नावच दिले नाही तर केंद्र जाग्यावर आहे काय?म्हणजेच जर तुम्ही शब्दांच्या भाषेत विचार केला नाही जर तुम्ही शब्द वापरले नाहीत तर तुम्ही विचार करू शकता काय?शब्दीकरणातून विचार अस्तित्वात येतो.शब्दीकरण विचाराला साद देऊ लागते.अगणित सुखदुःख यांचे शब्दीकृत अनुभव स्मरण, म्हणजेच  गाभा किंवा हे केंद्र होय . कृपा करून स्वतःचे निरीक्षण करा .स्वतःमध्ये पाहा. स्वत:वर पहारा करा. म्हणजे तुम्हाला असे आढळून येईल की वर्गीकरण, शब्द, नामकरण, चिठी, महत्त्वाची बनली आहे.खरी वस्तू हरवली आहे. केवळ आपण शब्दांवर जगत आहोत.

सत्य परमेश्वर हे शब्द आपल्याला फार महत्त्वाचे बनले आहेत किं त्या शब्दांपासून होणारी संवेदना, ज्या संवेदनासाठी ते शब्द उभे आहेत, ती संवेदना महत्त्वाची आहे  .जेव्हा आपण अमेरिकन ख्रिश्चन हिंदू किंवा क्रोध हे शब्द उच्चारतो तेव्हा आपण भावना दर्शवणारे हे शब्द असतो .परंतु ती भावना म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही .कारण आपल्याला शब्द महत्त्वाचे बनले आहेत .ज्या वेळेला तुम्ही स्वतःला बुद्धधर्मीय बुद्धानुयायी ख्रिश्चन असे म्हणता त्या वेळेला या शब्दांचा अर्थ काय आहे? या शब्दांपाठीमागे असलेला अर्थ काय आहे ? हा अर्थ आपण कधीतरी तपासला आहे काय ?हा गाभा हे केंद्र म्हणजे चिठ्ठी आहे .तोच शब्द आहे .जर तुम्हाला चिठ्ठीचे महत्त्व वाटत नसेल व त्या चिठ्ठी मागे शब्दामागे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता व महत्त्व वाटत असेल तर आपण तपास करू शकता .पण जर तुम्ही चिठ्ठीशी समरस झाला असाल त्याला कायमचे चिकटून बसला असाल तर मात्र पुढील प्रवास अशक्य आहे .आणि आपण चिठ्ठीशी समरस झालेले आहोत.घर नाव आकार फर्निचर बँकेतील ठेव आमची मते आमचा कल आमच्या कल्पना आमच्या तृष्णा आमच्या लालसा आमच्या प्रेरणा यांच्याशी आपण समरस आहोत .या सर्वांना नावे दिलेली आहेत या सर्व वस्तू म्हणजे आपणच आहोत .वस्तू महत्त्वाच्या बनल्या आहेत. नाव चिठ्या महत्त्वाच्या बनल्या आहेत .म्हणूनच गाभा हाच शब्द आहे .

जर शब्द नसेल चिठ्ठी नसेल तर केंद्र नाही.केंद्र शब्दा विना आहे काय ? मग फक्त विघटन आहे .रिकामे पणा आहे हा एकाकीपणा हा रिकामेपणा हा पोकळपणा भीतीतील किंवा भीतीपैकी नाही .(भीती हा एक स्वतंत्र विषय आहे )या पोकळपणामध्ये वगैरे  आपण काहीही नसल्याची एक जाणीव आहे .कारण तुम्ही या सर्व चिठ्ठ्या फेकून दिलेल्या आहेत .किंवा जास्त योग्य रित्या सांगावयाचे झाल्यास आपण भावना कल्पना यांना नावे का देतो हे तुम्हाला समजले आहे व अशा प्रकारे तुमचे नूतनीकरण झाले आहे. तुम्ही नवीनच बनले नाही काय? जिथून तुम्ही कार्य करता ते केंद्रच नष्ट झाले नाही काय ?केंद्र म्हणजे शब्द वितळला आहे .चिठ्ठ्या सुटल्या आहेत त्या तुमच्यापासून ओढून घेतल्या गेल्या आहेत .अशा परिस्थितीत तुम्ही केंद्र म्हणून कुठे आहात ?तुम्ही तिथे आहात. परंतु आता बदल झाला आहे. हा बदल किंचित घाबरवणारा आहे .म्हणून तुम्ही पुढे प्रवास करण्याचे नाकारता.पुढे जाण्याचे टाळता .तुम्ही योग्य अयोग्य निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे .जे होत आहे ते आवडत आहे की नाही यावर निर्णय घ्यावयाला तुम्ही सुरुवात केली आहे .जे काही आहे त्याच्या समजातून तुम्ही पुढे वाटचाल सुरू करीत नाही तर जे काही आहे त्याची परीक्षा तुम्ही सुरू करता .त्याची योग्य अयोग्य चौकशी तुम्ही सुरू करता .याचाच अर्थ अजून तुमच्याजवळ ते केंद्र आहे .तिथून तुम्ही कार्य करीत आहात .म्हणून ज्याक्षणी तुम्ही योग्य अयोग्य निर्णयाला सुरुवात करता त्याच क्षणी तुम्ही रुतले जाता.अावड नावड हे शब्द महत्त्वाचे बनतात .परंतु जर तुम्ही नाव दिले नाही तर काय होते ?तुम्ही एखाद्या भावनेकडे एखाद्या संवेदनेकडे जास्त प्रत्यक्ष पाहता त्यामुळे त्या भावनेशी त्या संवेदनेशी तुमची एक वेगळीच संबंधरूपता प्रस्थापित होते.ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला नाव न दिल्यानंतर तुमची एक वेगळीच संबंध मयता प्रस्थापित होते त्याचप्रमाणे संवेदना किंवा भावना यांना नाव न दिल्यानंतर तुमची एक वेगळीच संबंधरूपता प्रस्थापित होते.तुम्हाला त्याच्याकडे नाविन्याने पाहणे भाग पडते .जेव्हा तुम्ही एखाद्या समूहाला नाव देत नाही तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचा चेहरा पाहणे भाग पडते. समूह म्हणून एखादी विशिष्ट वागणूक तुम्ही त्याला देऊ शकत नाही .आणि म्हणूनच आपण जास्त तरल जास्त तत्पर जास्त निरीक्षणयुक्त जास्त समजयुक्त 

असता.प्रेम व दया जास्त सखोल बनतात .जर तुम्ही सर्वांना एकाच माळेत गोवाल तर मग मात्र सर्व तिथेच संपते. 

जर तुम्ही चिठ्ठी अडकविली नाही तर तुम्हाला प्रत्येक भावनेचा ती जशीजशी उद्भवेल  तसतसा तिचा आदर करणे भाग पडते .जेव्हा तुम्ही चिठी डकविता त्यावेळी भावना चिठ्ठीहून वेगळी असते काय?का चिठ्ठी भावना जागृत करते ?कृपा करून यावर विचार करा .जेव्हा आपण नाव देतो त्यावेळी आपल्या भावनांची तीव्रता वाढविली जाते.भावना व नामकरण ही एकाच वेळी होतात .जर भावना व नामकरण यात फटअसेल तर नावापासून भावना वेगळी आहे की नाही ते तुम्ही शोधू शकाल .अशा वेळी तुम्ही नामकरणाशिवाय भावनेला हाताळू शकाल.

जिला आपण नाव देतो अशा एखाद्या भावनेपासून उधारणार्थ क्रोध स्वतंत्र कसे व्हावे ही खरी समस्या आहे.एखादी भावना ताब्यात कशी ठेवावी ,दाबून कशी टाकावी,वितळवून कशी टाकावी, तिथे उच्चाटन कसे करावे, ही खरी समस्या नाही .हीच खरी समस्या आहे असे वाटणे हे अपरिपक्वतेचे व  मूर्खपणाचे लक्षण आहे . एखाद्या भावनेपासून स्वतंत्र कसे व्हावे ही खरी समस्या आहे . त्यापासून स्वतंत्र होण्यासाठी ,खरे स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी, भावना महत्त्वाची आहे की शब्द महत्त्वाचा आहे, त्याचा आपण अगोदर तपास केला पाहिजे. क्रोध या शब्दाला भावनेपेक्षा जास्त महत्त्व आहे हे कळण्यासाठी अगोदर भावना व नाम यांमध्ये फट आहे हे लक्षात आले पाहिजे .

जर मी भावनेला नाव दिले नाही म्हणजे विचार हा केवळ  शब्दानुरोधाने  कार्यवाहीत नाही .किंवा मी शब्दांच्या भाषेत विचार करीत नाही .आपल्यापैकी बहुतेक जण हेच करीत असतात .तर काय होते ?मन हे केवळ द्रष्टा राहात नाही.मन जेव्हा शब्द प्रतिक्रे प्रतिबिंबे यांच्या भाषेत विचार करीत नसते तेव्हा विचार करणारा हा विचारांपासून म्हणजे शब्दांपासून वेगळा नसतो .मन स्तब्ध असते ते तसे नसते काय़ ?हे स्तब्ध केलेले नसते तर स्तब्ध झालेले असते.जेव्हा मन खरोखरच स्तब्ध असेल त्यावेळी भावना निर्माण झाल्या बरोबर त्याला भेटता येईल .जेव्हा आपण भावनांना नाव देतो तेव्हां त्यांना बळकट करतो .दृढ करतो.त्यामुळे त्यांना सातत्य प्राप्त होते. त्यांचा केंद्रात संग्रह केला जातो.त्यातून आणखी चिठ्ठ्या निर्माण होतात . त्या चिठ्ठ्या भावना द्दढ करण्यासाठी, भावनेची तीव्रता वाढवण्यासाठी, किंवा दळणवळणासाठी असतात.

जेव्हा मन हे केंद्र असणयाचे थांबते.विचार करणारा शब्दरूप नसतो .तो भूत अनुभवरूप नसतो . अनुभव म्हणजे  स्मरण.  चिठ्ठ्या निरनिराळया  कप्प्यांत वर्गीकरण करून व्यवस्थित लावून ठेवणे होय . जेव्हा मन कुठल्याही क्रियेत गुंतलेले नसते तेव्हा ते स्वाभाविकच स्तब्ध असते .ते बद्ध नसते. त्याला केंद्र नसते.माझे घर माझे यश माझे काम  माझी भावना हे सगळे शब्द आहेत .त्यामुळे भावनेला चेतना मिळते .त्यामुळे स्मरण बळकट होते .जेव्हा यापैकी काहीही होत नसते तेव्हा मन अत्यंत  स्तब्ध असते .ही स्थिती म्हणजे त्याग अथवा सर्व नाकारणे नव्हे.या स्थितीत येण्यासाठी तुम्हाला अत्यंत जागृततेतून व समजयुक्ततेतून सर्व अवस्थांमधून गेले पाहिजे .हे एक प्रचंड कार्य आहे .केवळ दोन चार शब्द शाळकरी मुलांप्रमाणे शिकणे व "नामकरण करता कामा नये" "नामकरण करता कामा नये" असा जप करणे म्हणजे हे नव्हे.याच्या सर्व बारकाव्यांतून, याच्या सर्व गर्भितार्थातून ,स्वतः गेले पाहिजे.त्याचा अनुभव घेतला पाहिजे ,मन कसे कार्य करीत आहे हे पाहले पाहिजे व या सर्वातून एका अशा ठिकाणी  येऊन पोचले पाहिजे की जिथे नामकरण  वर्गीकरण इत्यादी आपोआपच थांबलेले असेल .म्हणजेच विचारांपासून केंद्र भिन्न नसते हे समजणे व अनुभवणे होय .ही सर्व प्रक्रिया म्हणजेच प्रार्थना होय .

जेव्हा मन खरोखरच निस्तरंग होते  तेव्हाच अगणित  असे ते अस्तित्वात येणे शक्य आहे .दुसरी कुठलीही प्रक्रिया दुसरा कुठचाही शोध स्वरचित आहे आणि म्हणूनच तो असत्य आहे .ही प्रक्रिया फार कठीण आहे कष्टदायक आहे बिकट आहे त्यासाठी मन स्वतःमध्ये घडत असलेल्या अनेक घडामोडीबद्दल सदैव  जागृत पाहिजे.या बिंदूपर्यंत येण्यासाठी कुठलेही समर्थन नाही .किंवा कुठचाही योग्य अयोग्य निकाल नाही.त्याप्रमाणे हा शेवटही नाहीं .कारण आंत अजूनही असामान्य असे काही तरी चालू असते .हे केवळ आश्वासन नाही प्रयोग करणे किंवा न करणे हे तुमच्या हातात आहे .स्वतःमध्ये जास्त जास्त खोलवर जाणे अशा प्रकारे मनाचे निरनिराळे थर वितळवून टाकणे हे अत्यंत द्रुतगतीने करता येण्यासारखे आहे किंवा फार शिमिस्तपणे ही करता येण्यासारखे आहे .मनाची प्रक्रिया पाहणे,ते शब्दांवर कसे अवलंबून असते ते पाहणे, ते त्यावर कसे जगत असते ते पहाणे, शब्दांमार्फत मृत अनुभव कसा जिवंत व तीव्र केला जातो ते पाहणे, हे अत्यंत गमतीचे आहे.मन एक भूतकाळात तरी असते किंवा भविष्यकाळात तरी असते. त्यामुळे शब्दांना मानसिकदृष्ट्या किंवा ज्ञानतंतू दृष्ट्या अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले असते .कृपा करून तुम्ही हे सर्व माझ्यापासून किंवा कुठच्या पुस्तकातून शिकू नका.हे तुम्ही दुसऱ्या कोणापासून शिकू शकणार नाही किंवा तुम्हाला कुठल्या पुस्तकातही सापडणार नाही.जे तुम्ही शिकाल किंवा जे तुम्हाला सापडेल ते सत्य नसेल .वर सांगितलेल्या सर्वांचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकाल .तुम्ही स्वतःला क्रिया मग्न असताना पाहू शकता. तुम्ही स्वतःला विचार मग्न असताना पाहू शकता . तुम्ही स्वतःवर पहारा करा .तुम्ही विचार कसा करता ते लक्षांत घ्या . जसजशा  भावना निर्माण होतात तसतशा तुम्ही किती द्रुतगतीने नामकरण करीत असता ते लक्षात घ्या .हा सर्व जागता पहारा मनाला केंद्रापासून मुक्त करतो .नंतर मन स्तब्ध निस्त रंग व शांत असल्यामुळे ते अनादि ग्रहण करू शकते .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel